येत्या मोसमात खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न ः राज्यपाल

0
206

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या मोसमात सुरू करता यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत आहे व ते होईल अशी सरकारला आशा असल्याचे गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी काल गोवा विधानसभेत आपल्या अभिभाषणातून बोलताना सांगितले. खाणी सुरू करून खाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खाण अवलंबितांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

काल झालेल्या एका दिवसाच्या विशेष अधिवेशनाची सुरवात राज्यपाल मलीक यांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी बोलताना मलीक यांनी पर्यटन, साधनसुविधा विकास, शेती, पर्यावरण, समाजकल्याण, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, पाणी व वीजपुरवठा आदी क्षेत्रात राज्याने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्थेकडे विशेष लक्ष दिल्याने २०१९ साली गुन्हेगारीचे प्रमाण १०.४ टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले.

म्हादईप्रश्‍नी सरकार गंभीर
म्हादईप्रश्‍नी आपले सरकार गंभीर असून म्हादई नदीच्या पात्रातील पाणी सरकार अन्यत्र वळवू देणार नसल्याचे मलिक म्हणाले. महसूल वाढीसाठी सरकार प्रयत्नरत असून गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत वस्तू व सेवा कराद्वारे मिळालेला महसूल २५५८.४० कोटी एवढा होता, वरील काळात मिळालेल्या अबकारी महसुलाचे प्रमाण हे ३५१.५५ कोटी रु. एवढे होते, असे ते म्हणाले.

मनोहर पर्रीकरांना वाहिली श्रद्धांजली
आपल्या अभिभाषणाच्या सुरूवातीलाच राज्यपालांनी गोव्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.