यशवंत सिन्हांच्या ‘राष्ट्र मंच’मध्ये शत्रुघ्न सिन्हांसह अनेकांचा सहभाग

0
86

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ‘राष्ट्र मंच’ या राजकीय कृती गटाची स्थापना केली असून त्यात भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील काही राजकीय नेत्यांनी प्रवेश केला आहे. राष्ट्र मंच हा बिगर पक्ष राजकीय गट असल्याचे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

यशवंत सिन्हा यांच्या या नव्या राजकीय मंच स्थापना सोहळ्यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी, कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार माजिद मेमन, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता, जदयूचे नेते पवन वर्मा आदी राजकीय नेते उपस्थित होते. या व्यतिरिक्त राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी व माजी केंद्रीय मंत्री सोम पाल व हरमोहन धवन यांचाही उपस्थितांमध्ये समावेश होता.

या सोहळ्यावेळी जयंत सिन्हा यांनी सांगितले की, ‘राष्ट्रमंच’ हा आपला राजकीय कृती गट केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात लवकरच चळवळ उभारणार आहे. ७० वर्षांपूर्वी ३० जानेवारी रोजी (कालचा दिवस) महात्मा गांधींची हत्या झाली होती. त्यावेळी लोकशाही व लोकशाहीप्रधान संस्थांवर जे हल्ले होत होते तशीच स्थिती आजही निर्माण झाली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशातील शेतकर्‍यांना मोदी सरकारने भिकार्‍यांच्या पंक्तीत बसविल्याचा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला. तसेच स्वतःच्या हितासाठी खास आकडेवारी तयार करून घेऊन प्रचार केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

म्हणून राष्ट्र मंचमध्ये सहभागी ः शत्रुघ्न
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, भाजपात आपल्याला स्वतःची मते व्यक्त करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नसल्याने आपण ‘राष्ट्र मंच’मध्ये सहभागी झाल्याचे सांगितले. मात्र आपल्या या निर्णयाला कोणीही पक्षविरोधी कृती समजू नये. कारण आपला हा निर्णय राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून आहे, असे ते म्हणाले.

भाजपात प्रत्येकजण
भीतीच्या छायेत
राष्ट्रमंच कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून ती एक राष्ट्रीय चळवळ आहे. हा मंच राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रकाशझोत पाडणार आहे असे ते म्हणाले. भाजपातील प्रत्येकजण भीतीच्या छायेत वावरत असल्याचा दावाही यशवंत सिन्हा यांनी केला. संसदेच्या विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ चार दिवस कामकाजाचे असतील. याआधी असे कधी घडले नव्हते याकडे त्यांनी लक्ष वेधले.