योगमार्ग-राजयोग – शवासन ः

0
96
  • डॉ. सीताकांत घाणेकर

 

शवासारखे जमिनीवर पडून राहणे. अनेकांना वाटते की ही गोष्ट अगदी सोपी आहे. पण करायला गेल्यावर लक्षात येते की शवासन करणे, वाटते तेवढे सोपे नाही. शवामध्ये आत्मा व प्राण निघून गेलेला असतो, म्हणून शरीर मृत होते. पण इथे तर व्यक्ती जिवंत असते त्यामुळे मन, बुद्धी रुधिरज असतात. शवासनामधील आंतरिक शांतीचा अनुभव घ्यायचा असतो. ही क्रिया अत्यंत सक्ष्म असते. माकड मनात विचारचक्र चालू असले तर मनःशांती कुठली? म्हणून सर्व आसने, तसेच शवासन शास्त्रशुद्ध करणे योगसाधनेमध्ये अपेक्षित आहे.

मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण आहे, पण जर शवासनाच्या आधींची सर्व आसने व इतर तंत्रे व्यवस्थित केली तर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे सोपे होते. तसेच शवासन करताना एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब केला तरीदेेखील संपूर्ण मनःशांतीचा लाभ घेणे शक्य आहे. पण गरज आहे ती नियमिततेची. सुरुवातीला थोडे कष्ट होणारच पण सरावानंतर उत्कृष्ट शांतीचा अनुभवच नव्हे तर अनुभूती येईल. काही उदाहरणे घेतली तर हा सूक्ष्म मुद्दा समजणे सोपे होईल.
– अनेकांच्या घरी पाळीव कुत्रा असतो. हा कुत्रा अगदी लहान असतानाच आणला जातो. त्याच्या गळ्यात पट्टा टाकला जातो. त्याला एका ठिकाणी बांधून ठेवले जाते. नाहीतर त्याला असाच सोडला तर तो पळून जाईल. कारण त्याला आपले घर, स्वतःचे स्थान काहीच माहीत नसते.

त्या कुत्र्याला मध्ये मध्ये आपण पट्‌ट्याला धरून दिवसातून एक-दोन वेळा बूाहेर फिरवून आणतो. त्यावेळी तो कुत्रा आजूबाजूच्या कुत्र्याचे निरिक्षण करत, थोड्या दिवसांनी त्याला सर्व खुणा व आपले घर तसेच त्याची घरातील विशिष्ट जागा, तेथील माणसे, त्यांची जेवणाची वेळ, झोपेची जागा… सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती मिळते. त्याचबरोबर त्याला कुटुंबातील व्यक्तिंचे प्रेम मिळते. इथे देखील कोण किती प्रेमळ आहे त्याचे ज्ञान त्याला होेते. जनावर जरी असले तरी प्रत्येक जीवाला प्रेम, जिव्हाळा हवाच असतो. फक्त निवारा व जेवण मिळाले तर पुरत नाही. या सर्व वस्तूंबरोबर सुखाचा अनुभव हवाहवासा वाटतो. कुत्र्यासारख्या जनावराची जर ही स्थिती तर बुद्धिमान अशा मानवाची काय स्थिती होणार? त्याच्या मनात तर विविध विकार, वासना, षडरिपू असतात.
अशा या कुत्र्याला थोड्या दिवसांनी बाहेर सोडून दिले तरी तो कुत्रा व्यवस्थितपणे घरी येतो आणि तो सुद्धा ठरल्यावेळी- मुख्य म्हणजे जेवणाची वेळ किंवा रात्री निवार्‍यासाठी.

अगदी असेच शिक्षण मनाला देणे अपेक्षित असते. आपले मन कुठे, कुठल्यावेळी असावे, याचे नियंत्रण त्या व्यक्तीकडे असायला हवे. म्हणून भारतात पुरातन काळात योगसाधना बालपणीच आश्रमांत सुरू करत असत.
आता तसे काही घडत नाही. बहुतेकजण तरुणपणी किंवा वृद्धापकाळी योग सुरू करतात. त्यावेळी मनाची स्थिती रस्त्यावरील कुत्र्यासारखी असते- त्याला ना घर ना एक ठिकाण. मग अशा कुत्र्याला आपण आपल्या घरी पाळायचे ठरवले तर तो एका ठिकाणी राहणे फार कठीण होईल, पण अशक्य मात्र नाही. त्याला एक चांगला उपाय म्हणजे त्या रस्त्यावरील कुत्र्याला प्रेमाने नियमितपणे एका विशिष्टवेळी खायला, प्यायला द्यायचे. आपल्यावर त्याचा थोडा विश्‍वास बसल्यावर त्याला आपल्या अंगणात आणायचे. थोडे दिवस त्याला नियमित जेवण आणि एक आसर्‍याचे ठिकाण मिळाल्यावर तो कुत्रा सहज आपला होईल.

अशा तर्‍हेने त्याला हळूहळू शिकवले की मग त्याला आपण चांगली आंघोळ घालून पट्टादेखील घालू शकू. सुरुवातीला त्याला जरा राग येईल. कारण आधी तो पाहिजे तिथे जायला शकत होता, आता त्याच्यावर बंधन आले. पण इतर गोष्टी व्यवस्थित वेळी जेवण खाण व आसरा त्याला नियमित मिळायला पाहिजे. त्यामुळे त्याला इथे आराम मिळतो हे समजणार. मग तो तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे वागेल. कारण त्याला सुद्धा इथे सुखशांती आणि तुमचे प्रेम मिळते याची जाणीव होईल.
भटक्या कुत्र्याला जसे शिक्षण दिले जाते, अगदी त्याच धरतीवर योग साधनेमध्ये मनाला दिले जाते. विविध तंत्रांमध्ये श्‍वास, आसने… मनाला कुठे तरी अडकवून ठेवायचे. त्यामुळे स्थिर राहायची सवय होते. अशा नियंत्रित मनाला ज्यावेळी साधक शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर लक्ष द्यायला केंंद्रित करते त्यावेळी ते तिथे व्यवस्थित राहते.

याबरोबर जर ‘ॐ’ शब्दाचा वापर केला तर त्या शब्दांच्या कंपनांमुळे मन आणखी शांत व्हायला मदत होते. पण या शब्दाचे भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व काय आहे हे समजणे अत्यावश्यक आहे. शास्त्रकार सांगतात की ॐ हा शब्द साधा नाही. त्याला शेकडो अर्थ आहेत. अनेक श्लोक व प्रार्थनांमध्ये ॐचा उपयोग केला जातो. जास्त करून या शब्दातून जरी कंपने येत असली तरी ती व्यवस्थित यावीत, याचा अभ्यास करावा लागतो.
विविध मंत्रांची सुरुवातच ‘ॐ’ने होते.
– ॐ गं गणपतये नमः
– ॐ नमः शिवाय
– ॐ नमो भगवते वासुदेवाय
– ॐ श्री दुर्गाय नमः
गायत्री मंत्राची व महामृत्युंजय मंत्राची सुरुवातदेखील ॐ या शब्दापासूनच सुरुवात होते.

– ॐ भुर्भुवः स्वः तत्सवितुर्व रेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियोयोनः प्रचोदयात (गायत्री)
पुढे जाऊन ॐ चे विश्‍लेषण केले तर लक्षात येईल की, ‘ॐ’ शब्द तीन अक्षरांच्या संधितून आलेला आहे. ‘अ उ व म’.
या तीन अक्षरांना देखील आपल्या पूर्वजांनी धार्मिक व आध्यात्मिक अर्थ दिला.
– ‘अ’ कार तो ब्रह्मा
– ‘उ’ कार तो विष्णू
– ‘म’ कार महेश.
एवढेच नव्हे तर गणपतीमध्ये त्यांना ॐ काराचा साक्षात्कार झाला. म्हणूनच ते म्हणतात-
‘ॐ स्वरुप रुप गणेशाचे’
आता ‘अ-उ-म’ किंवा ओम म्हणताना जर या आदिदेवांची आठवण केली तर मनात सहज पवित्रता येईल. त्याच्या अस्तित्वाची जाणीव मनाला झाली तर मनःशांतीचा अनुभव सहज मिळेल. पण गरज आहे ती म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची, त्याच्या विविध रुपांची, त्याच्या क्षमतेची, त्याच्या आपल्यावरील प्रेमाची.
योग हे एक वैश्‍विक विज्ञान झालेले आहे. वरील देव फक्त हिंदू धर्मिय मानतात. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की इतर धर्मांत व भाषांत ओम् शब्दाचा उपयोग आहे.
उदा. ख्रिस्ती धर्मामध्ये देवाबद्दल बोलताना ते म्हणतात की, तो सर्वत्र आहे. सर्वशक्तिमान आहे, —- ते शब्द वापरता ते म्हणजे-
ओम्नी प्रेझेंट
ओम्नी पोटंट
ओम्नी सियंट.
म्हणजे भगवंताबद्दल बोलताना देखील त्यांना ‘ओम्’ या अक्षराचा उपयोग करावा लागतो.

त्याशिवाय ख्रिश्‍चनांचे जे पवित्र स्थान आहे रोम त्यामध्येदेखील ‘ओम’ आहेच.
मुसलमान देखील एकमेकांना भेटताना म्हणतात-
सलामाले कोम – (क+ओम)
भाषातज्ञांनी थोडा अभ्यास केला तर ‘ॐ’ शब्दाची व्यापकता लक्षात येईल.
कौतुक वाटते ते आपल्या थोर ज्ञानी ऋषींचे. त्यांनी ॐ च्या स्पंदनाचा सखोल अभ्यास केला. त्यांनी शब्दाला व त्यातील तीन अक्षरांचा संबंध भगवंताकडे लावला व या सगळ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या धार्मिक विधीमध्ये तसेच योगसाधनेमध्ये केला.
शवासन करताना जर हे तत्वज्ञान लक्षात घेतले तर मनात पवित्रता येईल व त्यामुळे इतर वाईट किंवा नको असलेले विचार मनात येणार नाहीत. मनःशांतीचा अनुभव आपोआप येईल.
योगसाधकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून स्वतःची अनुभूती घ्यावी हेच खरे.