योगमार्ग – राजयोग

0
240

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना: २६५)
(स्वाध्याय – ३३)
आपल्यापैकी प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात इतकीधावपळ असते की निवांतपणे बसून आपल्याआयुष्याबद्दल विचार करायला कुणालाही वेळ नसतो. नपेक्षा ‘आम्ही वेळ काढत नाही’ असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. पण ज्यावेळी एखादे दुःख स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवनात आले की काही वेळाकरता जीवन स्तब्ध झाल्यासारखे वाटते. अनेक वेळा मनात विचार येतात की काय चालले आहे या जगात? किती विविधतेने भरले आहे हे विशाल विश्‍व!
सेकंद काटा फिरतो, मिनिट काटा फिरतो तसे तास जातात, दिवस-रात्र निघून जातात. सृष्टीचे हे कालचक्र अनंत काळापासून चालले आहे आणि पुढेही चालत राहणार. सगळेच एक रहस्यमय कोडे वाटते सामान्य माणसाला. पण थोडा अभ्यास केला तर अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळतात. आपण जसे संसाराच्या युद्धात सापडलो आहोत तशीच स्थिती अर्जुनाची झाली होती महाभारताच्या युद्धाच्या वेळी. त्याच्या मनात विविध प्रकारची द्वंद्वे चाललेली होती- प्रेम, मोह, कर्तव्य, मृत्यू, मोक्ष… त्याला उलगडाच होत नव्हता. शेवटी अगदी हतबल होऊन ऐन युद्धाच्या वेळी आणि स्थळी पांडव-कौरवांच्या सेना लढाईकरता सज्ज झालेल्या असताना अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य श्रीकृष्णाच्या चरणी ठेवले व तो त्याला शरण गेला.
खरेच, ही घटना अगदी विस्मयकारक आहे. आपलीदेखील अशीच स्थिती होते. प्रश्‍नांची उत्तरे सापडत नाहीत. पण आपण कुठे जाणार श्रीकृष्णाच्या शोधात. गरजच नाही त्याला शोधायची. त्याने सांगितलेली गीता वाचली व तिचा अभ्यास केला तर विविध प्रश्‍नांची उत्तरे मिळतील.
पू. पांडुरंगशास्त्री सांगतात की लहान मूल जसे आईकडे जाते तसे आपण गीतेचा अभ्यास करताना लहान मुलासारखे व्हायला हवे. मग जीवनाचे सर्व रहस्य हळूहळू समजू लागेल.
ज्ञानकर्मसंन्यास योग या चौथ्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात-
* स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः|
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं श्‍वेतदुत्तमम् ॥
– तोच हा प्राचीन योग, माझा तू भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून आज मी तुझ्यासाठी सांगितला आहे. कारण हा योग अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात अत्यंत मार्मिक विषय आहे.
शास्त्रीजी म्हणतात की गीता सांगताना भगवंताच्या डोळ्यांसमोर मानव उभा आहे. जसा वृद्ध पिता स्वतःच्या मुलाला अंतःकरणापासून हृदय मोकळे करून सगळेकाही सांगतो तशी गीता भगवंतांनी समजावली आहे.
श्रीकृष्णांना आपला सखा समजून अर्जुन अनेक प्रकारचे बिकट प्रश्‍न विचारतच राहतो व श्रीकृष्ण त्याच्या मुखकमलावरचे स्मित कायम ठेवून उत्तरे देतच राहतात. असे करत करत भगवंत नवव्या अध्यायापर्यंत येतात-
* राजविद्या राजगुह्ययोग त्याचे नाव
पहिल्याच श्लोकात भगवंत अर्जुनाला समजावतात-
‘‘तुज दोषदृष्टिरहित भक्त असलेल्याला हे परमगुह्य ज्ञान रहस्यासह सांगतो की जे जाणल्याने दुःखरूप संसारातून मुक्त होशील.’’
हे वाचल्यावर आमच्यासारख्या सामान्य मर्यादित ज्ञान असलेल्यांच्या मनात लगेच विचार येतो की हे ‘परमगुह्य रहस्य’ काय बरे असेल?… आणि तेदेखील एवढ्या विस्तृत विश्‍वाबद्दल व या जीवन-महासागराबद्दल! मला ते समजेल का? कदाचित अर्जुनाच्या मनातही असाच विचार आला असेल!
मुलाच्या मनात काय चालले आहे हे हुशार आई-वडिलांच्या लगेच लक्षात येते आणि इथे तर उत्तरं देणारे स्वतः सृष्टिरचयिता अवतार रूपात आहेत. ते लगेच सांगतात-
‘‘हे ज्ञान सर्व विद्यांचा, गुह्यांचाही राजा आहे, अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फलदायी व धर्मयुक्त आहे. साधन करावयास फार सोपे व अविनाशी आहे.’’९.२
या अध्यायाच्या सुरुवातीलाच लक्षात येते की गीता ‘राजविद्या’ समजावते. म्हणजे माणसालाच राजकुमार, राजा बनवते. म्हणूनच शास्त्रीजी समजावतात-
‘‘तुम्ही कुठेही असा, कोणत्याही स्थितीत असा, जगाचा निर्माता तुमच्यातच आहे. गीता वाचून माणूस फक्कड बनतो, जो कधीही रडत नाही. चारही बाजूंनी संकटे आली तरीही तो हिंमत बाळगतो. माणसाला माणूस बनवण्याचे काम गीता करते. ती आपल्या जीवनातून नैराश्य काढून टाकते. गीता वाचल्याने जीवनाचे ज्ञान होते. स्फूर्ती मिळते.’’
आपल्यातील सामान्यांच्या मनात अनेक शंकाकुशंका येतील मग अर्जुनासारख्या ज्ञानी व्यक्तीच्या मनातदेखील विविध प्रश्‍न येणारच. म्हणून तो सारखा प्रश्‍नच करत राहतो व भगवंत या गुह्य शास्त्राबद्दल सांगतच राहतात.
परत एकदा ‘‘पुरुषोत्तम योग’’ या पंधराव्या अध्यायात भगवंत सांगतात-
* हे निष्पाप अर्जुना! असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवंत व कृतार्थ होऊन जाईल. अर्थात त्याला आणखी काही करावयाचे उरणार नाही. १५.२०
गीतेतील प्रत्येक अध्याय, प्रत्येक श्लोक उत्तम तत्त्वज्ञान आहे. मानवासाठी उत्तम मार्गदर्शन आहे. म्हणून गीतेचा अभ्यास नियमित स्वाध्यायाद्वारे करणे महत्त्वाचे आहे. हळूहळू विश्‍वाचे रहस्य उलगडत जाते. जीवन सुखमय होऊ लागते. आपल्या चिदानंद स्वरूपाची मानवाला जाणीव व्हायला लागते.
शास्त्रकार म्हणतात–
* ‘‘ज्या मनुष्याने भगवंताला एकदा सर्वोत्तम समजून घेतले, त्याचे मन, मग एक क्षणसुद्धा भगवंताच्या चिंतनावाचून राहू शकणार नाही. कारण जी वस्तू मनुष्याला उत्तम वाटते त्या वस्तूवर त्याचे प्रेम जडते. ज्या ठिकाणी प्रेम जडते त्याच्याच चिंतनात तो सतत राहू लागतो. म्हणून सर्वांचे हे प्रमुख कर्तव्य आहे की भगवंताच्या परम गुह्य प्रभावाला चांगल्या रीतीने समजून घेण्याकरता नाशवान, क्षणभंगुर संसाराची आसक्ती सर्वथा सोडून परमेश्‍वराला शरण जावे आणि भगवद्भजनाची व सत्संगाचीच विशेष खटपट करावी.’’ (श्रीमद्भगवद्गीता – मराठी अनुवाद – गीते प्रेस गोरखपूर)
या सर्व गोष्टी वाचल्या की प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येईल की आपल्यातील सर्वांसाठी योगसाधना अत्यंत जरुरी आहे… तीदेखील शास्त्रशुद्ध व सर्व पैलूंनी. फक्त आसने, प्राणायाम करून सृष्टीचे व जीवनाचे रहस्य समजणार नाही. त्यासाठी सूक्ष्मात जाणे अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच- नियमित स्वाध्याय करायला हवा.