युकी भांब्रीला ८४वे स्थान

0
60

पुरुष एकेरीतील भारताचा आघाडीचा टेनिसपटू युकी भांब्री याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत नऊ स्थानांची प्रगती साधताना ८४वा क्रमांक मिळविला आहे. प्रज्ञेश गुणेश्‍वरन यानेदेखील १४ क्रमांकांची उडी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १६९व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.

युकीला फ्रेंच ओपनच्या पहिल्याच फेरीत पराजित व्हावे लागले होते. परंतु, या स्पर्धेपूर्वीच्या सरबिटोन चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची मारलेली मजल त्याला ३० गुण मिळवून देण्यास पुरेशी ठरली. रामकुमार रामनाथन याला सात स्थानांचा फटका बसला असून युवा सुमीत नागल १४ स्थानांच्या घसरणीसह २३४व्या स्थानी पोहोचला आहे.

पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा याने किंचित प्रगती साधत २२वा क्रमांक आपल्या नावे केला. दिविज शरण (४३, -२), लिएंडर पेस (५९, -३) व पूरव राजा (७७,-१२) यांना तोटा झाला. डब्ल्यूटीए क्रमवारीत अंकिता रैना (२०३, + ५) सर्वोत्तम स्थानावरील भारतीय खेळाडू आहे. यानंतर करमन कौर थंडी (२६२, + २), प्रांजला यडलापल्ली (३९३, + ३२) व ऋतुजा भोसले (४०३,-३) यांचा क्रम लागतो.

‘टॉप १०’ मध्ये मोठे बदल
फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालने ८७७० गुणांसह आपले पहिले स्थान कायम राखले आहे. रॉजर फेडरर (८६७० गुण) दुसर्‍या व आलेक्झांडर झ्वेरेव (५९६५) तिसर्‍या स्थानी कायम आहे. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने मरिन चिलिच व ग्रिगोर दिमित्रोव यांना मागे ढकलत (५०८०) चौथ्या स्थान आपल्या नावे केले आहे. डॉमनिक थिएम आठव्या स्थानावरून सातव्या स्थानी सरकला. तर केव्हिन अँडरसन आठव्या स्थानी घसरला आहे. टॉप १०’ बाहेरील खेळाडूंचा विचार केल्यास इटलीच्या मार्को चेकिनाटो याने ४५ क्रमांकांनी झेप घेत थेट २७वा क्रमांक मिळविला आहे. महिला एकेरीतील विजेत्या सिमोना हालेपने (७९७०) आपले पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. उपविजेत्या स्लोन स्टीफन्सने दहाव्या स्थानावरून थेट चौथा क्रमांक गाठला आहे. मॅडीसन कीजने दहाव्या स्थानासह ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे.