… यावर खरोखर उपाय आहे कां?

0
132

– गुरूनाथ केळेकर
(शब्दांकन- अनिल पै)

 

रस्त्यावरील अपघाताचे व गुन्ह्याचे खापर आपण पोलिसांच्या माथी फोडतो. आपणास पोलीस रस्त्यावर झाडाच्या सावलीत उभे असलेले दिसतात. तळपत्या उन्हात उभे राहून, शिटी फुंकत रहदारीचे नियंत्रण करतात. ते त्याचे काम असल्याचे आपण मानतो. पण त्यांना आपण केव्हा ‘धन्यवाद’ वा ‘थँक्स’ म्हणत नाही. तो तहानेने व्याकूळ झालेला असताना पिण्यासाठी पाणी देण्याचे आमच्या मनात येत नाही आणि …

कोणत्याही प्रदेशाचा विकास करताना त्यांत काही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यांत वाहतुकीला अग्रक्रम देण्याची आवश्यकता आहे, हे मीच सांगत नसून संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांना वाहतुकीला अग्रक्रम द्यायला हवा, असे सांगून वाहतूक कोणत्या नियमांप्रमाणे चालवावी हे तपशिलवार सांगितले आहे. पुढारलेल्या देशांनी या बाबतींत लक्षवेधी सुधारणा घडवून आणल्या असून आमच्यासारख्या विकसनशील देशांत गतवर्षी १.४० लाखापेक्षा जास्त निरपराध्यांचे रस्ताअपघातात बळी गेले. भारतात सर्वत्र हे चित्र असले तरी गोव्यापुरता विचार केला तर गेल्या वर्षी सरकारी नोंदणीनुसार रस्ताबळींची संख्या ३५० पर्यंत पोहचली आहे. गेल्या तीन महिन्यात आपण शंभरी गाठण्याच्या जवळपास पोहचलो आहोत. सगळे अपघात हृदयद्रावक असतात पण त्यातला एखादा अपघात अंतःकरण पिळवटून टाकणारा आहे. हीच गोष्ट काही दिवसांमागे तिळामळ केपे येथे घडली. दुचाकीवरून जाणार्‍या सासू व सुनेचा ट्रक अपघातात बळी गेला तर सुदैवाने दोन वर्षाचा बालक बचावला. त्या दोन वर्षाच्या मुलाला आई व आजीला मुकावे लागले. अशा चार-पाच घटना या आठ दिवसात गोव्याच्या विविध भागात घडल्या आहेत. या घटना पहिल्यांदाच घडलेल्या आहेत, असे नाही. अनेकदा असे भीषण अपघात झालेले आहेत. अपघातानंतर त्या परिसरांतील लोक संतापून रस्त्यावर आले, त्यांनी रास्ता रोको केला, वाहने फोडली. मनातील संताप जाहीरपणे व्यक्त केला व दोन दिवसांनंतर रस्त्यावरील ही संतापजनक प्रतिक्रिया शांत होते आणि ज्यांना अपघाताची झळ पोहचते त्यांचे सर्व जीवन मरणप्राय बनून कुटुंब दुःखसागरात बुडून जाते. लोकांच्या भावना तीव्र असल्या तरी सरकारतर्फे अपघातात सापडलेल्या कुटुंबाला सहवेदना व्यक्त केल्याचे कोठे आढळत नाही वा ऐकिवात नाही. गोव्याबाहेर अपघात पीडितांना सरकार आर्थिक मदत जाहीर करते. तसे गोव्यात होत नाही.
गोव्यात वाहतूक खाते १२ लाख वाहनांचे नियमन करते. त्याचे दोन भाग आहेत. एक- वाहनांची नोंदणी करणे, करवसुली करणे व दुसरे- मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करणे. वाहतूक खात्याच्या मुख्य कचेरीत व शाखेत गेलात तर तुम्हाला लोकांची गर्दी झालेली दिसते ते नोंदणी करण्यासाठी वा कर भरण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी आलेले असतात. परंतु वाहतुकीचे धोरण बनविण्याचे काम गोवा सरकारने अजूनपर्यंत केलेले नाही.
लाखों वाहने रस्त्यावरून धावतात त्याचे नियमन करण्याचे आणि त्यांच्यात शिस्त आणण्याची जबाबदारी हे सरकार आपले काम नसल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे. रस्त्यावर आपल्याला वाहतूक पोलीस दिसतात. रस्त्यावरील अपघाताचे व गुन्ह्याचे खापर आपण पोलिसांच्या माथी फोडतो. आपणास पोलीस रस्त्यावर झाडाच्या सावलीत उभे असलेले दिसतात. तळपत्या उन्हात उभे राहून, शिटी फुंकत रहदारीचे नियंत्रण करतात. ते त्याचे काम असल्याचे आपण मानतो. पण त्यांना आपण केव्हा ‘धन्यवाद’ वा ‘थँक्स’ म्हणत नाही. तो तहानेने व्याकूळ झालेला असताना पिण्यासाठी पाणी देण्याचे आमच्या मनात येत नाही आणि पोलीस धूळ पिऊन आजारी पडतात. त्यांची विचारपूस करायला कोणीच जात नाहीत. एखाद्या पोलिसाने रस्त्यावर चिरीमिरी घेतली तर आम्ही राईचा पर्वत करतो आणि वाहतुकीच्या बेशिस्तीला वाहतूक पोलीसच जबाबदार आहेत असे आम्ही गृहित धरतो. पण ते योग्य नव्हे! गोव्यात शेकडो गृहरक्षक तरूण-तरुणी रस्त्यावर भर उन्हात, पावसांत वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. त्यांना दर दिवशी ३०० रुपये रोजगार दिला जातो. त्यांना सुटी नसते वा कामाची हमी नसते. पाण्याची व्यवस्था नसते. अंगावरील एक-दोन गणवेशाशिवाय काहीच दिले जात नाही. पण ते अत्यंत मन लावून काम करतात. या गृहरक्षक दलात कितीतरी तेजस्वी डोळ्याच्या तरुण-तरुणी पाहत असतो आणि त्यांच्या अंधुक भविष्याबद्दलचा विचार करून माझे डोके शरमेने खाली जाते. आज ‘भाडेली’ (डोक्यावरून सामान नेणार्‍या आदिवासी महिला) दिवसाकाठी सहाशें रुपये कमावतात पण या गृहरक्षक दलाकडे सहानुभूतीने सरकार पाहात नाही. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ‘मार्ग’च्या विनंतीला मान देऊन, दर दिवशी दोनशे रुपयात आणखी शंभर रुपयांची वाढ देऊन तिनशे रुपये रोजंदारी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना मात्र याविषयी कणव दिसली नाही. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली. असो.
आता रस्त्यावरील वास्तवाचा विचार करू. मागे सांगितल्याप्रमाणे मालाची वाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही गोष्टी रस्त्यावरून होत असतात. माल वाहतुकीची दोन भागांत विभागणी करू शकतो. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक व दुसरी खनिज वाहतूक. गोव्यात अंतर्गत वाहतुकीसाठी शेकडो ट्रक धावतात ते रात्रीच्या वेळी मालकाच्या घराकडे, अस्ताव्यस्त ठेवले जातात आणि हजारो सहा ते सोळा चाकी ट्रक अवजड वाहने गोव्यात येतात. त्यांच्यासाठी गोव्यात प्लाझा नाही. फोंडा येथील कुर्टी, ढवळी येथे गेल्यास रस्त्यालगत शेकडो ट्रक उभे ठेवलेले दिसतील. तसेच आर्ले ते रावणफोंडपर्यंत उभे केलेले असतात. रात्रीची दिनचर्या तेथेच केली जाते. रस्त्यावरील धाब्यांवर ते जेवण घेतात. आपण त्या भागातून गेल्यास त्या दुर्गंधीने गुदमरून जातो. भारतातील सर्व राज्यातून हे ट्रक गोवा मार्गे जातात. हा झाला एक भाग!
खनिज वाहतुकीच्या बाबतीत मागील सहा महिन्यांपासून काय चालले आहे ते सर्वांना ठावूक आहे. आता बंद असलेली खनिज वाहतूक सुरू झालेली आहे व जास्त कमाई करण्यासाठी ट्रकचालक निष्काळजीपणे व बेबंध ट्रक हाकतात. त्यात रस्त्यावर निरपराध लोकांचा बळी जातो.
वाहतूक करणारे दुसरे साधन ‘पिक-अप’. त्या रस्त्यावरून सुसाटपणे हाकतात ते आपण नेहमी बघतो. बेमुर्वत चालवण्यामुळे कित्येक दुचाकीस्वारांना आपल्या वाहनाच्या चाकाखाली टाकले आहे. कोणीही विचारणारी अधिकारिणी वा नागरिक नसल्यामुळे बेदरकार वागत असतात.
एक दिवस भर दुपारी एक पिकअप चालक ‘प्रवेश बंद’ रस्त्यावर भर वेगाने चालला होता. त्यावेळी मी त्याला अडविले व प्रवेश बंदी असल्याचे सांगताच तो बेमुर्वतपणे म्हणाला, ‘‘तू अडविणारा कोण? तू आता जीवनातील शेवटचे दिवस मोजीत आहेस; तुला या भानगडी कोणी सांगितल्या?’’ ते ऐकून मी गप्प राहिलो. वानगीदाखल ही घटना येथे दिली.
गोव्यात आता शेकडो तारांकित हॉटेल्स आहेत. लक्षावधी रुपये किमतीची एक- अशा गाड्या प्रवाशांची वाहतूक करतात. विमानतळ, रेल्वेस्टेशनवर हजारो पर्यटक टॅक्सी, आपण पाहतो. काही ठिकाणी ‘प्रि-पेड’ केंद्रे आहेत. परंतु कोणतीच टॅक्सी मीटर असूनही त्या आधारावर चालत नाही. दिल्ली, मुंबई शहरांत मिटरशिवाय टॅक्सी चालविल्या जात नाहीत. कोल्हापूर रीक्षा थांबवून स्टेशनवर जाण्यासाठी भाडे किती घेशील?.. असे विचारता त्याने सौजन्यपूर्वक उत्तर दिले- मीटरची किल्ली हलविली व हा जे सांगेल तेवढे पैसे द्या. असे सांगून मला वेड्यात काढले. बेळगावी पहा, जेथे रस्त्यावर उभे राहून वाट पाहताक्षणी रीक्षा मिळेल पण गोव्यात हे चित्र दिसत नाही. रीक्षा स्टँडवर उभ्या असतात तेथे जाऊन भाडे दरासाठी बोलणी करावी लागतात.
गोव्यात एक प्रकारच्या वाहनाने सचोटी सांभाळली ती मोटरसायकल पायलटांनी!! गोमंतकीय पायलट आता वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्यांची मुले शिक्षित झाली. ती आता हा व्यवसाय करू देत नाहीत. या पायलटने अपघात केला व तरुणीचे अपहरण करून फरारी झाला, असे ऐकले नाही. पण आता तो व्यवसायही परप्रांतियांच्या हाती जात आहे. त्यांच्यामध्ये गोमंतकीय पायलटाप्रमाणे प्रामाणिकपणा असेलच हे सांगता येत नाही.
आता वाहतुकीच्या स्थितीचा विचार करुया. आज गोव्यातील रस्त्यांवर आठ लाख खाजगी दुचाक्या धावत आहेत. देशातील इतर भागांत असे प्रकार आढळत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे विकसीत देशांत दुचाकी हे सार्वजनिक वाहन मानत नाहीत. बस हेच सार्वजनिक वाहन मानले जाते. कॉंग्रेस सरकारच्या काळांत राणे सरकारने गोव्यांत कदंबा महामंडळ सुरू करून बस वाहतूक सुरू केली व संकट अर्ध्यावर आणले. खाजगी बसेस कोठेच प्रवासासाठी पब्लिक कॅरीयर नसते. त्यांना सार्वजनिक म्हटले जात असले तरी ते खाजगी बसचालक प्रवाशांना बसमध्ये कोकरा-मेंढराप्रमाणे कोंबून नेतात. गोव्यातील कोणताही तरुण कंडक्टर व्हायला तयार नसतो. भाषा न समजणारे परप्रांतिय कंडक्टर म्हणून काम करतात. त्या बसमध्ये प्रवाशांना तिकीटही दिले जात नाही. प्रवाशांना माणसासारखी वागणूक मिळत नाही.
तसे पाहू गेल्यास बस वाहतूक राष्ट्रीय बसवाहतूक करायला हवी होती. दिल्लीच्या सुनिता नारायण रस्त्यावर वातानुकूलीत बसेस घालाव्यात आणि दुचाकींची संख्या कमी करावी अशी हाकाटी करीत आहेत. आज गोव्यात छोट्या विद्यार्थ्यांना दुचाक्यांनी वेड लावले आहे. दुचाक्या या छोट्या मोटारी बनल्या आहेत. मडगावच्या स्टेशनरोडवर दुचाक्या किती निष्काळजीपणे, भर वेगाने हाकल्या जातात, ते पाहिल्यानंतर थरकाप होतो. ७० टक्के अपघाती मृत्यू दुचाक्यांमुळे होतात. पोलीस आपणास हैराण करतात असा आरोप दुचाकीस्वार करतात. पण आपली काही जबाबदारी आहे, आपण वाहतूक नियमांचे पालन करावे, असे त्यांना वाटत नाही. या आठ-दहा दिवसात पोलिसांनी २५ हजार चलन (तालांव) दिले अशी बढाई पोलिसखाते मारते. याचा अर्थ असा होतो की आपल्या गोव्यात वाहनचालक रस्त्यावर कायदे पाळत नाहीत. गोव्याचा अभिमान वाटत नाही.
मुंबईचचे वाहतूक तज्ज्ञ डॉ. पी. एस. पसारिया यांना कित्येक वेळा गोव्यात आणले. दिल्लीचे डॉ. रोहित बलुजा यांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी खास आमंत्रण देऊन गोव्यात आणले. त्यांना शेवटी एका अविचारी मंत्र्यांनी स्वतःच्या हितासाठी हाकलून लावले. डॉ. बलुजा यांचे कार्य बघायचे असेल तर दिल्लीनजिक सूर्यकुंजला जावे. तेथे त्यांनी वाहतूक पोलिसांसाठी, प्रशिक्षणासाठी सहामजली इमारत बांधून तेथे प्रशिक्षण मार्गदर्शन सुरू केले आहे. विविध राज्यांतील पोलिस प्रशिक्षणासाठी तेथे जातात. असे एक केंद्र सुरू करण्याची गरज आहे. वाहतूकमंत्री सुदीन ढवळीकर एकदा म्हणाले, ‘स्मार्ट सिटी – गोवा बनविण्याची योजना आहे. मिरज, कोल्हापूर, धारवाड, हुबळीला त्याचा उपयोग होईल. ढवळीकर रस्तेरुंदीकरणानंतर हा प्रश्‍न सुटेल असे सांगतात. यांच्या बोलण्याचा अर्थ ज्यांनी त्यांनी समजून घ्यावा.
चेन्नई आणि इतर काही ठिकाणी गाड्या चालवायला शिकविणारी ड्रायव्हिंग केंद्रे आहेत. तेथे जावून प्रशिक्षण घेतल्यानंतर गाडी चालविण्याबरोबर एटीकेट्‌सचेही शिक्षण दिले जाते. आपल्या गोव्यात शंभरपेक्षा ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत. एकही स्कूल वाहतूक नियमांतर्गत चालत नाही. महिनाभर् दर दिवशी अर्धा तास प्रशिक्षण दिल्यानंतर लगेच परवाना मिळतो. त्या बाबतीत जास्त खोलात जाणे योग्य वाटत नाही. हा सावळा गोंधळ गोव्यात वाहतूक क्षेत्रातच आहे, असे मानण्याचे कारण नाही. आपण निवडून दिलेल्या सरकारला रास्त अभिमान नाही. सरकार म्हणजे पैसा कमविण्याचा नामी धंदा आहे असे काही लोक मानतात. सरकारात कसे जावे?… पंच म्हणून निवडून येऊन, मंत्रीपद कसे मिळवावे, रियल इस्टेटचा धंदा करून करोडो रुपये कसे कमवावेत याचा आधी विचार करतात. शेवटी माझ्यासारख्या नागरिकाला वाटते की ही व्याख्याने देऊन लोकमानसात परिवर्तन घडवून आणणे शक्य नाही. जे परिवर्तन पर्रीकरांनी घडवून आणले ते आपल्याला शक्य नाही. खरी गोष्ट अशी आहे की आपण नागरीक बनलेलो नाहीत. आपल्या मुलांना शिक्षण देऊन नागरिक बनविण्याऐवजी ‘नोकरीक’ बनवीत आहोत. मी मार्गतर्फे सरकारकडे तीन मागण्या करीत आहे. एक – गेल्या २५ वर्षांत रस्ता अपघातात मृत्यू झाले त्या संदर्भात श्वेतपत्रिका प्रकाशित करावी. दुसरी- गोव्यातील दुचाक्यांवर आठवड्यातून एक दिवस रस्त्यावर येण्यास प्रतिबंध करावा. तिसरा- नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस सर संचालक मुक्तेश चंदर यांनी या प्रश्नी जातीने लक्ष घालावे. गोव्यात प्रत्येक माणसामागे एक वाहन आहे. एक दिवस बंद ठेवल्यानंतर त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल. एक दिवस बंद ठेवण्याची बळजबरीने दिलेली सजा या कामी वापरता येईल.
शेवटी आपण पुष्कळ लिहितो. पोटतिडकीने बोलतो पण असे वाटते यावर काही उपाय आहे काय? आमरण उपोषण हा यावर उपाय आहे काय? देशांतील सुशिक्षित सुसंस्कृत म्हणवून घेणारे चिमुकले गोवा राज्य देशासाठी हाच नमुना पुढे ठेवणार आहे काय? गोवा ही सुसंस्कृत प्रयोगशाळा व्हावी असे गोव्यावर प्रेम करणारे आपले काकासाहेब कालेलकर वारंवार सांगत होते. गोव्याला पुण्यभूमी असे त्यांनी नाव दिले. खरोखर आहे काय पुण्यभूमी? काय दशा करून टाकली आहे आपण आपल्या गोव्याची?