योगमार्ग – राजयोग

0
228

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना: २६६ )
(स्वाध्याय – ३४)

जगात अनेकजण वेगवेगळ्या तर्‍हेने साधना करतात. त्यातीलच एक अत्यंत उपयुक्त म्हणजे योगसाधना. कुठलीही साधना केली की अनेक गुण साधकाला प्राप्त होतात. अष्टांगयोगाच्या नियमातील एक पैलू म्हणजे स्वाध्याय. नियमित स्वाध्याय केला तर स्वाध्यायीलाही गुणसंपत्ती मिळते.
पू. पांडुरंगशास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराला या संपत्तीबद्दल सांगतात की विविध गुण स्वाध्यायामुळे प्राप्त होतात. कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता, भावपूर्णता, समर्पण…
१. कृतज्ञता – म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेल्या कामाची व केलेल्या प्रेमाची कदर करणे. तसेच त्यासाठी काहीतरी करीत राहण्याची वृत्ती. ही कृतज्ञता विविध प्रकारची असते. सर्वांत आधी भगवंताबद्दल! – जो संपूर्ण विश्‍व प्राणिमात्रासाठी व्यवस्थित सुसूत्रतेने चालवतो. तसेच प्रत्येक प्राण्याचे अनेक प्रकारचे अंतर्गत व्यवहार निरपेक्षपणे व प्रेमाने चालवतो. सूक्ष्म विचारांती लक्षात येईल की त्याच्या कृपेमुळेंच तर हे जग चैतन्याने भरलेले आहे आणि कित्येक युगे चालत आहे. पण दुर्भाग्य म्हणजे अनेक व्यक्ती- तथाकथित विद्वानदेखील भगवंताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. असे लोक देवाबद्दल बोलतात तेव्हा वाटते की यांना देव म्हणजे काय हे समजले आहे तरी काय?काही स्वार्थी व्यक्तींना भगवंताकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शक्ती लागते. ती मिळेपर्यंत ते भक्ती करतात आणि शक्ती मिळाली की त्या भगवंताच्या अस्तित्वालाच आव्हान देतात. अशा मानवांची उदाहरणे म्हणजे – वेदशास्त्रपारंगत महान शिवभक्त लंकापती रावण, हिरण्यकशिपू. त्यामुळेच त्यांना राक्षस मानले गेले. दानवांच्या यादीत त्यांची नावे आलीत. आजदेखील अशा व्यक्ती समाजात दृष्टीस पडतात.
तदनंतर कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे ऋषिमुनींची कारण मानवाला सुखी-आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी तप केले. निःस्वार्थपणे आश्रम चालवले. तिथे सर्वांना – राजा, रंक सर्वांना शिक्षण दिले. प्रत्येकाच्या ब्रह्मचर्याश्रमात ऋषी व ऋषीपत्नींनी मातृहृदयाने प्रत्येकाला सांभाळले. म्हणूनच गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वगृही जाताना शिष्यांचे हृदय भरून येत असे. मन जड होत असे. नयनात अश्रू येत असत. आज तसे ऋषी नाहीत. गुरुकुल नाहीत. पण अनेक संतमहापुरुष आहेत. तेदेखील ऋषितुल्यच आहेत.
त्यांच्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार येतो तो आपल्या संस्कृतीबद्दल. विश्‍वात अनेक संस्कृती आहेत, पण शास्त्रकार सांगतात की अत्यंत पुरातन अशी भारतीय संस्कृती उच्च कोटीची आहे. या संस्कृतीने मानवाच्या सर्व पैलूंनी जीवनविकासाचा प्रयत्न केला – आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक. त्याचबरोबर निसर्ग व इतर प्राण्यांबद्दल आदर व प्रेम शिकवले. स्वतः भगवंताने अवताररूपात जन्म घेऊन भारतीय संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन सोडले.
या सर्वांबद्दल ज्ञान देणारे म्हणजे गुरू. म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. गुरू नसतील तर भगवंत, संस्कृती काहीदेखील समजणार नाही. म्हणून संत कबीर म्हणतात-
* ‘गुरू गोविंद दोनो खडे, का के लागू पाय, बलिहारी गुरू आपने, जिन गोविन्द दिवो दिखाय|’
तत्त्ववेत्ते एक सुंदर गोष्ट सांगतात- गुरू आणि गोविंद दोघेही शिष्यासमोर उभे राहिले. आता शिष्याला प्रश्‍न पडला की आधी कुणाला नमस्कार करायचा – देवाला की गुरूंना.
शिष्याची समस्या भगवंताला समजली. त्यांनी हळूच डोळ्यांनी खूण केली की आधी नमस्कार गुरूंना कर. याचाच अर्थ असा की देवसुद्धा गुरूंचे महत्त्व जाणतात. म्हणूनच
* आचार्य देवो भव- म्हणतात. त्यापुढे जाऊन गुरूचे संपूर्ण वर्णन शास्त्रकार करतात.
* गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्‍वरः|
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
– म्हणजे गुरू हे ब्रह्मा-विष्णू-शिवस्वरूप आहेतच. पण ते साक्षात् परब्रह्म आहेत.
ही आहे महती गुरूंची! प्रत्येक शिष्याने गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. पण त्याचबरोबर गुरूनेदेखील आपले कर्तव्य, आपली जबाबदारी समजून शिष्याला ज्ञान द्यायला हवे.
या सर्वांची आठवण करून कृतज्ञता व्यक्त करताना जन्मदात्या आई-वडलांना कसे बरे विसरणार? त्यांनीच तर मुलाला जन्माला घातले. दोन्ही पालक श्रेष्ठ आहेत पण प्रथम क्रमांक लागतो तो मातेचा. म्हणून बोधवचनामध्ये ‘मातृदेवो भव’ आधी येते व तदनंतर ‘पितृदेवो भव’ येते.
माता मुलाला नऊ महिने आपल्या उदरात अनेक कष्ट सहन करून सांभाळते. भगवंत छोट्या बाळासाठी तिच्याच रक्तापासून तिच्या स्तनात पौष्टिक असे दूध तयार करतो. रात्री-अपरात्री जागून आई मुलाला अत्यंत प्रेमाने सांभाळते. वडीलसुद्धा अनेक पैलूंनी मुलाचा सांभाळ करतात. मूल हळूहळू वाढत जाते. जगाच्या प्रांगणात समर्थपणे उभे राहण्याची ताकद पालकच मुलाला देतात. म्हणून शास्त्रकार त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात – माता किती विधायक कार्य करू शकते हे समजण्यासाठी…
* प्रल्हादाचे चरित्र अभ्यासायला हवे. त्याचे पिता हिरण्यकशिपू राक्षसी वृत्तीचे होते तरीदेखील नागकन्या कयाधुच्या संस्कारांमुळे प्रल्हाद महान विष्णुभक्त ठरला. नरसिंह अवतार घेऊन विष्णूंनी भक्ताचे पित्यापासून रक्षण केले. महर्षी नारदांना या संदर्भात विसरून चालणार नाही.
* हल्लीच्या काळातील व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! पती मोगल दरबारी सरदार असतानाही जिजाबाईने अत्यंत धीराने छोट्या शिवबाला भारतीय संस्कृतीबद्दल आदर शिकवला. स्वतःचे मराठा साम्राज्य कसे उभे करावे, याबद्दल मार्गदर्शन केले.
याउलट रावण! राक्षस कुळातील आईमुळे कुसंस्कार मिळाले व एवढे महान व्यक्तिमत्त्व अधोगतीला गेले. पण त्याचबरोबर बिभीषण वडिलांकडून सुसंस्कार मिळाल्यामुळे महान रामभक्त म्हणून भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहासात अजरामर झाला.
त्यामुळेच पालकांना म्हणजे माता-पित्यांना आपल्या जबाबदारीची सतत जाणीव ठेवायला हवी.
आमच्या बालपणी आजी म्हणायच्या – संस्कार सर्वांना- मुलींना – मुलांना द्यायला हवेत. पण जास्त ‘‘मुलींना’’ हवेत. नाहीतर दोन घराण्यांचा नाश होईल. त्यावेळी बहुतेकजण साक्षर नव्हते. पण असे विविध ज्ञानपूर्ण व अनुभवपूर्ण विचार ऐकले की ते सुशिक्षित व सुसंस्कारी होते, असे वाटते.
या सर्वांबरोबर आपले कुटुंब व समाज यांचीही कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्यांचाही सहभाग आहे.
आणि सुजाण व्यक्ती आपल्या राष्ट्राला तर कधीही विसरू शकत नाही. भारतीय नागरिकांनी तर प्रिय भारतमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. हा महान देश – प्रत्येक क्षेत्रात प्रगत असलेला.. सर्व विश्‍वाला मार्गदर्शन करू शकतो.
पू. शास्त्रीजी आपल्या प्रवचनात सांगतात, ‘‘भगवंत, ऋषिमुनी, संस्कृती, गुरू, आईबाप, कुटुंब, समाज, राष्ट्र या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. कृतघ्न माणूस पृथ्वीला भार आहे.
तत्त्ववेत्ते म्हणतात ‘‘कृतघ्ने नास्ति निष्कृतिः’’- कृतघ्नपणाला प्रायश्‍चित्त नाही.
स्वाध्यायात याची जाणीव होते. चहूकडे नजर फिरवली तर सहज दिसेल की ‘कृतज्ञता’ हा गुण हळूहळू लोप पावत आहे. याउलट ‘कृतघ्नता’ हा दुर्गुण जलद गतीने सगळीकडे पसरतो आहे. त्यामुळे विश्‍व विध्वंसाकडे घोडदौड करीत आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर प्रत्येकाला ‘स्वाध्याय’ करण्याचे महत्त्व पटेल.
(संदर्भ : एष पन्था एतत्कर्म – पू. पांडुरंगशास्त्रींच्या प्रवचनांवर आधारित साहित्य)