यंदा २२ सरकारी हायस्कूल्सचा दहावीत १०० टक्के निकाल

0
80

यंदा दहावी परीक्षेत राज्यातील सरकारी हायस्कूल्सची कामगिरी अतिशय स्पृहणीय ठरली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ही हायस्कूल्स बहुतेक ग्रामीण भागांमधील आहेत. एकूण ७७ सरकारी हायस्कूल्सपैकी २२ हायस्कूल्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामुळे बहुसंख्येने ग्रामीण भागातील या शाळा असूनही कठोर मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यास काहीही अशक्य नसल्याचे या शाळांच्या कामगिरीवरून दिसून आले आहे. तसेच या शाळांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यास यामुळे मदत होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे म्हणणे आहे.

२२ शाळांच्या १०० टक्के निकालामुळे सरकारी शाळांचा दर्जा वाढला आहे. वरील शाळांपैकी ४० शाळांचा निकाल ८० ते ९० टक्के एवढा लागला आहे. सरकारी शाळांच्या या कामगिरीत विद्यार्थी-शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नांचे मोठे योगदान आहे. तसेच सरकारने उपलब्ध केलेल्या योजना व सुविधा या कामगिरीसाठी विद्यार्थी व शिक्षकांना सहायभूत ठरल्याचे एका सरकारी पत्रकात म्हटले आहे.

नेत्रदीपक कामगिरी बजावलेल्या या ग्रामीण भागातील सरकारी शाळा बार्देशमधील नादोडा-रेवोडा, मुळगाव येथील आहेत. डिचोली तालुक्यातील आमोणा, तारमाथा सूर्ल, काणकोण तालुक्यातील आगोंद, गावडोंगरी, सादोळशे व खोतीगाव या शाळा आहेत. शंभर टक्के निकाल लागलेल्या अन्य सरकारी शाळांत आगरवाडा-पेडणे, सावईवेरे यांचा समावेश आहे. सांगेतील नेत्रावळी व दयानंदनगर सरकारी शाळा, वाळपई सरकारी शाळा, शारदा विद्यालय सरकारी शाळा, कुंभारजुवे तसेच दोनापावल येथील सरकारी हायस्कूलचा समावेश आहे.

शिक्षण जनतेच्या दारापर्यंत पोचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून गोवा सरकारने अविरत प्रयत्न केल्याचे या पत्रकात म्हटले आहे. शिक्षणातील गुणात्मक सुधारणांसह शिक्षकांना अध्यापनाच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त करण्यावरही सरकारने सदैव भर दिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.