योकोसो जपान!

0
192

जपानी भाषेत ‘योकोसो’ म्हणजे स्वागत. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे भारत भेटीवर आले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेहमीच्या झगमगाटी शैलीत अहमदाबादेत रोड शो वगैरे करून त्यांचे जाहीर स्वागत केले. यापूर्वी मोदींनीही जपानला भेट देऊन मैत्रीचे बीज रोवले होते. आज अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणार असलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनची मुहूर्तमेढ दोन्ही पंतप्रधानांकडून रोवली जाईल. जपानकडून या बुलेट ट्रेनसाठी अत्यल्प व्याजदरात ८१ टक्के कर्जपुरवठा होईल आणि तंत्रज्ञानही पुरवले जाईल, परंतु केवळ तेवढ्यासाठी जपानी पंतप्रधानांची ही भेट महत्त्वाची नाही, तर चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या घसटीच्या पार्श्वभूमीवर भारत – जपान यांची ही वाढती जवळीक दक्षिण आशियाच्या आर्थिक, सामरिक समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे म्हणून या भेटीचे महत्त्व आहे. चीन हा जपानचा मोठा शत्रू आहे. सागरी हद्दीवरून आणि सेनकाकू बेटांवरून दोघांत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे केवळ भारत आणि जपानच नव्हे, तर भारत – जपान आणि अमेरिका अशी तिहेरी जवळीक अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक आणि चीनला शह देण्यासाठी विकसित झालेली आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या मलबार नाविक कसरतींमध्ये जपानला सहभागी करून घेणे, या तीन देशांदरम्यान त्रिपक्षीय परिषद होणे, या सगळ्या घडामोडींना विलक्षण अर्थ आहे. या तिन्ही देशांत मिळून जगाची पंचवीस टक्के लोकसंख्या राहते आणि जागतिक उत्पन्नामध्ये या तिन्ही देशांचा वाटा पस्तीस टक्के आहे. असे हे देश एकत्र येणे हे निश्‍चितच चीनच्या विस्तारवादी धोरणांना अटकाव करणारे ठरणार आहे. जपान आणि भारत यांचे संबंध अनेक वर्षांपासूनचे असले, तरी गेल्या काही काळामध्ये त्यांना अधिक बळकटी आली आहे. राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्सप्रमाणे जागतिक क्षितिजावर भरारी घेतलेल्या जपानने भारतामध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. बुलेट ट्रेनपासून अणुप्रकल्पांपर्यंत आणि औद्योगिक गुंतवणुकीपासून साधनसुविधा निर्मितीपर्यंत अनेकपदरी गुंतवणूक जपान करू लागला आहे. ‘जायका’ प्रकल्पांतर्गत तर अनेक कामे सुरू आहेत. ईशान्य राज्यांमध्ये त्याखाली रस्ते बांधले जात आहेत. दिल्ली – मुंबई दरम्यान औद्योगिक कॉरिडॉर जपान बांधणार आहे. भारत – जपान दरम्यान गेल्या वर्षी नागरी अणुकरार झालेला आहे आणि त्याअंतर्गत भारतात सहा अणुभट्‌ट्या जपान उभारणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक गरजांची पूर्तता करणार्‍यांमध्ये जपानचाही समावेश झालेला आहे. जपानकडून भारत अंदमानच्या परिसरात टेहळणीसाठी अँफिबियस विमाने खरेदी करणार आहे. शिवाय ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात जपान गुंतवणूक करणार आहे ती वेगळी. या सगळ्या घटनाक्रमाला निश्‍चितच काही विशेष अर्थ आहे. मुख्यत्वे चीनची विस्तारवादी नीती लक्षात घेऊन त्याला शह देण्यासाठी भारत – जपान एकत्र येणे गरजेचे आहे. सागरी सुरक्षा, व्यापार, अणुऊर्जा अशा अनेक बाबतींमध्ये हे साहचर्य उपकारक ठरणार आहे. बुलेट ट्रेनच्या तंत्रज्ञानात जपानने सर्वांत प्रथम यश संपादन केले होते. फुजी पर्वताच्या पार्श्वभूमीवरून टोकियो ते ओसाकादरम्यान धावणारी त्यांची बुलेट ट्रेन साठच्या दशकातच सुरू झाली होती. ते साडेपाचशे कि. मी. चे अंतर ती ट्रेन आज दोन तासांत पूर्ण करते. अलीकडे मात्र चीनने जपानवर या गतिमान रेलच्या तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे. इंडोनेशिया, थायलंडसारख्या देशांमध्ये चीनने बुलेट ट्रेन उभारण्यासाठी पुढाकार घेतला. साहजिकच जपानचे या क्षेत्रातले महत्त्व कमी होत चालले आहे. त्यामुळे भारतामध्ये पाऊल ठेवणे जपानसाठीही प्रतिष्ठेचे ठरणार आहे. वास्तविक चीनमध्ये बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध आहे आणि जगातील सर्वांत वेगवान ट्रेनही चीनमध्येच धावतात. शांघाय मॅगलेन (मॅग्नेटिक लेनिटेशन) ही रेलगाडी जगातील आजची सर्वांत वेगवान चुंबकीय शक्तीवर धावणारी रेलगाडी असून तिचा वेग ताशी ४३० कि. मी. आहे. परंतु चीनपाशी हे प्रगत तंत्रज्ञान असूनही जपानकडून भारताने मदत घेणे म्हणजे चीनने पाकिस्तानशी चालवलेली चुंबाचुंबी, पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा चीन – पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर, लडाख, अरुणाचल, डोकलाममध्ये भारताची काढलेली कुरापत, वन बेल्ट वन रोडखाली चाललेला विस्तारवाद या सगळ्याला दिलेले चोख प्रत्युत्तरच आहे. जगातील सर्वांत मोठे रेल्वेचे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेवर सातत्याने होणार्‍या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर या बुलेट ट्रेनची आवश्यकता, त्यावर होणारा एक लाख दहा हजार कोटींचा खर्च वगैरे स्वतंत्र विषय आहेत, परंतु यानिमित्ताने भारत – जपान यांच्यात निर्माण झालेले साहचर्य चीनसाठी चिंतेचा विषय ठरल्यावाचून राहणार नाही.