येडीयुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केले

0
109

>> सभापती रमेश कुमार यांचा पदत्याग

कर्नाटकमधील बी.एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने काल विधानसभेत मांडलेला विश्‍वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकला. येडीयुरप्पा यांनी विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध केल्यानंतर लगेच सभापती रमेश कुमार यांनी पदत्याग केला.

रविवारी सभापती रमेश कुमार यांनी १४ बंडखोर आमदारांना अपात्र जाहीर केल्यानंतर एकूण अपात्र आमदारांची संख्या १७ झाल्याने विधानसभेचे संख्याबळ कमी होऊन सरकारला बहुमत सिद्धतेसाठी १०४ आमदारांची आवश्यकता होती. भाजपकडे १०६ (एका अपक्षासह) आमदार असल्याने काल कॉंग्रेस-जेडीएस युतीने ठरावावेळी मतविभाजनाची मागणी केली नाही. त्यामुळे सभापतींनी सरकारवरील विश्‍वासदर्शक ठराव संमत झाल्याचे घोषित केले. यानंतर लगेच सभापती म्हणाले, ‘सभापतीपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे, मी राजीनामा देणार आहे.’ लगेच त्यांनी आपले राजीनामा पत्र उपसभापती कृष्णा रेड्डी यांच्याकडे दिले.
विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आपण सूडाचे राजकारण करणार नाही अशी ग्वाही दिली. विसरून जा व क्षमा करा या तत्त्वाचे आचरण आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.