युवकांनी अल्पसंतुष्ट न राहता यशोशिखरांना गवसणी घालावी

0
123

सत्कारमूर्ती डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा सल्ला

मानवी प्रतिभा व कल्पनाशक्ती याला कोणतीही मर्यादा नसून युवा पिढीने अल्पसंतुष्ट न राहता एव्हरेस्टसारख्या यशाच्या मोठ्या शिखरांना गवसणी घालण्याचे उद्दिष्ट बाळगून अथक परिश्रम करीत रहायला हवे असे प्रयत्न होतील तेव्हाच भारत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश गाठू शकेल, असे थोर भारतीय शास्त्रज्ञ तथा गोमंतकीय सुपूत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काल येथे आपल्या सत्कारानंतर गोमंतकीय विद्यार्थ्यांसमोर बोलताना सांगितले.  कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

पुढे ते म्हणाले की जर भारताला प्रगती साधायची असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात मोठी झेप घ्यावी लागेल. भारतातील मुलांना आज सर्वसोयी सुविधा मिळत आहेत. संगणक इंटरनेट आदी त्यांना सहज उपलब्ध होऊ लागलेले आहेत. आपण शिक्षण घेत होतो तेव्हा हे सगळे उपलब्ध नव्हते. पाश्‍चात्य देश तेव्हा फार पुढे होते. मात्र, तेथे जे काही घडत होते ते कळायलाही मार्ग नव्हता. आपणही विदेशात गेलो होतो. पण ३२ व्या वर्षीय भारतात सोयी सुविधा, तंत्रज्ञान आदीचा अभाव असल्याने सुरवातीच्या काळात बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागले.

मात्र, त्याही परिस्थितीत आपण एक शास्त्रज्ञ या नात्याने भारतात राहून भारतासाठी काम केल्याचे ते म्हणाले. यशासंबंधी त्यांनी सांगितले की यश हे फास्ट फूड सारखे नसते. ते मिळवण्यासाठी दिवस-रात्र, महिने, वर्षानुवर्षे अथक परिश्रम करावे लागतात. आपण तेच केले व आपणाला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मी ही माणसावर कधीही प्रसन्न होऊ शकते. पण सरस्वतीचे तसे नसून दिवस-रात्र व कित्येक वर्षे कठोर परिश्रम करणार्‍यांवरच ती प्रसन्न होत असल्याचे डॉ. माशेलकर यानी यावेळी स्पष्ट केले. आपणाला आयुष्यात कित्येक पुरस्कार मिळाल्याचे सांगून या पुरस्कारांपासून आपण जीवनात पुढे आणखी काही तरी करण्याची प्रेरणाच घेतल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या काही प्रश्‍नांचीही यावेळी माशेलकर यांनी उत्तरे दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर व श्रीनिवास धेंपो यांच्या हस्ते डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोहर पर्रीकर यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन, विजय भटकर यांनी मानपत्र देऊन तर श्रीनिवास धेंपो यानी स्मृतिचिन्ह देऊन डॉ. माशेलकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील विद्यार्थी गणित व विज्ञान या विषयात मागे पडत असल्याचे सांगितले. राज्यात गणित शिकवण्यासाठी शिक्षक मिळत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. विद्यार्थी प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेत असल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील तसेच देशातील बुध्दिमान युवक-युवती देशाबाहेर जातात अशी खंतही त्यानी यावेळी व्यक्त केली.

धेंपो उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यानी येथील गोव्याचा विकास व्हायचा असेल तर राज्यात मोठ मोठे उद्योगपती निर्माण होण्याची तसेच गोवा हे शैक्षणिक केंद्र होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये हेही हजर होते. सुमारे ५०० विद्यार्थी कार्यक्रमाला हजर होते. विज्ञान परिषद, गोवातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.