येत्या सहा महिन्यांत साळ नदीचे ड्रेजिंग

0
118

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती

दक्षिण गोव्यातील प्रमुख साळ नदीतील ड्रेजिंगचे काम आगामी सहा महिने ते एका वर्षात हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात साळ नदीतील ड्रेजिंगच्या कामाबाबत सादरीकरण काल करण्यात आले. या सादरीकरणानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. या सादरीकरणाच्यावेळी बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस व इतरांची उपस्थिती होती. साळ नदीच्या आजूबाजूच्या १८ पंचायतीचे सरपंच व इतर, बंदरकप्तान खात्याचे अधिकारी उपस्थित होते. एनआयओने साळ नदीच्या पाहणी करून केलेल्या अहवालात ड्रेजिंग आवश्यक असल्याचे म्हटले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

साळ नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नावेली व इतर भागात पाण्याचे प्रदूषण झाले आहे. नदीचे दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. साळ नदीमध्ये घाण सोडण्यात आलेली आहे. पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रदूषण मंडळ यांच्या मार्फत नदीच्या पात्रात घाण सोडणार्‍याच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. नदीत सोडण्यात आलेली घाण एका महिन्यात बंद करण्याची सूचना केली जाणार आहे. घरमालक, हॉटेल व्यावसायिक यांनी सांडपाणी, घाणीचा निचरा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली जाणार आहे. घाण सोडणार्‍या घरमालक व इतरांवर आवश्यक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री लोबो यांनी दिली.