युद्धविराम का?

0
140

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी रमझानच्या महिन्यात युद्धविराम करावा अशी मागणी जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तशी मागणी झाल्याचेही मेहबुबांनी आपला हा प्रस्ताव पुढे रेटताना सांगितले. खरे तर सर्वपक्षीय बैठकीत ही मागणी केवळ एका सदस्याने केली होती. नेहमीच फुटिरतावाद्यांची कड घेत आलेल्या रशीद इंजिनिअर ह्या अपक्ष आमदाराने ती केली होती आणि तिची त्या बैठकीत इतर पक्षियांनी दखलही घेतली नव्हती. तरीही मेहबुबा जणू काही हा प्रस्ताव खोर्‍यातील सर्व पक्षाच्या नेत्यांकडून आल्याचे भासवत युद्धविरामाची मागणी करीत सवंग लोकप्रियता मिळवू पाहात आहेत. त्यांनी ही मागणी करताच काहींनी ती उचलून धरताना केंद्र सरकारने ही संधी कशी सोडू नये व काश्मीर शांत करण्यासाठी हे पाऊल कसे आवश्यक आहे याचा पाढा वाचायला प्रारंभ केला आहे. त्यासाठी वाजपेयींनी २००० साली केलेल्या युद्धविरामाचेही दाखले दिले जात आहेत. परंतु वाजपेयींच्या काळातील परिस्थिती आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती यामध्ये जमीन – अस्मानाचा फरक आहे हे मात्र लक्षात घेतले जात नाही. वाजपेयींनी जेव्हा रमझानच्या काळात युद्धविराम जाहीर केला होता तेव्हा केंद्र सरकारने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील हिज्बुल मुजाहिद्दीनच्या नेत्यांशी थेट संवाद प्रस्थापित केला होता व त्यांनी भारतात परतावे यासाठी बोलणी सुरू केली होती. सय्यद सलाउद्दिन आणि त्याचा कमांडर अब्दुल मजिद दर हे भारतात परतावेत आणि त्यांनी शांततेचा मार्ग अनुसरावा यासाठी सरकार तेव्हा प्रयत्नशील होते. त्यामुळेच तेव्हा तो युद्धविराम देण्यात आला होता. यावेळी काही तशी परिस्थिती दिसत नाही. दहशतवाद तेवढ्याच उग्र रूपात आजही आहे, परंतु ठळक फरक म्हणजे आज आपले लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांवर आपला वरचष्मा प्रस्थापित केला आहे. सातत्याने सुरू असलेल्या चकमकींतून एकेका दहशतवाद्याचा खात्मा चालला आहे. हे वर्ष सुरू झाल्यापासून आतापावेतो ६९ दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या वर्षी २२० जणांचा खात्मा करण्यात आला, तर त्या आधीच्या वर्षात दीडशे दहशतवाद्यांना संपवण्यात आले. पंजाबमधील दहशतवादाचा निःपात ज्या प्रकारे करण्यात आला, त्याच प्रकारे काश्मीर शांत करण्यासाठी हा थोडासा आततायी वाटणारा, परंतु विद्यमान परिस्थितीत अपरिहार्य असणारा पर्याय केंद्र सरकारने स्वीकारलेला आहे आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. असे असताना सुरक्षा दलांचे मनोधैर्य खच्ची करणारा युद्धविरामाचा प्रस्ताव मेहबुबा मुफ्तींनी एकाएकी मांडण्याचे कारण काय? स्थानिक जनतेच्या हितार्थ जर हे केले जात आहे असे म्हणायचे झाले तर जेव्हा जेव्हा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई होते, तेव्हा स्थानिक मंडळींना लष्करावर दगडफेक करण्यासाठी चिथावले जाते. म्हणजेच रमजानच्या काळात ही मंडळी धार्मिक बाबींत व्यस्त असल्याने दहशतवाद्यांच्या बचावासाठी ते येऊ शकणार नसल्याने हा युद्धविराम अशा वेळी दहशतवाद्यांच्या पथ्यावरच पडेल. शिवाय येत्या ऑगस्टमध्ये अमरनाथ यात्रा येणार आहे. त्यावेळी मोठा हल्ला चढवण्यासाठी आपल्या अनुयायांची आणि शस्त्रास्त्रांची जमवाजमव करण्यासाठी लागणारी उसंत त्यांना या युद्धविरामात मिळेल ती वेगळीच! वाजपेयींनी जेव्हा युद्धविराम पुकारला होता तेव्हा सुद्धा तो सुरू असतानाच श्रीनगरच्या विमानतळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता आणि परिणामी तो युद्धविराम अर्ध्यावर सोडून द्यावा लागला होता. काश्मीर खोर्‍यात रमजानच्या काळात जर दहशतवाद्यांकडून हल्ला झालाच नाही, तर सुरक्षा दले प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे युद्धविराम हवा असेल तर दहशतवादापासून त्या मंडळींनी दूर राहावे. युद्धविराम जरी करायचा झाला आणि संवादाला वाव द्यायचा म्हटले तरी संवाद करणार कोणाशी? खोर्‍यातील दहशतवाद्यांवर हुर्रियत कॉन्फरन्सचे तीळमात्र नियंत्रण नाही. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या नावे हल्ले होत असले तरी ती संघटना आज पूर्वीसारखी संघटित नाही. पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशार्‍यांवर दक्षिण काश्मीरमधील तरुणांना शस्त्रास्त्रे देऊन हिंसाचार चालला आहे. त्यामुळे संवाद साधून हे थांबवण्यासारखी परिस्थितीच आज नाही. संवादाला चालना दिली तरी हे दहशतवादी शस्त्रास्त्रे खाली ठेवतील याची कोणतीही शाश्‍वती नाही. त्यामुळे अशा अत्यंत संदिग्ध वातावरणात युद्धविराम पुकारणे म्हणजे खोर्‍यातील देशद्रोही शक्तींवरील लष्कराने सध्या निर्माण केलेला दबाव दूर करण्यासारखेच ठरेल. त्यांना उसंत मिळेल आणि ते नव्याने लढायला सज्ज होतील. मग मेहबुबा मुफ्तींनी या प्रस्तावाची एवढी वकिली करण्याचे कारणच काय? त्यामुळे केवळ राजकीय कारणांसाठी अशी पिल्ले सोडणार्‍या मंडळींच्या दबावाखाली सरकारने येण्याची आवश्यकता नाही. रमजानच्या काळात काश्मिरींना शांतता हवी असेल तर दहशतवाद्यांनी स्वस्थ बसावे. लष्करही अर्थातच शांत राहील.