योगमार्ग – राजयोग 

0
133

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २५४)

(स्वाध्याय – २२)

विश्‍वांतील सर्व जाणकार सांगतात की सर्व जीवांत प्राण असतो. कृमी-कीटक, पशू-पक्षी, मानव, वृक्ष-वनस्पती… पण वृक्षवनस्पती सोडल्या तर इतरांत आत्मा असतो. भारतीय तत्त्ववेत्ते या विषयावर विवरण देताना म्हणतात, ‘हा आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे. तो चौर्‍यांशी लक्ष योनीत जन्म घेऊन शेवटी अत्यंत उच्च व श्रेष्ठ अशा मनुष्य योनीत जन्म घेतो. प्रत्येक जन्मात त्याचा थोडा थोडा जीवनविकास अभिप्रेत आहे. शेवटी तो आत्मा अनेक जन्मांनंतर त्याच परमात्म्यात विलीन होतो अर्थात संपूर्ण जीवन विकास झाला तरच!

अशा या आत्म्याला सद्विचार, सुसंगती, सुसंस्कार प्राप्त होणे आवश्यक आहे. नाहीतर तो आत्मा अधोगतीला जाऊन परत पशू योनीत जन्म घेतो. म्हणूनच मानवजातीच्या कल्याणासाठी आपले ऋषिमुनी एक छान मंत्र देतात–
‘‘तस्मात् स्वाध्याय प्रवचनाभ्याम् न प्रमदितव्यम्’’
– स्वाध्याय करण्यास आळस करू नकोस. श्रीयोगेश्‍वर स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवलेंनी या एकाच मंत्राच्या आधारावर फार मोठा परिवार उभा केला. या मंत्रामुळे प्रत्येक मानवाला जीवनात एक ध्येय प्राप्त होते. त्याचा आत्मविकास होतो. जीवनातला श्रेष्ठ संबंध म्हणजे प्रभुप्रेम त्याला प्राप्त करता येते. असे करता करता त्याला आत्म्याचे अंतिम ध्येय साध्य होते.
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती म्हणजे मंत्र अनेक आहेत. काही मंत्रांचे (फक्त) सतत पारायण अपेक्षित आहे. त्यामुळे आत्मशक्ती नक्की प्राप्त होते. उदा. गायत्रीमंत्र, महामृत्युंजय मंत्र, सूर्यनमस्कारमंत्र, प्राणायाममंत्र … पण अनेक मंत्र फक्त पोपटासारखे म्हणून उपयोगी नाहीत तर त्यांवर चिंतन हवे. तदनंतर त्याप्रमाणे आचार, उच्चार, विचार जरुरी आहे. स्वाध्यायाबद्दलचा मंत्र या गटात येतो.
स्वाध्याय करणारा श्रोतृवर्ग नियमित स्वाध्याय केंद्रांना एकत्रित होतो. जीवनविकासाबद्दल विचार ऐकतो. त्यांना ठाऊक आहे- ‘‘श्रुतं हरति पापानि’’.
शास्त्रीजी या संदर्भात सांगतात – पाप म्हणजे क्षुद्रता, लाचारी. स्वाध्यायाद्वारे हे सर्व निघून जाते. इथे येणारे स्वाध्यायी अभ्यासू व निष्ठावान आहेत. सर्व श्रोते साधुत्वासाठी प्रयत्नशील आहेत. ते स्वाध्यायासाठी आत्मविकासाचे ध्येय गाठण्यासाठी कृतनिश्‍चयी बनतात.
कोणताही भेदभाव न मानताना स्वाध्यायी एकमेकांना प्रेमाने, आत्मीयतेने भेटतात. त्यांना वैदिकांनी केलेल्या घोषणेची आठवण आहे…
‘‘वसुधैव कुटुंबकम्’’
सर्वांचे रक्त बनवणारा एकच आहे. त्यामुळे ते
‘‘दैवी भ्रातृभाव ’’ मानतात.
– ऊर्ळींळपश इीेींहशीहेेव र्ीपवशी षरींहशीहेेव ेष ॠेव.
या दैवी प्रेमाचा, संबंधाचा प्रत्यक्ष अनुभव व अनुभूती घेण्याचा ते प्रामाणिक प्रयास करतात.
स्वाध्यायींना माहीत आहे…
‘‘ज्ञानं भारः क्रियांविना’’
– कृतीविरहित ज्ञान ओझे आहे, कृतीविरहित प्रेम दंभ आहे. कृती तर प्रत्येकजण करतच असतो. पण या कृतीमागे प्रेरणा वेगवेगळी असते.
शास्त्रीजी म्हणतात, ‘कोणतेही कर्म करण्याच्या क्रियेत किंवा इच्छेत तीन गोष्टी दिसतात ः-
१. पुण्यासाठी कर्म केल्याने फळ मिळते.
२. निष्काम कर्म केल्याने विकास होतो.
३. प्रभूप्रीत्यर्थ, आनंदासाठी कर्म केल्याने भक्ती होते. स्वाध्यायी तिसर्‍या तर्‍हेचे कर्म म्हणजे प्रभूप्रीत्यर्थ, आनंदासाठी कर्म करतात.
पू. पांडुरंगशास्त्रीजी भक्तीबद्दल बोलताना सांगतात की भक्ती दोन प्रकारची असते.
अ) भावभक्ती – म्हणजे पूजा-मंत्र-अर्चा-आरती-भजने-प्रसाद…इत्यादी. कर्मकांडात्मक गोष्टी. या सर्व गोष्टी मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहेत.
ब) कृतीभक्ती – यामध्ये लोकांना भेटणे – ही कृती प्रमुख आहे म्हणून स्वाध्यायी भावफेरी, भक्तीफेरी करतात. आपल्या घराच्या आसपास, गावांत, दूरच्या गावांत किंवा परदेशांत जातात. हे फिरणे देखील विशिष्ट दिवशी असते. – आठवड्यातून एकदा, महिन्यांतून एकदोन दिवस किंवा वर्षांतून आठ दिवस अशा भेटण्यामुळे परस्पर भाव वाढतो. याचे कारण म्हणजे दृष्टिकोन – दुसर्‍यांबद्दल प्रेम व आत्मीयता. दुसरा ‘दुसरा’ नाही तर आपलाच दैवी भाऊ किंवा बहीण आहे. त्यामुळे इथे कसलाही भेदभाव असत नाही.
शास्त्रीजी समजावतात…
* आपला रक्ताचा संबंध नसेल पण रक्त बनवणार्‍याचा संबंध नक्कीच आहे. अशा तर्‍हेने नियमित स्वाध्याय, भावफेरी-भक्तीफेरी केल्यामुळे व्यक्तीचा जीवनविकास आपोआप व्हायला लागतो. तदनंतर इतरांमध्ये सत्‌संगतीमुळे बदल व्हायला लागतात.
अनेकजण विचारतात – ‘‘तुम्ही स्वाध्यायी नियमित एका गावात जाता, मग ते लोक सुधारले का?’’
स्वाध्यायी सांगतात-
* आम्ही इतरांना सुधारण्यासाठी जात नाही. स्वतःला सुधारण्यासाठी जातो. त्यामुळे आम्ही स्वतःचा ‘स्वाध्याय’ करतो व वेळोवेळी आत्मपरीक्षण करतो. माझे विकार, वासना, अहंकार किती कमी झाले आहेत? षड्‌रिपू – काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर कसे आहेत? माझा जीवन-विकास होतो आहे ना?
* तसेच आम्ही इतरांना उपदेश करण्यासाठी सुद्धा जात नाही. कारण उपदेश करण्याचा हक्क संत-महापुरुषांचा आहे. आम्हीच जीवनविकासाच्या रस्त्यावरचे विद्यार्थी आहोत मग इतरांना काय शिकवणार? त्याचप्रमाणे इथे प्रचाराची भावना नसते. याठिकाणी कृतीत असते फक्त प्रेम व आत्मविकासाचे अंतिम ध्येय.
स्वाध्यायी गावोगावी फिरतात तेव्हा त्यांचा स्वार्थ नसतो. तसेच ते निरपेक्ष, निराकांक्ष भावाने सर्वांना भेटतात. विभिन्न प्रकृतीच्या, विभिन्न स्तरातील व्यक्तींशी संपर्क येतो. शास्त्रीची सांगतात…
– समाजात साधारणतः तीन वर्ग असतात- उच्च, मध्यम, कनिष्ठ यांच्याशी कसे वर्तन, कसा संबंध ठेवायचा याबद्दल गीतेत श्रीकृष्ण उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.
– आपल्याहून उच्च वर्गाशी ‘अद्वेष्टा’ रहायचे – त्यांच्याबद्दल द्वेषरहित दृष्टी ठेवायची.
– समान कक्षेतील लोकांशी ‘मैत्रः’ म्हणजे मित्रतेची भावना राखायची.
– कनिष्ठ वर्गाशी ‘करुणः’ – करुणेची दृष्टी बाळगायची. आजच्या जमान्यात वरिष्ठांबद्दल धिक्कार, समान कक्षेतील लोकांबद्दल तुच्छता आणि कनिष्ठांबद्दल तिरस्कार भरलेला दिसतो. अशा या काळात गीतेची उपरोक्त स्वाध्यायी दृष्टी मानवाला दिव्य जीवनाचा साक्षात्कार घडवीत आहे.
आजच्या तथाकथित सख्ययुगात(कॉम्रेडशिप) गीताकथित ‘मित्रता’ सर्वोच्चस्थानी आहे. गीता सांगते…
‘जेथे स्नेह आहे पण मताग्रह नाही ती खरी मैत्री
जेथे स्नेह आहे पण स्वामित्व नाही ती खरी मैत्री
जेथे स्नेह आहे पण सत्ता नाही ती खरी मैत्री
जेथे स्नेह आहे पण स्वार्थ नाही ती खरी मैत्री’
पक्षाला उघडण्यासाठी दोन पंख असतात. तसेच शास्त्रीजी म्हणतात की भक्तीचे दोन पंख आहेत. भावभक्ती नि कृतीभक्ती. आज भावभक्तीच सर्वत्र दिसते. कृतीभक्ती दिसत नाही. त्यामुळे आजची भक्ती पांगळी झाली आहे. भक्तीचा परिणाम- जीवनविकास- दिसत नाही. वैदिक काळात – एकादशी, तीर्थयात्रा, यज्ञ यासाठीच केल्या जात. पण आता एकादशी म्हणजे फक्त उपवास किंवा खाण्यात बदल किंवा व तीर्थयात्रा म्हणजे विविध धार्मिक ठिकाणांची यात्रा म्हणजे ‘‘टूर’’ करणे एवढेच राहिले आहे. यज्ञ म्हणजे अग्नीत आहुती…
स्वाध्यायाच्या माध्यमातून पू. पांडुरंगशास्त्री संस्कृतीच्या सर्व आयुधांचा जीर्णोद्धार करताहेत.
मला तर वाटते की श्रीविष्णुच्या वामनावतारात त्या छोट्या वामनाच्या तीनच पावलांनी सर्व सृष्टी पादाक्रांत केली तसेच ‘स्वाध्याय’ या शब्दाची तीनच अक्षरे अखिल विश्‍वाला व्यापत आहेत. गरज आहे ती शास्त्रशुद्ध अभ्यास व जीवनात आणायची तयारी.