यांना हाकला!

0
152

कांदोळीत एका भाड्याच्या खोलीवरील छाप्यात तब्बल तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची घटना लक्षवेधी असली तरी धक्कादायक म्हणता येणार नाही. गोव्याची किनारपट्टी म्हणजे अमली पदार्थांचा सुळसुळाट असे समीकरणच बनलेले आहे, त्यामुळे अधूनमधून पडणारे अशा प्रकारचे छापे आता गोमंतकीय जनतेच्या अंगवळणी पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी दहा बारा किलोमीटर पाठलाग करून अमली पदार्थ घेऊन पळणार्‍या अशाच काही विदेशी नागरिकांना अटक केली होती. त्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे. कांदोळीत परवा सापडलेले अमली पदार्थ हे गेल्या काही वर्षांतले सर्वांत मोठे घबाड आहे एवढीच काय ती ह्यातील धक्कादायक म्हणता येईल अशी बाब आहे. बाकी नायजेरियन आणि अन्य विदेशी नागरिकांचा अशा अमली पदार्थ उलाढालीतील मोठा सहभाग, स्थानिकांचेही त्यात गुंतलेले हितसंबंध आणि लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणेकडून बहुधा होणारी डोळेझाक हे आता नेहमीचे झाले आहे. कांदोळीत ज्याला पकडले गेले तो नायजेरियन नागरिक आहे. २०११ मध्ये म्हणे त्याला बेकायदा वास्तव्याबद्दल पकडण्यात आले होते. २०१२ साली तो अशाच एका अमली पदार्थविषयक गुन्ह्यात सापडला. त्याला न्यायालयात जामीन मिळाला. त्यामुळे जामीनावर असताना देश सोडून जाता येत नसल्याचा फायदा घेत त्याने आपले हे व्यवहार सुखेनैव चालू ठेवले होते असे दिसते. आता पुन्हा एकदा तो पकडला गेला आहे. कालांतराने त्याच्यावर खटला भरला जाईल, पुन्हा जामीन मिळेल आणि पुन्हा त्याच्या कारवाया सुरू राहतील. आपण हे असेच चालू देणार आहोत का? वास्तविक, कोणत्याही गुन्ह्यात सापडलेल्या अथवा बेकायदा वास्तव्य करणार्‍या विदेशी नागरिकाची त्यांच्या मायदेशी तात्काळ परत पाठवणी झाली पाहिजे. त्यासाठी कायदेशीर बदल आवश्यक असतील तर ते करण्याच्या दिशेने पावले टाकली गेली पाहिजेत. अन्यथा, पुन्हा पुन्हा येरे माझ्या मागल्या होत राहील आणि गोव्याची अब्रू वेशीवर टांगली जात राहील. गोवा हे अमली पदार्थ व्यवहाराचे एक मोठे केंद्र बनत चालले आहे असा इशारा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने आपल्या एका अहवालात यापूर्वी दिला होता. अनेक आंतरराष्ट्रीय टोळ्या गोव्यातून अमली पदार्थांची देवाणघेवाण करीत असतात असे तेव्हा आढळून आलेले होते. दुर्दैवाने आजही ही परिस्थिती फारशी पालटलेली दिसत नाही. मध्यंतरी आपली तपास यंत्रणाच किती भ्रष्ट आहे त्याचेही जगाला दर्शन घडले. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ मालखान्यातून परस्पर विकले गेल्याचे आणि त्याच्या जोरावर काही पोलीस गब्बर झाल्याचे एक प्रकरण काही वर्षांपूर्वी उजेडात आले. एखादी यंत्रणा अशा प्रकारे जेव्हा आतून पोखरली जाते तेव्हा तिचा धाक न उरणे साहजिक असते. बड्या बड्या ड्रग माफियांशी संबंधित अनेक प्रकरणे उजेडात येऊनही त्यांच्यावर म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. न्यायव्यवस्थेनेही या विदारक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. सगळे खापर पोलिसांवर फोडणेही योग्य नाही. शेवटी त्यांच्याही पुढे कायदेशीर अडचणी असतात. राजकीय दबाव असतात. त्यांचेही हात कधी कधी बांधलेले असतात. हरमलला छापा मारायला गेलेल्या अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या अधिकार्‍यांवर कसा प्राणघातक हल्ला झाला होता आणि तत्कालीन राजकीय नेतृत्वाने अधिकार्‍यांनाच कसे दोषी ठरवले होते हे सर्वज्ञात आहेच. किमान अमली पदार्थांसारख्या अत्यंत गंभीर आणि भावी पिढीचे आयुष्य बरबाद करू शकणार्‍या गोष्टीबाबत तरी प्रत्येक संबंधित घटकाने कठोरपणे निर्णय घेणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. मुळात गोव्यामध्ये विविध बहाण्यांनी वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांचा तपशील गोवा सरकारपाशी उपलब्ध आहे काय? किती विदेशी नागरिक गोव्यात वास्तव्याला आहेत? त्यातील किती पर्यटक व्हिसावर आलेले आहेत? किती व्यावसायिक व्हिसावर आहेत? किती जण येथे बेनामी व्यवसाय चालवतात? त्यांची येथील कोणाशी भागीदारी आहे? मुदत संपूनही कोण गोव्यात वास्तव्याला आहे? ते येथे नेमके काय करतात? कुठे राहतात? त्यांच्या उदरनिर्वाहाचा आर्थिक स्त्रोत काय? शिक्षणाच्या बहाण्याने किती जण गोव्यात वास्तव्याला आहेत? त्यांची शिक्षणातील प्रगती काय? ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासणार आहोत की नाही? गोवा म्हणजे आज धर्मशाळा बनलेली आहे. कोणीही यावे, काहीही करावे असा प्रकार चालला आहे. सरकारचे त्यावर तीळमात्र नियंत्रण दिसत नाही. अमली पदार्थ व्यवहारांबाबतची आजवर वेळोवेळी उजेडात आलेली अधिकृत माहिती तपासली तर असे दिसते की विविध राष्ट्रीयत्वाच्या विदेशी नागरिकांचा यात फार मोठा सहभाग दिसतो. नेपाळी, नायजेरियन, जपानी, पॅलेस्टिनी, इस्रायली असे नाना राष्ट्रीयत्वाचे नागरिक त्यात आढळले आहेत. सरकारने सर्व पोलीस स्थानकांच्या हद्दीतील विदेशी नागरिकांची सूची बनवावी, त्यांची सविस्तर माहिती गोळा करावी आणि संशयितांवर सुई ठेवावी! तरच ह्या काट्याचा नायटा होणे टळेल!