युवकांच्या हाती शस्त्र’ विधानासाठी कॉंग्रेसकडून विजय सरदेसाईंचा निषेध

0
136

उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या गोव्याच्या हितरक्षणार्थ प्रसंगी युवकांच्या हाती शस्त्र देण्याच्या विधानाचा कॉंग्रेस पक्षाने निषेध केला असून उपमुख्यमंत्री सरदेसाई यांनी वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी काल केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पणजी येथील कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनी गोयकारपणाच्या रक्षणासाठी युवकांच्या हाती शस्त्र देण्यबाबत वक्तव्य केले आहे.

सरदेसाई यांचे वक्तव्य हिंसेला प्रोत्साहन देणारे असून निषेधार्ह आहे, असे अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस तथा गोवा महिला कॉंग्रेसच्या प्रभारी अप्सरा रेड्डी यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सरदेसाई यांचे वक्तव्य गोव्याच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. गोवा हा शांत प्रदेश आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. युवकांनी हातात शस्त्र घेतल्यास शांततेला धोका संभवतो. गोवा फॉरवर्डचे नेते राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत, असेही रेड्डी यांनी सांगितले.

दरम्यान, कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी उपमुख्यमंत्री सरदेसाई यांच्या वक्तव्यावर जोरदार टिका केली. गोव्यात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोकरीसाठी रहिवाशी दाखला सक्तीबाबत कुठलेही दुमत नाही. यासाठी कॉँग्रेसच्या राजवटीत कायदा तयार करण्यात आलेला आहे, असे डिमेलो यांनी सांगितले.