यंदा इफ्फीत गोमंतकीय चित्रपट व लघुपटांचे प्रिमियर

0
130

यंदा इफ्फीत गोवा विभागात गोमंतकीय निर्मात्यांनी तयार केलेले चित्रपट व लघुपट यांचे प्रिमियर होणार असून या विभागासाठी ‘महाप्रयाण’ या फिचर फिल्मची तर अन्य तीन बिगर फिचर फिल्म्सची निवड झाली असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, इफ्फीसाठी आतापर्यंत ५४५१ जणांनी प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली आहे. त्यांपैकी ४७२३ जणांची नोंदणी मंजूर झाली आहे.

‘महाप्रयाण’चे निर्माते अभय जोग आहेत. बिगर फिचर फिल्म्समध्ये ‘मेरीसोल १९९८’- निर्माता सुयश कामत, ‘झुजारी’- निर्माता-दिग्दर्शक – मंदार तळावलीकर, टिफीन बॉक्स – निर्माता ब्रिजेश काकोडकर यांचा समावेश आहे.

वेंडेल ड्रेस डिझाईन करणार
दरम्यान, ईएसजीचे कर्मचारी व महोत्सवाचे अधिकारी यांचे ड्रेस डिझाईन करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ड्रेस डिझायनर वेंडेल रॉड्रिग्ज यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे तालक यांनी सांगितले. दरम्यान, गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर हे इफ्फीनिमित्त ईएसजी इमारतीच्या विरुद्ध दिशेने आर्ट इन्स्टॉलेशन उभारणार आहेत.

बायोस्कोप
‘न्यू एज सिनेमा’ असा विषय असलेली बायोस्कोप यंदा उभारण्यात येणार असून तेथे इफ्फिनिमित्त चार तात्पुरती थिएटर्स उभारण्यात येणार आहेत. दर एका थिएटरमध्ये १५० जणांना बसण्याची सुविधा असेल. २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वा. या बायोस्कोपचे बॉलिवूडमधील एका अभिनेत्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. चित्रपट उद्योगात करियर घडवण्यासाठी कोणत्या कौशल्याची गरज आहे त्यासंबंधीची माहिती या स्कील स्टुडियोत मिळू शकेल, असे तालक यांनी सांगितले. महोत्सवात ‘इफ्फी एस् नेव्हर सीन बिफोर’ या विषयावरील एका तीन मिनिटांच्या शॉर्ट फिल्म स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. बक्षीस वितरण २७ नोव्हेंबर रोजी होणार असून फिल्मचे चित्रिकरण मोबाईलवरून करावे लागणार आहे.

हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या मुलाखती घेण्यासाठी खास एक कट्टा उभारण्यात येणार असून रोज संध्याकाळी ७.३० ते ८.३० या दरम्यान तेथे एका हिंदी व एका मराठी चित्रपट कलाकाराची मुलाखत नामवंत चित्रपट पत्रकारातर्फे घेण्यात येणार आहे. नंतर सदर कलाकारांचा लोकांबरोबर संवादही होणार आहे.
गोमंतकीय कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी एक परफॉर्मिंग व्यासपीठ असेल. तेथे स्थानिक कलाकार जाऊन आपली कला सादर करू शकतील. मात्र, त्यासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे.