योगमार्ग – राजयोग

0
160

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना: २६७ )
(स्वाध्याय – ३५)विश्‍वात असंख्य पशू-पक्षी-प्राणी आहेत. तसेच कृमी-कीटक देखील आहेत. पण त्या सर्वांपेक्षा बुद्धिमान म्हणजे मानव. तसे बघितले तर तो देखील एक प्राणीच आहे. पण उच्च कोटीचा. शास्त्रकार सांगतात की परमात्म्याकडून निघालेला आत्मा चौर्‍याऐंशी योनींन जन्म घेऊन मग तो मानव जन्म घेतो आणि त्यानंतरच तो आत्मा पुन्हा एकदा परमात्म्यात विलीन होऊ शकतो. ही कल्पना, हे परमकोटीचे ज्ञान किती हृदयगम्य आहे याची जाणीव योगसाधना करता करता साधकाला हळूहळू व्हायला लागते. त्याला आपल्या मनुष्य जीवनाचा हेतू, आपले ध्येय समजायला लागते. मग तो आपल्या साधनेच्या पायर्‍या चढायला लागतो. सुरुवातीची साधना स्थूल पैलूंची असते. तदनन्तर सूक्ष्म पैलू सुरू होतात व शेवटी अति सूक्ष्म पैलूंपर्यंत त्याची मजल जाते. त्याच्या आंतरिक मनाला आत्मानंदाचा अनुभव यायला लागतो. आपल्या चिदानंद रूपात तो सतत रमत असतो. म्हणूनच शास्त्रशुद्ध सर्व मार्गांनी व पैलूंनी योगसाधना अत्यावश्यक आहे.

सुरुवातीच्या प्रथमावस्थेतच मानवाला त्याच्याकडे कुठले गुण असायला हवेत हे माहीत हवे. मग त्याप्रमाणे आचरण करायला सोपे होते. त्याची प्रगती होतच राहते आणि इच्छित ध्येयापर्यंत जाण्याचा त्याचा मार्ग सुलभ सोपा होतो. त्यामुळेच नियमित स्वाध्याय अपेक्षित आहे. स्वाध्यायाद्वारे येणारी गुण संपत्ती म्हणजे कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता, भावपूर्णता, समर्पण…
पू. पांडुरंग शास्त्र म्हणतात- ‘मानव म्हणजेच कृतज्ञता’
अस्मिता – या सद्गुणाबद्दल ते म्हणतात की मानवाला
‘मी आहे-’ याचे भान असले पाहिजे. तसेच
‘मी करू शकतो, बनू शकतो, बनवू शकतो, बदलवू शकतो, उभे करू शकतो, प्राप्त करू शकतो- या वृत्तींचे भान म्हणजे अस्मिता.
‘मी मोठा आहे (आत्मसन्मान), तसाच
‘दुसराही मोठा आहे’ (परसन्मान) हे माहीत हवे.
सारांश दुसरा लहान नाही तसाच तुच्छ नाही.
– या सर्व ज्ञानाचा परिपाक म्हणजे
* आत्मगौरव – सेल्फ रिस्पेक्ट
* आत्मविश्‍वास – सेल्फ कॉन्फिडन्स
* आत्मरक्षण – सेल्फ रेमिटन्स
शास्त्रीजी सांगतात- मानवात असलेल्या या दुर्दम्य वृत्तींमुळेच भगवान त्याच्यात येऊन राहिलेला आहे.
भगवंताने बनवलेले सर्वच विश्‍व सुंदर व विलोभनीय आहे. त्याशिवाय ही सर्व त्याचीच संपत्ती आहे. सगळ्या निसर्गाचा तो मालक व करता – करविता आहे. सुंदर डोंगर-पर्वत, नाले-नदी-समुद्र, आकाश, पाणी-बर्फ, वृक्ष-वनस्पती …. सगळीकडे तो चैतन्य रूपात वास करतोच आहे आणि सर्व सृष्टीचे संवर्धन अत्यंत काटेकोरपणे करीत आहे. तो कुठेही राहिला तरी त्याला आनंदच मिळेल. पण शास्त्रकार सांगतात की तो मानवात येऊन राहिला आहे.
योगेश्‍वर श्रीकृष्णाचे गीतेतील वचन याच संदर्भात आहे-
* सर्वस्य चाहं हृदिसंन्निविष्टा:|
– मी सर्वांच्या हृदयात आहे.
आज विश्‍वातील अनेक व्यक्ती हताश झालेल्या दिसतात कारण त्यांना विविध समस्या आहेत- गरिबी, रोगराई, भांडणे-तंटे-लढाया व त्यात भर म्हणजे नैसर्गिक संकटे…! त्याला वाटते की मी छोटा आहे, असमर्थ आहे. माझे जीवन व्यर्थ आहे. अशा नकारात्मक विचारांनी तो स्वत:च्या जीवनाशी झुंजतो. त्याला जीवनात रस वाटत नाही. काहीजण व्यसनाचा आधार घेतात कारण त्यांना थोडा वेळ तरी दिलासा मिळतो. पण शेवटी ते त्याच व्यसनाचे शिकार होतात. विविध क्षेत्रात त्यांना त्रास होतो- आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक… विविध रोग त्यांना जडतात. त्यामुळे त्यांचे दु:ख वाढतच जाते. काहीजण तर अगदी थकून जातात व आत्महत्या करतात- निरुपायाने. ही फार मोठी मानवहानी आहे. तसे बघितले तर मानवतेला या घटना लज्जास्पद आहेत. मानव हृदयाला तर अत्यंत वेदनाकारक आहेत. अशा घटना घडत राहिल्या तर भगवंताचा देखील पराभव आहे.
अशा वेळी विविध अनेक सद्गुणांबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा गुण उभा करायला हवा-
तो म्हणजे * अस्मिता.
हा सद्गुण मानव हृदयात पैदा होताच त्याला ‘स्व’ची जाणीव होते. तो स्वत:चा अभ्यास म्हणजेच ‘स्वाध्याय’ करायला लागतो.
पू. पांडुरंगशास्त्री यांनी नमूद केल्याप्रमाणे त्याला कळते की – मी करू शकतो, बनू शकतो, बनवू शकतो, हळूहळू मग तो सत्कर्म करायला लागते. स्वत: मानवाचे सद्गुण आत्मसात करून मानव बनतो. तो इतरांना भेटतो (स्वाध्याय परिवाराची भावफेरी व भक्तिफेरी). आपल्या सद्विचारांची देवाणघेवाण करतो. इतरांना प्रेम, ऊब देतो. मग त्याला जाणीव व्हायला लागते की तो इतरांना देखील मानव बनवू शकतो.
स्वाध्याय करता करता तो बदलतोच व इतरांना सुध्दा बदलवतो. म्हणजे त्याचा आचार, वागणूक बघून इतर देखील बदलतात. सद्गुणांचा संसर्ग होतो. असे करून तो बिघडत नाही तर इतरांना घडवतो म्हणून संत म्हणतात-
‘आम्ही बी घडलो. तुम्ही बी घडाना’
(आम्ही बिघडतो- तुम्ही बिघडा ना- असे नाही)
स्वाध्याय साधना केली नाही तर मात्र असे ‘बिघडणे’ होऊन शकते.
आयुष्यात अनेकांना अपयश येते. ते एवढे खचून जातात की ते निराशेमुळे उभेच राहू शकत नाहीत. अस्मिता! हा सद्गुण आल्यावर तो आपोआप ‘उभा राहतो’ आपल्या संकटांना यशस्वीपणे तोंड देतो. अपयश मागे टाकून यशाकडे घोडदौड करतो. त्याचा आत्मविश्‍वास जागृत होतो. एवढा समर्थ होतो की तो इतरांना उभे करतो. ते देखील त्याच्याच पावलाने पुढे जातात.
अनेक वेळा प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही गोष्टी प्राप्त करायच्या असतात. पण विविध कारणांमुळे त्या मिळत नाहीत. अशा निराशेच्या समयी जर त्याला योग्य विचार, ज्ञान मिळाले तर तो व्यवस्थित प्रयत्न करतो. अनेक वेळा त्याला त्यातील काही गोष्टी हळूहळू प्राप्त व्हायला लागतात. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास बळावतो व तो कार्यरत राहतो.
प्रत्येक प्राण्याला ‘अहंकार’ असतो. त्यामुळे तो स्वत:च्या ‘अहं’ला आकार देतो. हा आकार दोन टोकांचा असतो- अहंगंड किंवा न्यूनगंड.
अहंगंड असलेल्याला वाटते ‘मीच मोठा’ इतर सर्व नगण्य. अनेक वेळा तो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करतो व इतरांना सतावतो.
न्यूनगंड असलेल्याला वाटते ‘मी असा लहान, असमर्थ’ प्रत्येक कामात तो मागेच राहतो- यशापासून दूर.
खरे म्हणजे अहंकाराचे दोन पैलू आहेत- आत्मसन्मान आणि परसन्मान. हे दोन्ही पैलू समजून घेतले तर अहंकार दुर्गुण होत नाही तर एक उत्कृष्ट सद्गुण होतो. त्यामुळे मानव स्वत:चा व इतरांचा जीवन विकास करतो.
मानव जेव्हा ‘आत्मगौरव – सेल्फ रिस्पेक्ट’ जाणतो, त्याचा ‘आत्मविश्‍वास वाढतो. त्यामुळे संकटांचा सामना करायची त्याची शक्ती वाढते. म्हणजेच ‘आत्मरक्षण – सेल्फ रेमिटन्स’ करण्याची क्षमता वाढते.सारांश एकच- ‘अस्मिता’ हा सद्गुण आला तर मानवाला ‘अहं ब्रहास्मि’ या पायरीपर्यंत पोचवू शकतो.
शास्त्रकार सांगतात- ‘नर अपनी करनी करे तो नरका नारायण होय.’ यासाठी आळस न करता नियमित स्वाध्याय करणे आवश्यक आहे.
एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की हे सर्व शुष्क ज्ञान नाही. प. पू. पांडुरंग शास्त्रीजींच्या स्वाध्याय कार्यात विविध ठिकाणी असे घडले आहे आणि घडत आहे.
उदाहरणे अनेक आहेत पण एक द्यायचेच झाले तर गुजरातेतील ‘कोळी’ लोकांचे देता देईल. त्यांना शास्त्रीजी ‘सागरपुत्र’ व ‘सागर कन्या’ म्हणतात. किती अर्थपूर्ण व गोंडस नाव आहे हे?
अनेक वर्षांपूर्वी शास्त्रीजी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांचे जीवन अत्यंत वाईट होते- गरिबी, व्यसनाधीन, झोपडपट्टीत राहणारे असे ते लोक होते. स्वत: बदल त्यांना न्यूनगंड होता. पण शास्त्रीजींनी त्यांना सांगितले की ते रामायण लिहिणार्‍या वाल्मिकीचे (वाल्याकोळी) व महाभारत लिहिणार्‍या महर्षी व्यासांचे (मत्स्यगंधेचा पुत्र) वंशज आहेत. नियमित संपर्कानंतर त्यांची ‘अस्मिता’ जागृत झाली. त्यांचे जीवन आमूलाग्र बदलले. ही गोष्ट फक्त ‘अस्मिता’ शब्दाचा जप करून झाली नाही तर त्यासाठी शास्त्रीजी व त्यांच्या योगेश्‍वर स्वाध्याय परिवाराला नियमित कर्मयोग करावा लागला.