येरे माझ्या मागल्या!

0
208

पोरस्कडेमधील भयावह अपघातात भाईडवाडा – कोरगावचे पार्सेकर पिता – पुत्र बळी गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. बारावीची परीक्षा नुकत्याच दिलेल्या साटेलीच्या महादेव बावकरचा पाय कापला गेल्याने त्याचे भविष्य अंधःकारमय झाले. या सार्‍याची जबाबदारी आता कोण घेणार आहे? लोखंडी सळ्या घेऊन सुसाट चाललेल्या ट्रॉलीचा चालक अपघातानंतर पळून गेला. तो सापडला तरी त्याला शिक्षा होईल याची खात्री नाही आणि जरी त्याला शिक्षा झाली तरी ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, त्यांना त्याचा काय फायदा? गोवा ही भीषण अपघातांची राजधानी होत चाललेली आहे आणि वाहतूक खात्याचे राज्यातील बेशिस्त, बेदरकार वाहतुकीवर काडीमात्र नियंत्रण नाही हेच वास्तव पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. एकामागून एक भीषण अपघात होत आहेत. माणसे मारली जात आहेत आणि प्रत्येक अपघातानंतर बैठका घेतल्या जात असल्या आणि समित्या नेमल्या जात असल्या तरी अपघातांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. खोर्ली – जुने गोव्यातील भीषण अपघातानंतर तरी वाहतूक खात्याला जाग आली असेल अशी अपेक्षा होती, परंतु पोरस्कडेमध्ये बेफिकिरीची पुनरावृत्ती झाली आहे. या अपघातात चालकाची बेपर्वाई तर दिसते आहेच, परंतु त्याहून अधिक बेपर्वाई दिसते ती वाहतूक खात्याची. मुळात हे खाते भ्रष्टाचाराने आमूलाग्र पोखरलेले आहे. तेथील शिपायापासून सहायक वाहतूक संचालकापर्यंत कित्येकांना मागील सरकारच्या कार्यकाळात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. खालपासून वरपर्यंत पसरलेले भ्रष्टाचाराचे जाळे विणले गेलेल्या या वाहतूक खात्याला असे काय गूळ चिकटले आहे? खरोखर ‘ना खायेंगे और ना खाने देंगे’चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसा जपणारे हे सरकार असेल, ‘झीरो टॉलरन्स टू करप्शन’ हा बाणा असेल, तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक खाते स्वतःकडे घ्यावे आणि त्याला शिस्त लावावी. गोवा हे देशातील सर्वांत छोट्या राज्यांपैकी एक. अन्य राज्यांमध्ये मैलोन्‌मैल पसरलेले महामार्गांचे जाळे असूनही जेवढे अपघात होत नाही, तेवढे गोव्यात होतात. ते का होतात यावर आजवर चर्चेची मोठमोठी गुर्‍हाळे घातली गेली आहेत. रस्त्यांवर दुभाजकांचा अभाव, संरक्षक भिंतींचा अभाव, सूचना फलक नसणे, गतिरोधक नसणे, लेनचे पालन न होणे, वाहतूक नियम आणि वेगमर्यादेचे पालन होते आहे की नाही यावर वाहतूक खात्याची सतत देखरेख नसणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अपघातप्रवण क्षेत्रांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना न करणे अशा नानाविध गोष्टींचा पाढा वाचून वर्तमानपत्रेही आता थकून गेली आहेत. सगळी चर्चा होऊनही प्रत्येकवेळी येेरे माझ्या मागल्या का होते? या बेफिकिरीची जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे की नाही? वाहतूक पोलिसांच्या बेपर्वाईचे एक नमुनेदार उदाहरण काल पाहायला मिळाले. काल राज्यात शाळा सुरू झाल्या. कुजिरा – बांबोळीतील शालेय संकुलात यंदा काही नव्या शाळा स्थलांतरित झाल्या आहेत. आधीच तेथील एकमेव मार्ग वाहनांना अपुरा पडतो. विद्यार्थी व पालकांची संख्या अनेक पटींनी वाढल्याने तेथील वाहतुकीवर ताण येणार हे जगजाहीर होते. पण काल सकाळी तेथे एकही वाहतूक पोलीस नसावा? बेपर्वाईची ही हद्द बोलकी आहे. तेथे एखादा भीषण अपघात घडता तर? राज्यातील महामार्ग हे मृत्युचे सापळे बनले आहेत. एकही दिवस भीषण अपघाताविना जात नाही. किती तरुणांचे बळी गेले? किती आयुष्ये उद्ध्वस्त झाली? गोव्यातील सगळ्या राष्ट्रीय महामार्गांची मिळून लांबी आहे अवघी २६२ किलोमीटर. एवढ्या छोट्या अंतराचे वाहतूक व्यवस्थापन जर आपल्या या वाहतूक खात्याला करता येत नसेल तर हे खाते हवे कशाला? नुसते पर्यटकांना आणि वाहनचालकांना लुटायला?