योगमार्ग – राजयोग

0
114

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना : २६४)
(स्वाध्याय – ३२)
प्रत्येक मानवाच्या आयुष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग येत राहतात. सुखदुःखाचे विविध क्षण असतात. आपणातील बहुतेकजण दुःखाच्या किंवा वाईट प्रसंगी नाउमेद होतात. खचून जातात. त्यांच्या जीवनात काहीच रस राहत नाही.
अनेकजण म्हणतात की काळोखानंतर प्रकाश येतोच, तसे दुःखानंतर सुख येणार, आनंदाचे क्षण येणार, असे म्हणणे वेगळे आणि तसे समजणे वेगळे. पण अशा प्रसंगी जर कुणी ज्ञानी भेटला आणि त्याने आश्‍वासन दिले तर कुणालाही बरे वाटेल. त्याचा आत्मविश्‍वास हळूहळू परत येईल.
आपल्या रोजच्या जीवनात अशा विविध घटना घडतात. प्रत्येक क्षेत्रात याची उदाहरणे घेता येतील.
एका विद्यार्थ्याला परीक्षेत मार्क कमी मिळाले किंवा तो नापास झाला आणि पालकांनी व शिक्षकांनी त्याला धीर दिला व समजावले की तू खचून जाऊ नकोस. आमच्या आयुष्यातही अशा घटना घडल्या आहेत. आपण अपयशाची कारणे शोधून काढू. त्यावर उत्तम उपाय काढू. आम्ही तुला मार्गदर्शन करू. तू त्याप्रमाणे अभ्यास कर. कठीण परिश्रम कर. तुला नक्की यश मिळेल. मोठ्यांकडून असे सकारात्मक उद्गार ऐकले की त्या लहान मुलाला कष्ट करण्यासाठी चैतन्य मिळते. तो जोमाने कामाला लागतो.दुर्भाग्याने असे अनेकवेळा घडत नाही. याउलट त्याला दोष दिला जातो. अपयशाचे खापर त्याच्या डोक्यावर फोडले जाते. म्हणूनच काही मुले आत्महत्या करतात.
एका व्यक्तीला रोग झाला. त्याचे निदान झाल्यानंतर त्याच्या डॉक्टरांनी जर त्याला धीर दिला तर तो रोगी लवकर बरा होण्याची शक्यता वाढते. माझ्या कर्करोगाच्या क्षेत्रात तर असे अनेक प्रसंग येतच असतात.
बहुतेकांचा गैरसमज असतो की कर्करोग हा दुर्धर असा रोग आहे. त्यावर काहीही उपचार नाहीत. हा रोग होणे म्हणजे मृत्युदंडासारखाच आहे. पण त्यांना ज्ञान नसते की या युगात विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात एवढी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे की सत्यपरिस्थिती वेगळीच आहे. योग्य प्रशिक्षित डॉक्टरांकडून लवकर निदान होऊन जर योग्य उपचार केले तर अनेक कर्करोगी संपूर्ण बरे होतात. आतां प्रत्येक क्षेत्रात अपवाद आहेच. काही अल्प रुग्णांवर कुठलाही उपचार केला तरी त्यांची स्थिती बिघडते. काहींना मृत्यूचा सामना करावा लागतो.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णाचा व त्याच्या जवळच्या आप्तेष्टांचा तणाव वाढतो. अशा वेळी जेव्हा डॉक्टर धीर देतात व सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी सांगतात तेव्हा बर्‍याच वेळा रुग्णाची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते.
अशी उदाहरणे अनेक असतील. इथे मुख्य मुद्दा म्हणजे कुणातरी योग्य व्यक्तीकडून धीर मिळणे, आश्‍वासन मिळणे हा आहे. व्यक्ती ज्ञानी असली तरी शेवटी तीदेखील एक मानवच आहे. पण तरीसुद्धा उपदेशाचा, आश्‍वासनाचा खूप फायदा होतो. निकाल चांगला मिळण्याची शक्यता वाढते. आणि हे काम जेव्हा सृष्टिकर्ताच स्वतःहून धीर देतो तेव्हा तर विचारायलाच नको! ती व्यक्ती अगदी निश्‍चिंत होऊ शकते. हा सृष्टिकर्ता म्हणजे मानवरूपात अवतरलेले योगेश्‍वर श्रीकृष्ण आणि जिथे अशी विविध उत्तम आश्‍वासने पदोपदी आहेत ती आहे – श्रीमद्भगवद्गीता- भगवंताच्या मुखारविंदातून आलेले सुंदर, मधुर गीत.
पू. पांडुरंगशास्त्री स्वाध्याय परिवाराला सांगतात- ‘‘सृष्टीचा निर्माता सगुण-साकार बनून आश्‍वासने देत आहे.’’
खरेच हा विचारच किती भावमधुर व शक्ती प्रदान करणारा आहे!
दुःखद प्रसंग व संकटांमुळे जेव्हा मानव खचतो तेव्हा ‘भगवंत कुठे आहे’- हा विचार त्याच्या अंतर्मनात येतो. त्याने गीतेचा अभ्यास केलेला असेल तर त्याला श्‍लोक आठवतो-
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो- गीता १५.१५
‘‘मी प्रत्येकाच्या हृदयात आहे.’’
मानवाला ज्ञान नसेल तर तो विचार करतो – मी अगदी सामान्य मर्त्य गरीब शक्तिहीन, दुर्बल, क्षुद्र असा या पृथ्वीतलावरील जीव. आणि माझ्यात स्वयं भगवंत वास करणार?
त्यावेळी गीतेच्या अभ्यासकाला दुसरा श्लोक आठवतो- ‘‘परमात्म्याचाच अविनाशी अंश या जीवलोकांत जीवात्मा झाला आहे.’’
पहिला विचार हे आश्‍वासन आहेच पण दुसरा विचारही त्याच्या पुढची पायरी आहे. अशा समयी खचलेला माणूस धैर्याने उभा राहतो. पण काही जणांना आठवते ‘‘मी सद्वर्तनी नाही. मग भगवंताचा मी अंश कसा? भगवंत आपल्या दुराचारी मुलाला समजावतात-
‘‘अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् |
साधुदेव स मन्तव्यः सम्यग्‌व्यवसितो हि सः’’॥ ९.३०)
– अत्यंत दुर्वर्तनी मनुष्यदेखील जर अनन्यभक्तीने माझी उपासना करील तर तो साधूच समजावा कारण त्याच्या बुद्धीचा निश्‍चय चांगला झालेला असतो.
आपणातील बहुतेकजण कळत-नकळत, विपरीत ज्ञान किंवा अज्ञानामुळे चुका करतो, पापं करतो. पण ज्यावेळी या सर्व गोष्टींची जाणीव होऊन आम्हाला पश्‍चात्ताप होतो म्हणजेच ‘‘बुद्धीचा निश्‍चय चांगला झालेला असतो’’ त्यावेळी या श्‍लोकाचा उपयोग होतो. तरीही मानवी स्वभावानुसार काही शंका मनात डोकावतातच. सर्वज्ञानी भगवंताला मनुष्य काय व कसा विचार करणार हे ज्ञानच असते. म्हणून ते अर्जुनाला निमित्त करून लगेच म्हणतात-
क्षिप्रं भवती धर्मात्मा शश्वच्छांति निमच्छति|
कौन्तेय प्रतिज्ञानीही न मे भक्तः प्रणश्यति ॥ गीता ९.३१
– तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्‍वत शांतीला पोचतो. हे अर्जुना, माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही, हे तू पक्के समज.
असे सुंदर अर्थपूर्ण श्लोक वाचले व त्यांचा अभ्यास केला तर अनेक दुर्वर्तनी लोकांना आश्‍वासन मिळेल. या दोन्ही श्लोकांमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत-
दुर्वर्तनी मनुष्य – अनन्य भक्तीने उपासना.
साधू – बुद्धीचा निश्‍चय – धर्मात्मा
शाश्‍वत शांती – भक्त अधोगतीला जात नाही.
या प्रत्येक शब्दाचा गर्भितार्थ समजणे फार गरजेचे आहे. कारण आपणातील अनेकांना वाटते की माझी भक्ती, उपासना उच्च कोटीची आहे. तसेच मी ‘‘साधू’’ ‘‘धर्मात्मा’’ आहे, त्यामुळे मी अधोगतीला जाणार नाही आणि मला शाश्‍वत शांती लाभेल.
असे वाटणे वावगे नाही, तो तर मनुष्य स्वभावच आहे. पण मुख्य म्हणजे माझी भक्ती, उपासना देवाला अपेक्षित अशी हवी. फक्त पूजा, पाठ, उपवास, तीर्थयात्रा.. अशी कर्मकांडे नकोत. त्यांच्या मागील हेतू व भाव मुख्य आहे.
शास्त्रीजी या श्लोकांबद्दल सांगतात –
गीतेत भगवान हिंमत देतात. बाळ, तू भिऊ नकोस. मी तुझ्यासोबतच आहे. मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्वच माझे अंश आहेत. अर्थात सर्व माझे पुत्र आहेत.
गीता सर्वसामान्यांसाठी आहे, हे आश्‍वासन भगवान स्वतःच देतात. हे गीतेचे महत्त्व आहे.
सर्व शास्त्रकार सांगतात- ‘आकाशात राहणार्‍या बाप्पाला नमस्कार कर’ पण गीताकारांनी सांगितले.. ‘तू माझाच अंश आहेस. मी तुझ्या हृदयातच बसलेलो आहे.’
वरचेवर जेव्हा आम्ही असे श्‍लोक वाचतो तेव्हा बरे वाटते पण पू. पांडुरंगशास्त्री लक्षात आणून देतात की यामुळे माणसांचे जीवन संयमित बनते. अव्यवस्थित बनत नाही.
आजच्या भोगवादी मानवाला अशा संयमाची फार गरज आहे.
हे सर्व मुद्दे अगदी व्यक्तीच्या रक्तात भिनायला हवेत तरच तसे सद्वर्तन होईल. त्यासाठीच नियमित ऋषीप्रणित स्वाध्याय आवश्यक आहे.