यशस्वी कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची यशोगाथा

0
160

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

या आठवड्यात आपल्याला परिचय करून देण्यासाठी निवडलेली दोन पुस्तके आहेत देशातील आघाडीचे केशभूषातज्ज्ञ जावेद हबीब यांचे ‘ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग’ आणि दुसरे आहे अमेरिकी नौदलाच्या एका निवृत्त सील कमांडोने लिहिलेले नेतृत्वाचे फील्ड मॅन्युअल, ‘लीडरशीप स्ट्रॅटजी अँड टॅक्टीक्स.’ एक आहे कर्तृत्वाविषयी आणि दुसरे आहे नेतृत्वाविषयी…

वेद हबीब हे नाव आपल्या कानावरून निश्‍चितच गेलेले असेल. भारतातील आघाडीचे ‘हेअर स्टायलिस्ट’ अशी स्वतःची ओळख निर्माण केलेल्या जावेद हबीब हा केशकर्तन आणि केशभूषेच्या क्षेत्रातील एक ‘ब्रँड’ बनला आहे. पणजीसह देशातील ११० शहरांमध्ये ‘जावेद हबीब’ या ब्रँडखालील तब्बल ८६० आधुनिक केशकर्तनालये आहेत. देशातील पंधरा लाख लोक त्यांचे ग्राहक आहेत. शिवाय परदेशात दुबई, नेपाळ, बांगलादेशामध्ये देखील हा ब्रँड पोहोचला आहे. स्वतः जावेद हबीब रोज आपल्याला टीव्हीच्या पडद्यावर दिसतात ते ‘सनसिल्क’ च्या जाहिरातींमध्ये त्यांचे ब्रँड ऍँबेसेडर म्हणून. एका दिवसात ४१० जणांचे केस कापून एकेकाळी विक्रम प्रस्थापित केलेल्या जावेद हबीब यांनी आपल्या आजवरच्या प्रवासाची कहाणी अतिशय प्रांजळपणे आणि खुलेपणाने वाचकांपुढे एका पुस्तकाद्वारे नुकतीच ठेवली आहे, ज्याचे नाव आहे, ‘ऍटिट्यूड इज एव्हरिथिंग.’
जावेद हबीब यांच्या व्यवसायाची तर ही यशोगाथा आहेच, परंतु त्याच बरोबर त्यापासून होतकरूंना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे हे ‘सेल्फ हेल्प’ पुस्तक देखील ठरेल अशी त्याची एकूण रचना केलेली आहे. आयुष्यामध्ये यश मिळवायचे असेल तर आधी आपल्या ‘कंफर्ट झोन’ मधून बाहेर पडा या संदेशानिशी या पुस्तकाची सुरूवात होते. एखाद्या गोष्टीची गरज उद्भवेपर्यंत थांबू नका, पूर्वनियोजन करा हा त्यांचा कानमंत्र आहे. विश्वप्रलयापूर्वीच नोहाने आपली नौका बांधली नसती तर? असा सवाल ते विचारतात.

जावेद हबीब यांचे आजोबा नाझीर अहमद हे दिल्लीच्या व्हाईसरॉइज् हाऊसचे (आजचे राष्ट्रपती भवन) अधिकृत नाभिक होते. शेवटचे ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे ते अधिकृत नाभिक होते. माऊंटबॅटन जेव्हा देश सोडून निघाले तेव्हा त्यांनी आपल्या या रोजच्या केशकर्तनकारास त्याच्या मुलाला केशभूषेचे रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला जायचा सल्ला दिला. जावेदच्या आजोबांनीही त्यांचा हा सल्ला मानला आणि आपल्या मुलाला महत्प्रयत्नांती विदेशात रीतसर प्रशिक्षणासाठी पाठवले.

हा मुलगा तेथे प्रशिक्षित होऊन परत आला, मात्र त्याने राष्ट्रपती भवनातील ती नोकरी पत्करली नाही. तो देशातील पहिला विदेशात प्रशिक्षित झालेला केशभूषाकार झाला आणि आपल्या ‘हबीब्स हेअर अँड ब्यूटी सॅलॉन’ मधून विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींचे केशभूषाकार म्हणून काम करू लागला. जावेद हबीब हे त्यांचे चिरंजीव. तेही विदेशात प्रशिक्षण घेऊन आले आणि वडिलांचा वारसा चालवू लागले.
नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाची वाट चालू लागलेल्या भारताची आधुनिक केशकर्तनालयांची गरज त्यांनी जाणली आणि त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली. कलकत्त्याला त्यांनी आपले असे पहिले आधुनिक केशकर्तनालय उघडले तेव्हा त्या जागेचे भाडेच होते महिना एक लाख रुपये. परंतु ग्राहकांचा प्रतिसाद एवढा लाभत गेला की महिन्याभरातच दुसरी ुदुप्पट मोठी जागा घेऊन व्याप वाढवावा लागला. आज जावेद हबीब यांच्या आठशेहून अधिक केशकर्तनालयांपैकी शंभरहून अधिक फक्त पश्‍चिम बंगालमध्येच आहेत.

आपल्या केशकर्तनाच्या प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी काही काळ मॅकडोनाल्डस् मध्ये उमेदवारी केली होती. त्यांचे १२० देशांत ३८ हजार स्टोअर्स आहेत. त्यांचे सहा कोटी ऐंशी लाख ग्राहक आहेत. या सर्वांना ते सेवा कसे पुरवतात, त्यांच्या यंत्रणा आणि प्रक्रिया काय आहेत याचा डोळसपणे जावेद यांनी अभ्यास केला.

आपल्या केशकर्तनालयांच्या क्षेत्रामध्येही याच प्रकारे काही करता येईल का याचा विचार त्यांनी चालवला आणि त्यातूनच आधी भागिदारीत आणि नंतर फ्रँचायजींच्या माध्यमातून त्यांनी आपला ब्रँड केशकर्तनालयांच्या वेगळ्याच क्षेत्रात निर्माण केला आहे.
आज ब्यूटी पार्लर्सचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे, परंतु जेव्हा ती संकल्पनाच देशात नवी होती, अशा काळामध्ये केशकर्तन आणि केशभूषा यासाठी अशा प्रकारची साखळी उभी करण्याचे काम जावेद यांनी केले. व्यवसायाचे धडे अनुभवातून घेत ते पुढे गेले. पहिल्यांदा भागीदारीचे करारपत्र त्यांनी केले होते ते अवघ्या दोन पानांचे होते. आता फ्रँचायजींसाठीचे त्यांचे करारपत्र तब्बल साठ पानी असते. आलेल्या अनुभवांतून धडे घेत त्यांनी हे बदल केले आहेत.
कोणत्याही कल्पनेला ‘एक्स्पायरी डेट’असते हा त्यांचा सिद्धान्त आहे. त्यामुळे कालानुरूप बदल कराल तर टिकाल हे त्यांचे व्यावसायिकांना सांगणे आहे.

दर महिन्याला केशकर्तनालयात जाऊन केस कापणे हा कंटाळवाणा दिनक्रम होत असे. तो एक आनंददायी अनुभव व्हावा असा प्रयत्न जावेद हबीब यांनी आपल्या केशकर्तनालयांतून केला. इंटिरिअर, स्वच्छता यावर भर दिला. केस कापल्यावर आंघोळ करण्याची आपल्याकडे जी प्रथा आहे तिचे मूळ केशकर्तनालयांतील अस्वच्छतेत असल्याचे ते म्हणतात. त्यामुळे आपल्या केशकर्तनालयांमध्ये ग्राहकांचे केस कापण्याआधी शँपुईंग करणे बंधनकारक केलेले असल्याचे ते सांगतात. स्वच्छ टॉवेल, कटिंग शिटस् आदींचा वापर करून ग्राहकांना केस कापून थेट कामावर जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी आपल्या केशकर्तनालयांतून करून दिली, जी प्रचंड लोकप्रिय ठरली. जावेद हबीब हा महागडा ब्रँड असल्याचा ग्राहकांचा समज होऊ शकतो, परंतु आपल्या ‘हेअरएक्स्प्रेसो’ मध्ये केस कापण्याचे दर केवळ १४९ रुपये ते ७०० रुपये असल्याचे आणि थोड्या आलिशान अशा लाऊंजमध्ये ते ११०० रू. पर्यंत असल्याचे ते सांगतात. केशकर्तनाच्या आणि केशभूषेच्या रीतसर शिक्षणाचा उपक्रमही त्यांनी राबवलेला आहे किंबहुना देशातील नाभिकांच्या असंघटित क्षेत्राला प्रशिक्षित करण्याचा मानसही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केलेला आहे.

‘आम्ही ज्याच्याविषयी ग्राहकांना सांगतो तो ‘ब्रँड’ नव्हे, तर ग्राहकच एकमेकांना ज्याच्याविषयी सांगतात तो खरा ‘ब्रँड’ असे जावेद हबीब यांनी नमूद केले आहे ते पटण्याजोगे आहे!
जावेद हबीब यांच्या पुस्तकाच्याच ‘सेल्फ हेल्प’ धाटणीचे, परंतु नेतृत्वगुणांविषयीचे अतिशय सुंदर मार्गदर्शन करणारे या आठवड्यात आपल्याला परिचय घडवणार असलेले दुसरे पुस्तक आहे, ‘लीडरशीप स्ट्रॅटजी अँड टॅक्टीक्स.’ जोको विलिंक यांनी लिहिलेले हे ‘फील्ड मॅन्युअल’ आहे. जोको विलिंक हे अमेरिकेच्या नौदलाच्या ‘सील’ कमांडो (ज्यांनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला) पथकाचे माजी सदस्य आहेत.

आजकाल ‘सेल्फ हेल्प’ प्रकारची असंख्य पुस्तके येतात, त्यातलेच हे एक असे मानणे चुकीचे ठरेल. नेतृत्वाची कार्यपद्धती यापूर्वी अमलात आणल्या गेलेल्या सिद्धान्तांच्या आधारे यशस्वीपणे अवलंबिता येऊ शकते असा विश्वास देणारे हे दोन खंडांत विभागलेले मार्गदर्शनपर पुस्तक आहे.

पहिल्या खंडाच्या पहिल्या भागात नेतृत्वाच्या आवश्यक धोरणांविषयी त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. समस्यांचा सामना नेत्याने कसा करावा, प्रसंगी ताठा कधी दाखवावा आणि नरमाई कधी स्वीकारावी, कधी पुढून नेतृत्व करावे, कधी मागे राहून पाठबळ द्यावे, सहकार्‍यांशी कसे वर्तन करावे, अशा विविध विषयांवरील अतिशय वाचनीय आणि अनुकरणीय असे हे मार्गदर्शन आहे.
पहिल्या खंडाच्या दुसर्‍या भागामध्ये नेतृत्वाची मूलभूत तत्त्वे, स्वतःविषयीचा विश्वास कसा निर्माण करावा, जबाबदारी कशी स्वीकारावी, काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे कसे निवडावे, याविषयी उपयुक्त मार्गदर्शन आहे.

दुसरा खंड हा नेतृत्वाच्या रणनीतीची सविस्तर चर्चा आहे. नवीन नेता म्हणून यशस्वी कसे व्हावे, अनुयायाकडून नेत्यापर्यंत कसे पोहोचावे वगैरे वगैरेंची चर्चा आहे, तर दुसर्‍या खंडाच्या दुसर्‍या भागात नेतृत्वाच्या कौशल्यांविषयी लेखकाने मार्गदर्शन केले आहे. कोणत्याही क्षेत्रातील नेत्याला सामोरे जाव्या लागणार्‍या परिस्थितीत कसे वागायला हवे यासंबंधी त्यात दिशादिग्दर्शन केलेले आहे.
खरोखरच नेहमी हाताशी ठेवावे असे हे ‘फील्ड मॅन्युअल’ कोणत्याही नेत्याच्या जीवनातील नेहमी उद्भवणार्‍या प्रसंगांमध्ये कसे वागावे व आलेल्या आव्हानांवर कशी मात करावी यासंबंधी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे आहे आणि अतिशय शिस्तशीर वर्गीकरणामुळे आणि शैलीमुळे वाचनीयही बनले आहे.