येस बँक : राणा कपूर यांना ३ दिवस कोठडी

0
197

>> कन्या रोशनी कपूर यांना विमानतळावर ईडीने घेतले ताब्यात

लंडनला जाणार्‍या विमानात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या येस बँकेच्या संस्थापक राणा कपूर यांची कन्या रोशनी कपूर यांना काल ईडीच्या अधिकार्‍यांनी विमानतळावर रोखले. ईडीने त्याआधीच राणा कपूर यांचे जावई आदित्य यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबावर लुक आऊट नोटीस बजावली होती. दरम्यान रविवारी ईडीने अटक केलेले राणा कपूर यांना विशेष न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने ११ मार्चपर्यंत कोठडी दिली.

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर अधिकार्‍यांनी त्यांची ३६ तास कसून चौकशी केली. अवैध मालमत्ताप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. सध्या ईडीकडून राणा कपूर यांच्यासह त्यांची पत्नी बिंदू, तीन मुली रोशनी कपूर, राखी कपूर टंडन व राधा कपूर यांची चौकशी सुरू आहे.

त्यांच्या नियंत्रणाखालील एका कंपनीला ६०० कोटी रुपये घोटाळ्याचा संशय असलेल्या देवन हौसिंग- फायनान्स लिमिटेड या कंपनीकडून मिळाल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

राणा कपूर यांच्याकडून
२००० कोटींची गुंतवणूक
ईडीच्या आतापर्यंतच्या चौकशीतून येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांनी देशाच्या विविध भागांतील मालमत्तांमध्ये २००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच ब्रिटनमधील राणा कपूर यांच्या मालकीच्या मालमत्तांचाही शोध घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे. राणा कपूर यांच्या कुटुंबियांचे नियंत्रण असलेल्या कंपन्यांमधील संचालक असलेल्या व्यक्ती त्याच-त्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा व्यवसाय असा खास काहीच नसला तरी त्यांनी वेळोवेळी प्रचंड रक्कमेची कर्ज घेतली आहेत.