यह तेरा बयान गालिब…

0
177

– मनोहर रणपिसे

मिर्जा असदुल्लाखान गालिब हे नाव उर्दू शायरांच्या मांदियाळीत ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळपदी विराजमान होऊन, गेल्या १५० वर्षांहून अधिक काळ आपल्या तेजाने तळपते आहे.
है और भी दुनिया में सुखन्वर बहोत अच्छे
कहते है की गालिब का है अंदाज-ए-बयॉं और|
स्वतःच्या अलौकिक काव्यशैलीविषयी गालिबने स्वतःच्या शेरात सांगितलेलं सत्य हे काळाच्या निकषावर सिद्ध झालेलं आहे.
गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे झाला. त्यांचे घराणे समरकंद येथील तुर्की वंशाचे होते. त्यांचे पूर्वज नशीब काढण्यासाठी भारतात आले व मोंगल शासकांकडे लष्करी हुद्यावर रूजू झाले. गालिबांच्या आजोबांचे घराणे सुखवस्तू असल्यामुळे त्यांचे बालपण अगदी ऐषआरामात गेले. त्यांचे लग्न वयाच्या १३ व्या वर्षीच झाले. त्यांची पत्नी नवाब घराण्यातली होती. गालिब यांना बालपणापासूनच काव्य करण्याचा छंद जडला. त्यांच्या काव्यात त्यांच्या जन्मजात प्रतिभेची चुणूक जाणवू लागली. गालिब ७३ वर्षांचे आयुष्य जगले. त्यांचा जीवनातील बहुतेक काळ दिल्लीतच व्यतित झाला. बालपणी आग्र्याला काही वर्षे त्यांनी उर्दू व पारशीचे शिक्षण घेतले. या दोन्ही भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी या दोन्ही भाषांत काव्यरचना केल्या.
त्यांच्या सासरचे घराणे नवाबाच्या नात्यातील असल्यामुळे दिल्लीतील वास्तव्यात गालिबांना तेथील मान्यवर मंडळीच्या सहवासात वावरायला मिळाले. गालिब दिल्लीला आले तेव्हा दिल्लीच्या तख्तावर शहा आलमचा मुलगा अकबरशहा होता. प्रत्यक्षात त्याची सत्ता लालकिल्ला आणि दिल्ली शहराचा काही भाग याच्याबाहेर नव्हती, तरी पण अकबरशहाच्या आश्रयामुळे दिल्ली शहरात अनेक विद्वान, साहित्यिक व गुणी माणसे जमा झाली होती. कवींमध्ये सुप्रसिद्ध उर्दू शायर जौक, मोमिन शहानसीर अशी नावे प्रमुख होती. राजवाड्यात आणि शहरातही ठिकठिकाणी मुशायरे म्हणजे कविसंमेलने होत असत. त्यात गालिबही भाग घेत असत. दिल्लीत आल्यानंतर गालिब यांच्या कर्तृत्वाला विस्तृत क्षेत्र उपलब्ध होऊन त्यांच्या काव्याचा सर्वत्र बोलबाला होऊ लागला. दिल्लीचा त्यावेळचा बादशहा अकबरशहा यांचा मुलगा युवराज जफर बहादूरशहा नावाने गादीवर बसला. हाच इतिहासात १८५७ च्या बंडामुळे गाजलेला ‘बहादूरशहा जाफर’! बहादूरशहा जफर हा स्वतः चांगला शायर होता. दरबारी ज्येष्ठ कवी जौक हे बहादूरशहा जफरचे काव्यातील गुरू होते. गालिब यांनी त्याच्या काळात दरबारी मान्यवर कवींच्या मांदियाळीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला, पण अंगी गुणवत्ता असूनही त्यांच्या प्रवेशात अनेक अडथळे येत राहिले. अखेर १८४७ साली, बर्‍याच काळानंतर बहादूरशहाच्या दरबारी कवींमध्ये त्यांचा समावेश झाला. पुढे जौक यांच्या निधनानंतर बादशहाचा काव्यातील गुरू म्हणून गालिब यांची नेमणूक झाली व त्यांना दरबारातून मानधनही सुरू झाले.गालिब त्या काळातही जनसामान्यांत आणि जाणकार रसिकांत खूप लोकप्रिय होते. पण त्यांच्या समकालीन उर्दू कवींत गालिब नावडतेच असावे. त्यांनी गालिब यांच्या काव्यावर क्लिष्टतेचा, कृत्रिमतेचा, दुर्बोधतेचा आरोप केला होता. एका मुशायर्‍यात हकीम आगाजान ऐश या शायराने गालिब यांच्या काव्यावर उघड हल्ला चढवला. गालिब यांच्यावर जहरी टीका करताना त्यांनी असा शेर म्हटला की-
अगर अपना कहा तुम आप समझे भी तो क्या समझे
मजा कहने का जब है एक कहे और दूसरा समझे
कला में मीर समझे या जबाने मीरजा समझे
मगर इनका कहा ये आप समझे या खुदा समझे!
परंतु गालिब या हल्ल्यामुळे जराही विचलित झाले नाहीत. अशा ‘पोटदुखी-संप्रदाया’च्या शायरांना जणू निरुत्तर करण्यासाठी त्यांनी आपल्या वृत्तीतील प्रगल्भता दाखवणारे शेर लिहिले. जसे-
यारब वो न समझे है न समझेंगे मेरी बात
दे और दिल उनको जो न दे मुझको जबॉं और|
किंवा हा दुसरा गालिब यांचा शेर पहा:
न सताइश की तमन्ना न सिले की पर्वा
गर नहीं है मेरे अशआर में मानी न सही|
(म्हणजे, मी प्रशंसा मिळवण्यासाठी अथवा त्यापासून काही लाभ, फलप्राप्ती करून घेण्यासाठी लिहीत नाही. मला अशा गोष्टींची पर्वा नाही आणि तुम्हाला ते क्लिष्ट, बोजड वाटत असेल तर मला त्याचीही पर्वा नाही.)
गालिब यांच्या काव्यावर अर्थहीन, बोजड असे खोटे आरोप करणार्‍या तत्कालीन टीकाकारांना काळानेच समर्पक उत्तर दिले आहे की, गालिब यांच्या काव्याइतकं अर्थपूर्ण, सोपं आणि जनसामान्यांच्या व जाणकारांच्याही ओठांवर राहील असं काव्य तत्कालीन इतर कोणाचंही नव्हतं. असं काव्य त्या काळातील इतर कोणाला फारसं लिहिता आलं नव्हतं. अगदी आजच्या काळातही जगात शेक्सपियर व गालिब हे दोघे सर्वाधिक संदर्भमूल्य असणारे साहित्यिक आहेत.
गालिब यांचे १५ फेब्रुवारी १८६९ रोजी दिल्ली येथे निधन झाले. त्यानंतर आज जवळजवळ १५० वर्षांचा काळ गेला आहे. गालिब यांचे जे कोणी समकालीन टीकाकार शायर होते, त्यांचं काव्य व त्यांची नावे आज जवळजवळ विस्मृतीत गेली आहेत. परंतु गालिब हा कवी आजही रसिकांचा, समीक्षकांचा, विचारवंतांचा, संगीतकारांचा, गायकांचा लाडका कवी आहे.
जगातील अनेक भाषांतील समीक्षकांनी, विचारवंतांनी गालिब यांच्या गझलांतील विविध पैलूंवर विपुल लेखन केले आहे, आजही करताहेत आणि यापुढेही केले जाणार आहे. कारण प्रत्येक काळात गालिब यांचं काव्य हे समकालीन परिस्थितीशी निगडीत वाटतं. गालिब यांच्या काव्याचं हे वैशिष्ट्यच आहे की ते प्रत्येक काळात त्या काळाचं वाटतं, समकालीन वाटतं, आजचं वाटतं!
गालिब यांच्या काव्यात जीवनाचं जे तत्त्वज्ञान येतं ते स्थळ-काळ निरपेक्ष असं सार्वकालिक आहे. सर्व मानवजातीला लागू पडेल असं आहे. ते तत्त्वज्ञान त्यांच्या सर्व प्रकारच्या शेरांतून जाणवतं. मग ते शेर प्रेमविषयक असो, जीवनाविषयी असोत अथवा सूफी तत्त्वज्ञानविषयक असोत! जसे ः
मुहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का
उसी को देखकर जीते है जिस काफिर पे दम निकले|
किंवा
रंज से खूगर हुवा इन्सान तो मिट जाता है रंज
मुश्किले मुझपर पडी इतनी कि आसॉं हो गयी|
किंंवा
इश्क पर जोर नहीं ये है वो आतिश गालिब
के लगाये न लगे और बुझाये न बने|
किंवा
मेरी किस्मत में गम गर इतना था
दिल भी या-रब कई दिए होते|
किंवा
कहॉं मैखाने का दरवाजा गालिब और कहॉं वाएज
पर इतना जानते है कल वह जाता था के हम निकले|
गालिब यांचे असे विविध तर्‍हेचे शेर वाचले की त्यांची असामान्य प्रतिभा, त्यांच्या काव्यशैलीतला अवीट गोडवा, त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान, त्यांची कलंदर कवीवृत्ती कळून येते आणि गालिबांविषयीचा आदर शतपटीने द्विगुणित होतो. गालिबांचं जीवनचरित्र ज्यांनी वाचलं आहे त्यांना कळेल की हा काव्य-कल्पनाविलास नाही, तर हे त्यांचे स्वानुभवाचे बोल आहेत.
गालिब यांच्या वाट्याला वरवर सुखवस्तू वाटणारं, परंतु वस्तुतः अतिशय दुःखमय, विवंचनामय, संकटग्रस्त, धकाधकीचं जीवन आलं. जे काव्य त्यांचं जीवन-सर्वस्व, त्याच्यावर त्यांच्या समकालीनांनी टीकेची झोड उठवली. जनमानसांत अत्यंत प्रिय असलेलं गालिब यांचं काव्य, पण समकालीन ज्येष्ठांनी त्यांच्या महानतेची कदर करण्याऐवजी टिंगल-टवाळी केली. त्यांना आर्थिक विवंचना आयुष्यभर सतावत राहिली. तुटपुंज्या पेन्शनवर त्यांची उपजीविका! त्यासाठीही कोर्टाचे कज्जे-खटले लढावे लागले. गालिब यांचा लहान भाऊ बालपणापासूनच मतिमंद होता. त्याचा त्यांना आयुष्यभर सांभाळ करावा लागला. गालिब यांना ७ मुलगे झाले आणि सातही ४-६ महिन्यांच्या वयातच वारले. त्यांचा ‘आरिफ’ नावाचा अत्यंत प्रिय पुतण्या होता, तोही तारुण्यातच वारला. त्याच्या दोन अनाथ मुलांचा सांभाळ गालिब यांनीच केला. एक नृत्यांगना/गणिका त्यांची प्रेयसी होती, तिचंही अकाली निधन झालं. बादशहा जफरचे गुरूपद त्यांना मिळाले. पण त्यानंतर लवकरच १८५७ चे बंड झाले. बादशहाला ब्रिटिशांनी कैद करून रंगून जेलमध्ये टाकले. गालिब यांच्या डोळ्यांसमोर मोंगल साम्राज्याचा अस्त झाला.
१८५७ च्या बंडानंतर दिल्लीत दोन भयानक मानवी कत्तली झाल्या. पहिल्या कत्तलीत बंडखोर शिपायांनी दिल्लीतील ब्रिटिश नागरिकांची अमानुष कत्तल केली. तो प्रकार ४ महिने सुरू होता. त्यानंतर ब्रिटिश सैनिक दिल्लीत घुसले. त्यांनी वेचून वेचून दिल्लीतील मुसलमानांच्या नृशंस कत्तली केल्या. त्या काळात गालिब यांनी लपवलेले सर्व पैसे, त्यांच्या पत्नीचे खानदानी दागिने लुटले गेले. कवी म्हणून त्यांच्या लौकिकाचा, लोकप्रियतेचा आदर करणार्‍या काही ब्रिटिश अधिकार्‍यांमुळे गालिब यांचा जीव कसाबसा वाचला. दंगलीमुळे घराबाहेर पडता येत नसे. त्यावेळी गालिब यांच्यावर घरातील कपडे विकून उदरनिर्वाह करण्याची पाळी आली. या रक्तरंजित मानवी कत्तलींनी त्यांचं हळवं कवीमन विदीर्ण झालं. त्या कत्तलींत त्यांचे अनेक जिवलग स्नेही, मित्र, कुटुंबातील माणसे, नात्यागोत्यातली माणसे मारली गेली…. एवढा दुःखाचा अतिरेक सोसूनही गालिब ‘मुश्किलें मुझपर पडी इतनी के आसान हो गई..’ असं काव्य लिहू शकला. यातच त्यांची महानता आली. त्यांचं काव्य सार्वकालिक का आहे याची प्रचिती आली.
गालिब यांचं काव्य उथळ अजिबात नव्हतं. त्यात अर्थाचा महासागर सामावला होता. त्याचा तळ शोधू पाहणार्‍यांची दमछाक होते. त्यांच्या गझलांतील प्रत्येक शेरामागे, कल्पनेमागे त्यांची ‘गहरी-सोच’ होती. जीवनातल्या अपार दुःखांचा साक्षात्कार होता. पण त्या अनुभवांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन प्रेमय तत्त्ववेत्त्याचा, अत्यंत सुसंस्कृत मनाचा असल्यामुळे गालिब रसिकाला जीवनाच्या भयानकतेने घाबरवत नाहीत, उलट दिलासा देतात, जीवनावर प्रेम करायला शिकवतात, दुःख भोगण्याची सोशिक तटस्थता शिकवतात.
गम-ए-हस्ती का ‘असद’ किस से हो जुज मर्ग इलाज
शम्‌‌‌अ हर रंग में जलती है सहर होने तक…
मृत्यू येईपर्यंत शांत-सोशिकपणे जीवन जगायचा सल्ला देतो. त्यावेळी जीवनातील शाश्‍वत सत्याचा, ‘गालिब खस्ता के बगैर कौनसे काम बंद है?’ अशा ओळीतून प्रत्ययकारी अनुभवसिद्ध साक्षात्कारही घडवतो.
गालिब यांची ही जी ‘गहरी सोच’ आहे, तिचा त्यांच्याच काही शेरांतून परिचय करून घेऊ. गालिब यांच्या काव्यावर सूफी तत्त्वज्ञानाचा फार प्रभाव होता. सूफी हे प्रेयसीला परमेश्‍वर आणि परमेश्‍वराला प्रेयसी समजतात. आपल्या प्रेयसीमध्ये ईश्‍वराचा साक्षात्कार झालेले गालिब लिहून जातात की,
जब की तुझबिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा-ए-खुदा क्या है|
गालिब प्रेयसीला उद्देशून मोठा क्रांतिकारक, सनातन्यांचा रोष ओढवून घेणारा विचार मांडतात की, ‘हे प्रिये, मला तर या विश्‍वातल्या प्रत्येक वस्तूत तुझंच अस्तित्व, अर्थात प्रत्येक ठिकाणी तूच दिसतेस. मग लोकांनी ‘खुदा खुदा, परमेश्‍वर परमेश्‍वर’ म्हणून जो आरडाओरडा चालवलाय तो खुदा कोण आहे?’ वस्तुतः हा शेर पवित्र कुराणाच्या शिकवणुकीविरुद्ध बंडखोरी करणारा वाटतो, पण तो विचार गालिब यांनी निरागस प्रेमाच्या पवित्र रसायनात घोळवून इतक्या सुंदर तर्‍हेने मांडलाय की लोकांना गालिब यांच्या विधानात आक्षेपार्ह काही वाटत नाही. ते त्यांच्याच प्रेमाचं तत्त्वज्ञान वाटतं.
हा दुसरा एक सूफी तत्त्वज्ञानावर आधारित गालिब यांचा शेर पहा-
इशरते कतरा है दरिया में फना हो जाना
दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना|
‘फना’ ही सूफी तत्त्वज्ञानातील अति उच्च दर्जाची अवस्था आहे. हिंदू धर्मातील ‘मोक्ष’ किंवा बौद्ध धर्मातील ‘निर्वाण’ तशीच सूफींची ‘फना’ ही संकल्पना! सूफी सांगतात, मानवी जीवनाचे अंतिम साफल्य म्हणजे परमेश्‍वराच्या अस्तित्वात विलीन होणे. ‘फना’ होणे, अस्तित्व न उरणे म्हणजेच सुख-दुःख अशी कोणतीच भावना न उरणे. मानवी दुःखांचंही तसंच आहे. दुःखांचा अतिरेक झाला की ती परिणामशून्य होतात. दुःखाच्या वेदना न जाणवल्यामुळे जणू सुखाचीच अनुभूती होते. हा इतका गहन विचार गालिब यांनी आपल्या काव्यप्रतिभेने सर्वसामान्यांना कळेल इतका सोपा करून मांडलाय. हे गालिबच करू जाणे! आपल्या या अलौकिक प्रतिभा-सामर्थ्यावर गालिब यांनी आपल्याच एका शेरात फार बोलकं पण अवलिया संतासारखं भाष्य केलंय. गालिब म्हणतात ः
ये मसायले तसव्वुफ… ये तेरा बयान गालिब
तुझे हम वाली समझते, जो न बादाख्वार होता|
गालिब जणू स्वतःच्या असामान्यत्वाचा साक्षात्कार झाल्याप्रमाणे उद्गारतात की, गालिब, तुझं हे गूढ सूफी तत्त्वज्ञान इतक्या शैलीदारपणे उलगडून दाखवणे, अरे तू मद्यपी नसतास तर तुला अवलिया संतच समजलो असतो…. खरोखर, गालिब हे आपल्या आयुष्यात डोंगराएवढे दुःख पचवून, जीवनावर आपल्या काव्यातून एवढे संयत आणि इतरांना मार्गदर्शक होतील असे विचार देणारे संतच होते! पण ते आधुनिक जनसामान्यांतून आलेले संत होते. स्वतःच्या दोषांवर पांघरूण घालणारे भोंदूबाबा नव्हते. म्हणून ते आपण दारुड्या आहोत याची प्रामाणिक कबुली देतात. त्यांच्या कथनातील प्रामाणिकपणा आणि त्यांच्या वर्णनशैलीतून अलौकिक प्रतिभेचा साक्षात्कार झाल्यामुळे गालिब रसिकांचे लाडके कवी झाले. ते समाजातील सर्व थरांतील लोकांना आपलेच वाटतात. हेच गालिब यांच्या महानतेचे व यशाचे रहस्य आहे.
गालिब यांचा केवळ सूफी तत्त्वज्ञानाचाच अभ्यास नव्हता तर हिंदू धर्मातील वेदांत तत्त्वज्ञानावरही आपल्या शेरात ते समर्थ भाष्य करतात. गालिब म्हणतात:
न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता|
वेदांत तत्त्वज्ञान सांगते, माणूस ब्रह्माचा अर्थात परमेश्‍वराचा अंश असतो. (अहं ब्रह्मास्मी) गालिब म्हणतात, मी जेव्हा मनुष्य रूपात जन्म घेतला नव्हता तेव्हा परमेश्‍वर रूपात (परमेश्‍वराचा अंश) होतो. मी मानवी जन्माला येऊन मानवी दुर्गुण चिकटल्याने माझा अधःपात झाला. माणूस म्हणून जन्मलो नसतो तर परमेश्‍वरच राहिलो असतो.
…गालिब त्यांच्या काव्यात अनेक रूपांत आपल्याला दिसतात. तत्त्वज्ञानी गालिब, बंडखोर गालिब, प्रेमिक गालिब, पाखंडी विचारांचा विरोधक गालिब, मदिराभक्त गालिब, भाषाप्रभू गालिब, सौंदर्याचा पूजक गालिब… अशी गालिबांची अनेक रूपं जरी त्यांच्या काव्यातून दिसत असली तरी मला वाटतं ‘प्रेमिक गालिब’ हे त्यांचं रूप बाकीच्या सगळ्या रूपांपेक्षा अधिक ठळक, परिपूर्ण आणि सशक्त आहे. त्यांच्या काव्यातून प्रेयसीवर प्रेम करणारा गालिब, जीवनातील दुःखांवर प्रेम करणारा गालिब, जीवनावर प्रेम करणारा गालिब, मदीरेवर प्रेम करणारा गालिब, माणसांवर प्रेम करणारा गालिब, तत्त्वज्ञानावर प्रेम करणारा गालिब, जीवन संघर्षावर प्रेम करणारा गालिब, शत्रूंवर प्रेम करणारा गालिब, सृष्टीवर प्रेम करणारा गालिब, प्रेयसीच्या नखर्‍यांवर, तिच्या लहरीपणावर प्रेम करणारा गालिब, परमेश्‍वरावर प्रेम करणारा गालिब, नास्तिकतेवर प्रेम करणारा गालिब… त्यांच्या काव्यात दिसणार्‍या विविध रूपांत प्रेम हा स्थायिभाव आहे. म्हणूनच प्रेममय गालिब हेच त्याचं स्थायी रूप उरतं.
गालिब यांच्या काव्यातील त्यांचं प्रत्येक रूप विलोभनीय आहे. ही काव्यरूपं आपल्याला मोहीत करतात. कारण गालिब हा मुळात चांगला माणूस आहे. ‘इच्छा इन्सान’ आहे. आपल्या त्या सुप्रसिद्ध शेरात गालिब यांनी हाच विचार मांडलाय. ते म्हणतात ः
बस के दुश्‍वार है हर काम का आसान होना
आदमी को भी मयस्सर नहीं इन्सान होना|
प्रत्येक काम सोपं होणं फार कठीण आहे, हे सांगताना त्यांच्या पाठीमागचा गालिब यांचा विचार असा आहे ः आईच्या पोटी जन्म घेतल्यावर आपण त्यावेळी फक्त आदमी असतो. आदमी ते इन्सान बनण्याची ही फार दीर्घ आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे. बुद्ध, येशू, पैगंबर, तुकाराम वगैरे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच इन्सान असतात. ही प्रक्रिया कठीण असली तरी अशक्य मात्र नाही. जगातले अनेक पुरुष, स्त्रिया या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. याच खर्‍या इन्सानांच्या मांदियाळीत प्रत्येक युगात अशी उदाहरणं भेटतात. कुठे ज्ञानेश्‍वर असतो, कुठे कबीर, तर कुठे गालिब! गालिब महापुरुष नसतील, पण चांगला माणूस आहे, इन्सान आहे, मानवतेने परिपूर्ण इन्सान आहे याची प्रचिती त्यांच्या काव्यात जागोजागी येते. त्यांचा हा काव्यप्रवास पाहिल्यावर आपण म्हणू शकतो, ‘आदमी को भी मयस्सर है इन्सॉं होना!’ गालिब यांचं काव्य आपल्याला इन्सान बनण्याची प्रेरणा देते म्हणून त्यांचं काव्य श्रेष्ठ दर्जाचं आहे.