म्हापसा रविंद्र भवनबाबत सोमवारी अंतिम निर्णय

0
119

>> मंत्री गोविंद गावडेंची माहिती

म्हापसा येथील रवींद्र भवन उभारण्यासाठी बोडगेश्‍वर मंदिराजवळील २० हजार चौरस मीटर जागेचा विचार केला जात आहे. येत्या सोमवारी ८ जुलैला होणार्‍या बैठकीत रवींद्र भवनाच्या उभारणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

बार्देश तालुक्यात रवींद्र भवन बांधण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. परंतु, जागेच्या अभावामुळे रवींद्र भवनाचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसोझा यांनी रवींद्र भवनासाठी ८ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध केली होती. सदर जागा अपुरी असल्याने रवींद्र भवनाचे काम मार्गी लागू शकले नाही. म्हापसा डाऊन टाऊन आराखड्याअर्तंगत मरड म्हापसा येथे बोडगेश्‍वर मंदिराजवळ २० हजार चौरस मीटर जागेचा नवीन प्रस्ताव विचाराधीन आहे. ही जागा कोमुनिदाद आणि मुंडकारांच्या मालकीची आहे. बार्देश तालुक्यातील मंत्री रोहन खंवटे, मंत्री विनोद पालयेकर आणि म्हापश्याचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यात आली असून येत्या ८ जुलै रोजी या विषयावर सविस्तर चर्चा करून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.