या जन्मावर … शतदा प्रेम करावे!!

0
133

– दयाराम पाडलोस्कर
धारगळ-पेडणे

गंभीर स्वरूपाचा अपघात झाल्यावर उपस्थितांनी याची चूक की त्याची चूक हा अंदाज न लावता मदतीचा हात पुढे केला पाहिजे. काही ठिकाणी प्राणघातक अपघात झाल्यावर उपस्थितात नकळत हिंसक वातावरण तयार होते. मग तोड-फोड, अडवा-अडवी अशा अनेक विपरीत गोष्टी घडत

आपण सगळे शेवटाकडे जाणारे… इथले पाहुणे आहोत. तरीही मंगेश पाडगावकरांनी आपल्या काव्यात म्हटले आहे ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’. जन्मा-जगण्यावर प्रेम करताना आज एक प्रकारची धुंदी, मस्ती चढलेली मनुष्यात आढळते. हा प्रगतीचा प्रसाद म्हणावा की अधोगतीचा कळस… काही कळत नाही. मर्यादा आपली पायरी ओळखते, तेव्हा वेळ थोडा असतो. त्या वेळेत तरी आपण कुठल्या वाटेवरून चालत आहोत हे ओळखले पाहिजे. पण ती आज आपल्यात मनस्या नाही. म्हणून एक-एक समस्यांचे डोंगर आमच्यापुढे डोके वर काढत आहेत.
मोठ्या प्रमाणात भेडसावणारी समस्या म्हणजे वाढत जाणार्‍या अपघातांची संख्या! अपघात कसे होतात?.. कसे टाळू शकतो?.. हा जरी संशोधनाचा विषय असला तरी ‘आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे’. कर्तव्यात अनेक क्रम येतात. गाडीची वेळेवर दुरुस्ती, सीट बेल्ट, दुचाकी असली तर शिरस्त्राण, वेगमर्यादा, योग्य वेळी ओव्हरटेक, वगैरे.. वगैरे. पण आपण आपले कर्तव्य पार पाडतो काय? कायद्याचे पालन करतो काय? पाण्यावर धावणार्‍या सापासारखे कट मारून दुचाकी चालवणार्‍या युवक-युवतींकडे पाहून… धन्य ते माता-पिता म्हणावे लागते. हा एवढा मोठा बदल आजच्या स्पर्धेमुळे झाला आहे. स्पर्धेच्या काठावरून धावताना पालक वर्ग, जिंकलोय एकदाचे, अशी आब मिरवताना दिसतो. पण ही आब ही खरी पालकांची हार आहे. कायद्याने गाडी चालवण्याचा परवाना अठरा वर्षें पूर्ण झाल्यावर मिळतो. पण आज महागड्या दुचाक्या घेऊन विद्यार्थी शाळा-कॉलेजात जातो. मागे तोंडाला दुपट्टा बांधून मुलगी बसली की विचारूच नका, दुचाकी किती वेगाने धावते ती!! ही धूम, रस्ता आपल्या बापाचा असल्यागत कुठेही कायद्याचे पालन करत नाही. आपल्या भविष्याचा विचार करत नाही. आपल्यामुळे दुसर्‍यांना त्रास होणार हे ही पाहत नाही. हा युवा पिढीला चढलेला कैफ आज मोठ्या प्रमाणात अपघाताला कारणीभूत ठरतो. तेव्हा वेळ आपल्यापासून दूर गेलेली असते. म्हणून पालकांनी स्पर्धेचा हा जुगार कुठेतरी थांबवला पाहिजे.
अपघात झाल्यावर कोण जबाबदार?… हा गहन प्रश्‍न समोर उभा राहतो. तेव्हा काही लोक सरकारच्या नावाने बोंब मारतात तर काही वाढलेली वाहतूक जबाबदार म्हणतात. हे सगळे बरोबर आहे. आपण या देशाचे सूज्ञ नागरिक म्हणून आपले कर्तव्य काय? प्रवाशांना कोंबून बस जाते तेव्हा आपण कंडक्टरशी हुज्जत घालतो, ‘‘केवढे हे प्रवासी कोंबलेस, तुला नियम… कायदा.. लागतो की नाही?’’ तो पैशांच्या हव्यासापोटी आपला नियम, कायदा वेशीवर टांगतो. पण सुशिक्षित प्रवाशांनी तर त्याला अद्दल घडवली पाहिजे. बसमध्ये उभ्या प्रवाशांची संख्या अकरा किंवा तेरा असते. तर मग अधिक प्रवाश्यांनी बसमध्ये प्रवेश का करावा? नाही! आपल्यालाही जाण्याची घाई असते. तीच घाई कधी कधी अंगावर येते. दुसर्‍याकडे बोट न दाखवता, आपण आपल्या कर्तव्याला जागलं पाहिजे.
पूर्वी पर्यटकांना गोव्याचा निसर्ग भुरळ घालत होता; पण आज इथली नशा भुरळ घालते. मद्यपान करून पर्यटक पुरुष तशाच स्त्रिया, बिनधास्त गाड्या चालवताना आढळतात. मोटर व्हेइक्युलर ऍक्टनुसार यु/एस १८५ कोर्टामार्फत या गुन्ह्याला दंड आहे. तरीही पर्यटक इथे कुणाला भीक घालत नाहीत. बरोबर आहे, अतिथी देवासमान असतो. पण हा अतिथी जेव्हा अति(रेक) करतो, तेव्हा अनर्थ हा ठरलेला असतो! मुळात आधुनिक सुविधांच्या माध्यमातून आपण जी गोव्याची जाहिरात करत आहोत ती कितपत् खरी अन् खोटी आहे… हाही संशोधनाचा विषय आहे. ‘आओ-खाओ-पियो-मजा करो’ हीच गोव्याची ओळख आहे काय? इथे आपण आपल्या परीने गोव्याची जाहिरात करून अपघातासारखा अनर्थ टाळू शकतो. उदाहरणार्थ ः एखाद्या पर्यटकाने गाडी थांबवून पत्ता विचारला तर त्याला आदरातिथ्यात नीट पत्ता दिल्यानंतर सांगावे – इथे नशा करून गाडी चालवायला मनाई आहे, पोलिसांना सापडलात तर भुर्दंड भरावा लागेल.
तो ऐको अथवा न ऐको आपण आपले काम केले पाहिजे. अनर्थ टळला तर टळला!
अतिथी वाईट, आपण तेवढे बरे… असे इथे मुळीच नाही. आपण तर सगळ्यांच्या माथ्यावर आहोत. पावलोपावली मद्यपान करून गाडी चालवणारे वाहक, सर्व्हे केला… तर शेकडो मिळतील. नशा एकदाच विश्‍वासघात करते हे ठाऊक असूनही ते प्रवाशांच्या जिवाशी खेळताना दिसतात.
बाहेरून येणार्‍या मालवाहू गाड्या महामार्गावर हमखास उजव्या बाजूने गाडी चालवताना आढळतात. ही वाहकांची सवय अपघाताला निमंत्रण देणारी असते. तेव्हा इथे वाहतूक खात्याने लक्ष घालून योग्य मार्ग काढावा. सिग्नल तोडणे, वाहतुकीची कोंडी, अशिक्षित वाहक, दुचाक्यांचे वाढते प्रमाण, मानसिक टेन्शन… अशा अनेक वाटा अपघातास कारणीभूत असतात. अपघातांची सरासरी वर्गवारी केली तर दोन प्रकारचे अपघात आढळतात-
१) गंभीर स्वरूपाचे अपघात, २) किरकोळ अपघात.
गंभीर स्वरूपाचा अपघात झाल्यावर उपस्थितांनी याची चूक की त्याची चूक हा अंदाज न लावता मदतीचा हात पुढे केला पाहिजे. काही ठिकाणी प्राणघातक अपघात झाल्यावर उपस्थितात नकळत हिंसक वातावरण तयार होते. मग तोड-फोड, अडवा-अडवी अशा अनेक विपरीत गोष्टी घडत जातात. तेव्हा दुसराही अपघात होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी संयमाची फार गरज असते. हा संयम अनुभवामुळे वयोवृद्धांत जास्त असतो. तापलेल्या तव्यासारखा राग निवविण्याकरता एकेकदा सरकारी यंत्रणाही कमी पडतात. मुद्दामहून कोणीच प्राणघातक अपघात करत नाही, तो घडतो. तर मग उपस्थितांत तयार झालेले हिंसक वातावरण शेवटपर्यंत काय साध्य करते?… हाही मोठा प्रश्‍न आहे!
किरकोळ अपघातात वाहतुकीकडे न पाहता अपघातग्रस्त गृहस्थ रस्त्यावरच भांडायला लागतात. या भांडणामुळे वाहतुकीची कोंडी होते. एकेकदा किरकोळ अपघातामुळे प्राणघातकही अपघात होतो. इथे आपल्यापुरते न पाहता इतरांचाही विचार केला पाहिजे.
शेवटी आपण कायद्याचे उल्लंघन न करता आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, की अपघात कसे टाळता येतील? शिस्तीचा प्रचार वाढत गेला तर वाहतूक आपोआप नियंत्रणात येईल. वाहतूक नियंत्रणात आल्यावर अपघातांची संख्याही घटणार. तर मग काय? ठरले ना! आजच, आपल्यापासून सुरुवात..!