युद्धपातळीवर तपासकाम सुरू

0
112

म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार पट्टेरी वाघांची अज्ञातांकडून हत्या करण्याची जी घटना घडली त्या प्रकरणाचे तपासकाम जोरात चालू असून वनखात्याचे एक पथक पुरावे गोळा करण्यासह सर्व ते तपासकाम करण्यासाठी वनक्षेत्रात युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती काल अतिरिक्त विशेष मुख्य वनपाल संतोषकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. हत्या करण्यात आलेल्या वाघांच्या मृतदेहांच्या चिकित्सेचे काम पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. अटक करण्यात आलेल्या संशयितांना बुधवारी न्यायालयात उभे करून रिमांड घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ज्या संशयितांना अटक करण्यात आली आहे ते विठो झिपो पावणे, नालो नागो पावणे व बोमो नागो पावणे यांची गुरे असून ते म्हादई अभयारण्यातच राहत आहेत. त्यांची गुरे असून ते गुरांना मोकळे सोडत असल्याने वाघाने त्यांच्या गुरांवर हल्ला चढवून काही गुरे ठार केल्याचे कुमार यांनी सांगितले. या संशयितांनी वाघाने आपली गुरे मारल्यामुळे चिडून वाघांना विष घातलेले मांस खाऊ घातले होते का याची चौकशी केली जात असल्याचे कुमार म्हणाले. २२ डिसेंबर रोजी एक गाय व १ जानेवारी रोजी एक म्हैस अभयारण्यात ठार झाली होती. त्यांचा वाघाने फडशा फाडल्याचा संशय असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारे वाघांची हत्या करण्यात आली ही शरमेची बाब आहे. वाघांची हत्या हा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचे ते म्हणाले.

म्हादई अभयारण्य क्षेत्र
२०७ चौरस कि. मी.
म्हादई अभयारण्य हे तब्बल २०७ चौरस कि. मी. एवढे क्षेत्र असून या संपूर्ण अभयारण्यावर लक्ष ठेवणे ही तशी कठीण गोष्ट असल्याचे कुमार म्हणाले.

२०१८ च्या गणनेनुसार
म्हादईत होते चार वाघ
२०१८ च्या गणनेनुसार म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार वाघ असल्याचे आढळून आले होते. मात्र, आता एक वर्ष एवढ्या वयाचे वाघाचे तीन बछडे मृतावस्थेत सापडले. सगळे वाघ जिवंत राहिले असते तर वाघांचा आकडा सातवर पोचला असता, अशी माहिती कुमार यांनी दिली. वाघांची झालेली हत्या ही अत्यंत दुःखद बाब असल्याचे ते म्हणाले.