योगमार्ग – राजयोग

0
170

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना: २५७)
(स्वाध्याय – २५)
सर्व विश्‍वात प्रत्येक विषयांत एवढा अभ्यास व संशोधन चालले आहे की विविध विषयांचे ज्ञान वाढतच आहे, ही चागंली आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे त्या त्या विषयांच्या विद्यार्थ्यांनी किंवा तथाकथित तज्ञांनी नियमित अभ्यास चालू ठेवला पाहिजे नाहीतर तो ‘अज्ञानी’(!) होऊ शकतो. आता एक गोष्ट खरी की सगळेच ज्ञान काही कोणी आत्मसात करु शकत नाही. पण निदान संशोधन व त्याच्या परिणामांची नोंद ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे.आमच्या वैद्यकीय क्षेत्रांत आणि माझा निकटचा संबंध असलेल्या शल्यशास्त्र व कर्करोगशास्त्र ह्यात झपाट्याने संशोधन अनेक देशांत चालले आहे. त्यामुळे नवी नवी औषधं, ऑपरेशन किंवा इतर तंत्रे मानवाला उपलब्ध आहेत. तसेच या सर्व गोष्टी चांगल्या व अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यातील अनेक घटक सुरवातीला तरी अत्यंत महागड्या असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तिंच्या किंवा तथाकथित गरीब देशांच्या आवाक्याबाहेर असतात. तसेच काही अत्याधुनिक तंत्रे शिकणे म्हणजे भारताबाहेरच्या प्रगत देशात जावे लागते. सामान्य व्यक्तीला असे शिक्षण परवडत नाही.
अशा विषयांचा विचार करतांना एक विचार माझ्या मनात डोकावतो व तो म्हणजे आपला भारत जो सुवर्णदेश होता- तो खरेच गरीब आहे का? धनाच्या संदर्भात. कारण ज्या देशाचे पुष्कळसे धन इतर देशांच्या बँकेत काळे धन म्हणून ठेवले जाते आणि तेसुद्धा अगदी थोड्याच नगण्य नागरिकांच्या नावाने – तो देश गरीब कसा असेल. असो, पण वस्तुस्थितीच तशी आहे.
ज्ञान हा शब्द आपण सहज उच्चारतो पण ज्ञानमागचा भाव आम्हाला माहीत नाही. त्याची पवित्रता माहीत नाही. भगवान कृष्णांनी गीतेत ज्ञानाला कसे संबोधित केले आहे – ते आम्ही लक्षात घ्यायला हवे.
नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते – गीता४.३८
-ज्ञानासारखे दुसरे काहीही पवित्र नाही… म्हणजेच ज्ञान हे अत्यंत पवित्र आहे. म्हणून आपले अगाध ज्ञान वापरताना प्रत्येक ज्ञानी माणसाने त्या ज्ञानाचा उपयोग पवित्र दृष्टिकोन ठेवूनच केला पाहिजे. ज्ञानाचा उपयोग स्वार्थासाठी किंवा परपीडा देण्यासाठी वापरला तर ते पाप ठरेल. त्याच्याकडे ज्ञान आहे. पण तो अधोगतीला जाईल. म्हणून ज्ञानाबद्दल हे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाचा दुरुपयोग केला तर ते ज्ञान, ज्ञान ारहात नाही. तर त्या विषयाची ङ्गक्त माहितीच राहते. म्हणून सर्व शिक्षक – मग त्यात पालकदेखील आले, ज्ञानाबद्दलचा हा धडा चांगला घोकला पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल संस्कार दिले पाहिजेत.
ज्ञान वापरले म्हणजे त्याबरोबर धनप्राप्ती होते. हेदेखील ज्ञानासारखेच पवित्र असायला हवे. म्हणूनच तर भारतीय संस्कृतीत धनाची देवता ही महालक्ष्मी सांगितली आहे. दरवर्षी व्यापारी त्या लक्ष्मीचे पूजनही करतात. त्याचे संस्कार असणे आवश्यक आहे. धनाचे पावित्र्य राखून ठेवायचे असेल तर ते पवित्र पद्धतीने मिळवायला हवे. तसेच त्या लक्ष्मीचा उपयोग पवित्र हेतूनेच केला जावा. असा विचार केला तर काळे धन ही संकल्पना आलीच कशी असा विचार येतो.
ज्ञान, धन हे दोन्ही मानव जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्याबद्दल योग्य विचार, संस्कार हवेत. भारतातील एकत्र कुटुंबात अनेक वेळा जाणते-वृद्ध असे संस्कार सहज देत असत. त्यासाठी वेगळे तास, संस्कार वर्ग घरात असत, शाळेत नव्हे.
मला आठवते तिन्हीसांजेच्या वेळी प्रार्थना, भजन, कथा.. वगैरे असत. त्यात बहुतेक सर्वजण सहभागी होत. त्यावेळी असे संस्कार आपोआप मिळत. तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणीत या अशा घटना असतील ज्या सुखद असतील.
माझी आजी म्हणायची- तुमच्या शिक्षणाचा म्हणजेच ज्ञानाचा सदुपयोग करा. इतरांची सेवा करा. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. तसेच धन चांगल्या मार्गानेच कमवा, ते समाजोपयोगी कामांसाठी वापरा. धन लोकांच्या आशीर्वादासहित द्यायला हवे. त्यात तुमचे व तुमच्या घराण्याचे कल्याण आहे. श्रापाचे धन नको. त्याने सर्वांचा नाश एक दिवस होणारच. असे धन दुःखदायक असते.
पुढे म्हणत- आपल्या पूर्वजांनी घराण्याचे नाव एका विशिष्ट चांगल्या पायरीवर अत्यंत कष्टाने आणले आहे. ते आणखी वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करा. जमले नाही तरी ठीक. पण ते खाली येऊ देऊ नका. लोकांनी म्हणायला नको की -अरे, हा तर चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातला आणि हा असा वागतो…
त्या पुढे म्हणत- संस्कार सर्वांना द्या- मुलींना व मुलांनाही. पण मुलींना मुख्यत्वे जास्त द्या नाहीतर त्या दोन घरांचा नाश करतील. खरेच किती सुंदर आणि ज्ञानपूर्ण विचार आहेत हे. तसे बघितले तर असे विचार सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तीकडूनच अपेक्षित आहेत. पण आजी तर शिकलेली नव्हती. म्हणजे ती साक्षर नव्हती तरीही सुसिक्षित व सुसंकृत होती.
स्त्रियांना चांगले संस्कार द्यायला हवेत. यावर चिंतन करताना लक्षात येईल की इतिहासाकडे नजर टाकल्यास असे दिसते की काही स्त्रियांनी या क्षेत्रात प्रभावी व वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. उदा. भक्त प्रल्हाद याची आई-कयाधु. तिने त्याला चांगले संस्कार दिले म्हणून तो महान विष्णुभक्त ठरला. आणि म्हणूनच राक्षस मानल्या गेलेल्या त्याच्या वडीलांचे – हिरण्यकश्यपुचे कुसंस्कार त्याच्यावर झाले नाहीत.
तसेच शिवबाची आई जिजामाता हिने आपल्या बाळाला देशप्रेमाचे धडे व संस्कार दिले आणि ते राजा शिवछत्रपती झाले. खरे म्हणजे शिवबाचे वडील शहाजीमहाराज मोगलांचे आश्रित होते. याउलट रावणाच्या आईने (कैकसी) त्याच्यावर वाईट संस्कार केलेत त्यामुळे महान शिवभक्त व वेदशास्त्र पारंगत असूनही रावण राक्षस ठरला.
अशी अनेक उदाहरणे बघितली की संस्कारांचे महत्त्व लक्षात येते. पण आता घऱांमध्ये असे सुसंस्कार मिळत नाहीत. कारण आजी-आजोबांची जागा दूरदर्शनने घेतली. दुःख याचे की घरातील वृद्ध मंडळीसुद्धा छोट्यांना संस्कार देण्याऐवजी दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघतात. आता त्यातही उत्कृष्ट बोधप्रद असे कार्यक्रम आहेत, पण ते बघणारे लोक अगदी नगण्य आहेत. म्हणूनच स्वाध्यायाची ङ्गार गरज आहे व तेही नियमितपणे.
अनेक संस्थांची अशी नियमित स्वाध्यायकेंद्रे आहेत. त्यात पू. पांडुरंगशास्त्रीजींच्या स्वाध्याय परिवाराचीही आहेत जी दर आठवड्याला एक तास चालतात. ही केंद्रे तर जीवनविकासाच्या सुरुवातीची पायरी आहे. थोडे थोडे ज्ञान घेतल्यावर अशा व्यक्तिंना जीवनविकासाची ओढ लागते. मग ते आपल्या इच्छेनुसार वरच्या पायर्‍या चढतात. त्यात मुख्य कृतीभक्ती ज्यामध्ये ङ्गार मोठा कर्मयोग सामावलेला आहे. त्यामुळे गावातील विविध लोकांशी संपर्क वाढतो. विचारांची देवाण-घेवाण होते. त्या गावात स्वाध्याय सुरू होतो व ते गावकरीही या प्रक्रियेत पुढे जातात.
पन्नास-साठ वर्षांपूर्वी पायवाट असलेला हा मार्ग आता राजरस्ता झालेला आहे. शास्त्रीजींनी सुरुवातीला एकट्याने या पायवाटेने जाण्यास सुरुवात केली होती. पण त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच व प्रगल्भ ईशश्रद्धेमुळे आज ारतातच नव्हे तर विश्‍वातील अनेक देशात त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले स्वाध्यायी कार्य करीत आहेत. आणि मानव जातीतील प्रत्येक घटक म्हणजे बाल-युवक-महिला-पुरुष-सुशिक्षित-अशिक्षित सर्व आज अत्यंत चांगले अनुभव घेत आहेत.
विश्‍वातील वाईट घटनांमुळे सगळीकडे अंधकार दिसत आहे. त्यावेळी अशा संस्था दीपस्तंभासारख्या कार्य करतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीने अशा कार्यात सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे- स्वतःच्या आणि विश्‍वाच्या सुखा-आनंदासाठी ही प्रथम पायरी आहे- स्वाध्याय – शास्त्रशुद्ध ऋषीप्रेणित स्वाध्याय.