योगमार्ग – राजयोग

0
324

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना: २६३)
(स्वाध्याय – ३१)
आजच्या या कलियुगात विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर बहुतेकांना अत्यंत निराशाजनक चित्र दिसते. विश्‍वाच्या उत्पत्तीपासून नैसर्गिक आपत्ती होत्याच- भूकंप, वादळे, पाऊस, अतिवृष्टी, जलप्रलय… इ. पण मानवाच्या स्वार्थामुळे, अज्ञानामुळे, विपरीत ज्ञानामुळे इतर विविध मानवी समस्या निर्माण झाल्या – भांडण-तंटे, लढाया, खून-मारामार्‍या, लाच-लुचपतखोरी, आतंकवाद वगैरे… आता त्यात भर पडली ती धार्मिक समस्यांची. खरा मानवतेचा धर्म न समजल्यामुळे आपलाच धर्म श्रेष्ठ अशी गैरसमजूत धर्मातील धुरीणांनी करून घेतली. त्यामुळे दुसर्‍या तथाकथित धर्मातील व्यक्तींचा अनन्वित छळ, अत्याचार (सर्व तर्‍हेचे – अमानवी) किंवा बळजबरीने अथवा आमिषे दाखवून धर्मांतरे करणे.अशा या परिस्थितीमुळे प्रत्येक राष्ट्रातील नागरिक आज ताणतणावात जगतो आहे. पुढच्या क्षणाला काय होईल याची शाश्‍वती नाही. अशा विचाराने तो नाउमेद, दुःखी होतो. अर्थात या समस्यांवर विविध उपाय आहेत. म्हणूनच आज गरज आहे शास्त्रशुद्ध स्वाध्याय करण्याची!
सर्वांत प्रथम प्रत्येक व्यक्तीचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन.. हा सकारात्मक हवा. जगात अवश्य वाईट गोष्टी आहेत. अनेक दुःखद घटना घडतात. पण त्या नगण्य आहेत. थोडा विचार केला तर लक्षात येईल की वाईट घटनांपेक्षा चांगल्या सुखदायक घटना अनेक पटींनी जास्त आहेत. त्यामुळे जग सुरळीत चालले आहे. पण या गोष्टी बोलणे सोपे, पचवणे कठीण!
तदनंतर ज्या थोड्या समस्या आपण सोडवू शकतो त्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विचारांती आपल्या लक्षात येईल की अशा अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत ज्यांचे उत्तर आहे. पण त्यासाठी आपण कार्यान्वित व्हायला हवे. फक्त बोलणे, चिंता करणे यांमुळे या गोष्टींचा विचार होणार नाही. पुढे जाऊन आणखी एक मुख्य गोष्ट अनेकांना करणे शक्य आहे ती म्हणजे तत्त्वज्ञानाचा अभ्यास व तत्सम आचरण. प्रत्येक देशांत अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले आणि आता देखील आहेत. पण माझ्या मनात जे तत्त्वज्ञान सर्वांत प्रथम येते ते आहे – श्रीमद्भगवद्गीता – जी भगवंताच्या मुखारविंदातून निघाली.
पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात ‘‘गीतेबद्दल अंतःकरणात प्रेम निर्माण होते. सूर्य-चंद्रांना निर्माण करणारा, सृष्टी निर्माण करणारा सगुण-साकार होऊन या जगात आला व त्याच्या मुखारविंदातून ही गीता प्रकट झाली. ती अलौकिक अशीच वाटते. गीता ती गीताच! तिची तुलना दुसर्‍या कोणत्याही ग्रंथाशी होऊ शकत नाही. तिची प्रभा काही आगळी-वेगळी आहे. गीता जितकी पुन्हा पुन्हा वाचावी तितकी ती नवनवीन, ताजीच वाटते. तिच्यात मधुरिमा आहे, पावित्र्य आहे, मनुष्याला वर उचलण्याची शक्ती आहे, जीवन प्रदान करण्याची शक्ती आहे. तो लोकोत्तर ग्रंथ आहे.’’
गीतेविषयी इतकी माहिती मिळाल्यावर तिचा अभ्यास करण्याची सहजच जिज्ञासा उत्पन्न होते. गीता वाचता वाचता ही गोष्ट लक्षात येते की सृष्टीचा निर्माता मानवरूपात अवतार बनून आला आणि त्याने खचलेल्या माणसाला अनेक आश्‍वासने दिली. या आश्‍वासनातील एक अत्यंत आशादायक आश्‍वासन आहे – चवथ्या अध्यायात –
‘‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|
अभ्यत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌॥
– हे अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माचा र्‍हास होतो आणि अधर्म माजतो त्या-त्या वेळी मी स्वतः जन्म(अवतार) घेतो.
‘‘परित्राणाय साधूनाम् विनाशायच दृष्कृताम् |
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
– साधूंचे संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगे युगे जन्म घेतो.
शास्त्रीजी सांगतात की या मार्गदर्शनामागे व आश्‍वासनामागे प्रेम आहे, भाव आहे, शक्ती आहे.
असे हे श्लोक खरेच सखोल चिंतनासाठी योग्य आहेत. त्यांचा वर वर अर्थ जाणणे पुरेसे नाही. त्यांचे संपूर्ण विश्‍लेषण अत्यंत जरुरीचे आहे. नपेक्षा गैरसमज होण्याची शक्यता वाढते.
सामान्य व्यक्ती हे श्लोक वाचल्यावर म्हणू शकते की आज विश्‍वात धर्माचा नाश होऊन अधर्म माजलाच आहे. म्हणून भगवंताच्या वचनाप्रमाणे त्याने जन्म घेणे आवश्यक आहे. असे वाटणे साहजिकच आहे कारण आम्ही आमच्या मर्यादित दृष्टिकोनांतून याबद्दल विचार करतो. पण आपल्या लक्षात येत नाही की सृष्टिकर्त्याला त्याने दिलेल्या वचनाची पूर्ण जाणीव व आठवण आहे. त्याने दिलेले वचन हे आमच्या वचनांप्रमाणे तात्पुरते वेळ काढण्यासाठी दिलेले नाही. तशी वेळ आली की भगवंत नक्की जन्म घेणारच. त्याचे पृथ्वीलोकावर अवतरणे आमच्या इच्छेवर अवलंबून नाही. त्याला स्वतःला वाटले- पटले पाहिजे की त्याच्या भक्तांसाठी आता जन्म घेणे अपरिहार्य आहे.
म्हणूनच दुसरा श्लोक फार अर्थपूर्ण आहे …
साधुंचे संरक्षण करण्यासाठी मी जन्म घेतो. इथे ‘साधू’ शब्दाचा संपूर्ण अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. साधू म्हणजे भगवे कपडे घातलेला, दाढी वाढवलेला, कमंडलू हातात घेऊन ‘ॐ भवति भिक्षांदेही’ असे म्हणणारा नाही तर त्याचे विचार, आचार सात्त्विक हवेत. अन्यथा ‘असे’ साधू तर अनेक आहेत आणि दिवसेंदिवस वाढताहेत. त्यातील काहीजण तर सामान्य जनांचा गैरफायदा घेतात. त्यांना फसवतात, भीती दाखवतात, लूटतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. अशा काही स्वार्थी व्यक्तींमुळे ‘‘साधू’’ या शब्दाचे अवमूल्यन होतेय. लोकांचा सत्‌प्रवृत्तींवरचा विश्‍वास कमी होतोय. त्यामुळे साधू शब्दाचा गर्भितार्थ समजायला हवा…
– त्यांचे आचार-विचार सात्त्विक हवेत. तो सज्जन असायला हवा. त्याची वृत्ती ‘साधू वृत्ती’ असणे आवश्यक आहे.
भारतीयांना त्याबद्दल विशेष विचार करण्याची गरज नाही. याचे कारण म्हणजे आपल्या देशाच्या प्रत्येक प्रांतात वेळोवेळी अनेक संत व महापुरुष जन्माला आलेत- ज्ञानेश्‍वर, कबीर, तुकाराम, एकनाथ, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सावतामाळी, गोरा कुंभार…थोडे बारकाईने न्याहाळले तर लक्षात येईल की सर्व सज्जन, साधू पुरुष चातुर्वर्णातील विविध वर्णांत जन्माला आले. त्यांनी प्रत्येकाने उत्कृष्ट कार्य केले – प्रत्येक क्षेत्रात – सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक…इ.
सांस्कृतिक मूल्यांना मान्य अशी गरज पडली तेव्हा भिक्षा किंवा माधुकरी समाजाकडून मागितली किंवा
स्वेच्छेने दिलेली घेतली. पण कुणालाही फसवले किंवा लुटले नाही. भगवंताला अपेक्षित असे ते कर्मयोगी, भक्तियोगी, ज्ञानयोगी होऊन गेले. या सर्वांनी पुष्कळ कार्य केले. त्यांनी असे म्हटले नाही की भगवंत येऊन त्यांचे रक्षण करील व धर्म स्थापना करील. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला. भगवंताचे लाडके झाले.
पू. पांडुरंगशास्त्री वरील आठव्या श्लोकाबद्दल सांगतात की दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत जन्म घेत नाहीत तर साधूंचे रक्षण करण्यास तो अवताररूपाने पृथ्वीतलावर येतो, तेव्हा दुर्जनांचे रक्षण करतो. आठव्या श्लोकातील पहिले कडवे बघितले तर एक गोष्ट ते आपल्या लक्षात आणून देतात की…
‘‘परित्राणाय साधूनाम्…’’ सुरुवातीला भगवंत सांगतात आणि तदनंतर ‘‘विनाशायच दुष्कृताम्..’’ म्हणतात.
अशा अनेक सूक्ष्म गोष्टी आहेत. त्या सर्व फक्त गीता वाचून किंवा श्लोक पठण करून समजत नाहीत तर सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नियमित स्वाध्याय केल्याने समजायला लागतात. अर्थात श्लोक पठण व गीता वाचन आवश्यक आहेच. पण त्यामुळे बारकावे व गर्भितार्थ लक्षात येत नाही. असा व्यवस्थित स्वाध्याय केला तर खचलेल्या मानवाला शक्ती नक्की प्राप्त होईल. तो जीवनातील समस्यांना धैर्याने सामोरा जाईल. साधु वृत्तीने जगेल. त्याला भेटण्यासाठी भगवंत पुन्हा एकदा अवतार घेतील.