योगक्षेमं वहाम्यहम्

0
145
  •  डॉ. व्यंकटेश हेगडे

ध्यान ही योगाची श्रेष्ठ अवस्था. योग ज्याच्या कणाकणात बहरला त्याच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रगल्भता, सकारात्मकता, सृजनशीलता व क्रियाशीलता बहरते. योगातून आध्यात्मिक प्रगतीही होते.

योग म्हणजे शरीर आणि मन यांचे मीलन. आम्हाला शरीर आहे आणि न दिसणारे मनही आहे. शरीरात जेव्हा कुठलंही दुखणं नसतं, शरीर जेव्हा तंदुरुस्त असतं, तसंच मन तेव्हा विचारांतून व विकारांतून मुक्त असतं. मनात मत्सर, राग, ईर्षा, भय, वासना आदी विकार नसावेत. मात्र मन आणि शरीर एकरूप होते. योग बहरतो.
शारीरिक योगात विविध आसनं आहेत. आमच्या पूर्वजांनी, ऋषिमुनींनी अगदी बारकाईने आमच्या शरीराचं निरीक्षण करून कित्येक आसनं निर्माण केली आहेत. त्या योगासत्रात प्रत्येक स्नायू ताणला जातो आणि तो ताणलेला स्नायू मजबूत होतो. शरीराच्या नियमानुसार जे स्नायू जास्त वापरले जातात किंवा ताणले जातात ते स्नायू अधिक मजबूत होत असतात. शरीरात अनेक स्नायू असतात. प्रत्येकाचं कार्य सुंदर आणि वेगळं असतं. पण आपल्या जीवनशैलीनुसार आपण काही स्नायू जास्त वापरतो किंवा काही स्नायू वापरतच नाही.

आपल्या योगासनांमधली सगळी आसनं केली की सर्व स्नायू वापरले जातात व मजबूतही होतात. स्नायू योगासनांमुळे ताणले जातात तेव्हा त्या क्षणी त्यांची मनाकडे असलेली जोडणी उत्तेजित होते आणि मन शांत अन् आनंदी होते. याच मनाला प्रेमाचा पाझरही फुटतो. अनेक व्याधींवर योग्य योगासनं केली तर त्या व्याधी बर्‍या होतात. मुख्यत्वे पाठीच्या कण्याची कैक दुखणी योगासनांतून बरी होतात. एखाद्या दुखण्यावर म्हणून बाकी औषधांबरोबर योगासनांची गरज असल्यास योगासनं करावी. रोज योगासनं केली तर कित्येक दुखणी होण्यापासून आपण बचावतो. मन शांत झाल्याने मनाच्या ताणतणावांतून होणार्‍या दुखण्यांना आराम मिळतो.

प्राणायाम हा योगाचा श्रेष्ठ प्रकार. आपण जन्माला आलो तेव्हा एक लांब श्‍वास घेतला. त्या श्‍वासातून वास्तविक आपण प्राणवायू आत घेतो आणि कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर फेकतो. पण याच स्वसनक्रियेत किती शक्ती आहे हे योगाच्या माध्यमातून उमगतं. आपल्या मनात ज्या भावना असतील त्यायोगे आपला श्‍वास बदलतो. आनंदी मनाचा श्‍वास आणि तणावयुक्त मनाचा श्‍वास वेगळा. तात्पर्य, श्‍वास आणि मनाचा अगदी जवळचा संबंध असतो. प्राणायाम या श्‍वासप्रकारातून मनशांती लाभते, मन शक्तिमान होतं. विश्‍व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे तर सुदर्शन क्रिया ही श्‍वासपद्धती शिकवतात. यातून अगदी तणावग्रस्त मन शांत होतं. मनातील विकारांचा नाश होऊन मन सात्त्विक बनतं. सहज ‘ध्यान’ त्या योगाच्या श्रेष्ठ व उच्च स्थितीत जातं. ध्यानात मनाची एकाग्रता, मनःशांती, मनाची अत्यंत आनंदी स्थिती सामावलेली आहे. मनातून स्रवणारे प्रेम, करुणा यांचा प्रत्यय येतो. श्री श्री रविशंकर जी सुदर्शन क्रिया शिकवतात त्यातून स्वसनक्रियेचे व सर्दी, खोकला, दमा आदी विकार बरे होतात. कारण एरव्ही आपल्या फुफ्फुसाचा एक तृतियांश भागच काम करतो. पण सुदर्शन क्रिया, भस्त्रिका आदी योगपद्धतीमध्ये पूर्ण फुफ्फुस वापरतो. त्याने छातीही मजबूत होते आणि फुफ्फुसही मजबूत होते. तिथले विकार बरे होतात.

ध्यान ही योगाची श्रेष्ठ अवस्था. यामध्ये मनात विचार-विकार-तणाव नसवा. मग माणूस आपल्या प्रेममयी, आनंदमयी व शांत चैतन्यात येतो. स्वतःच्या या तीन गुणांचा साक्षात्कार त्याला होतो. मग हे गुण त्याच्या कृतीतही प्रतिबिंबीत होतात.
योग ज्याच्या कणाकणात बहरला त्याच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रगल्भता, सकारात्मकता, सृजनशीलता व क्रियाशीलता बहरते. योगातून आध्यात्मिक प्रगतीही होते.