म्हापसा आग दुर्घटनेत ६ लाखांची हानी

0
96
म्हापसा पालिका बाजारात आग लागून जळालेला दुकानांतील माल. (छाया : प्रणव फोटो)

पाच दुकाने भक्ष्यस्थानी; घातपाताचा संशय
म्हापसा पालिका मार्केटमध्ये असलेल्या काशिनाथ परोब (प्रभू) यांच्या रांगेतील सुमारे पाच दुकानांना काल शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान आग लागून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागलेली नसून घातपाताचा संशय काही व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे.काशिनाथ परोब यांच्या रांगेतील मेसर्स विश्‍वनाथ आमोणकर, काशिनाथ परोब, काणेकर, दीपक दिवकर, गंगाधर चव्हाण यांच्या दुकानाला ही आग लागली. प्रथम ही आग कुणीतरी दीपक दिवकर व गंगाधर चव्हाण यांच्या दुकानाच्यावर असलेल्या ताडपत्रीला लावली. त्यामुळे या दोन्ही दुकान मालकांच्या ताडपत्री जळाल्या असल्यातरी त्याना त्यात मोठेसे नुकसान झाले नाही. परंतु यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे दिवकर व चव्हाण यांच्या दुकानापासून ते काशिनाथ परोब यांच्यामधील काही दुकानांना अजिबात आग लागली नाही. पण नंतर पुढे ही आग काशिनाथ परोब यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या मेसर्स विश्‍वनाथ आमोणकर यांच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागून त्यांनी कालच म्हणजे गुरुवारी शुक्रवारच्या बाजाराला (आठवडी) लागणारे सामान आणले होते ते जळाले. त्यात ६ लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
आग लागलेल्या व्यापार्‍यात विश्‍वनाथ आमोणकर, काशिनाथ परोब, दीपक दिवकर, गंगाधर चव्हाण, काणेकर यांची किरणा मालाची दुकाने आहेत. यामध्ये कडधान्ये व इतर वस्तूने ही दुकाने भरून ठेवण्यात आली होती. ही आग लागल्याची माहिती अज्ञाताने म्हापसा अग्निशामक दलाला कळवताच दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव, जवान सर्वश्री श्रीकृष्ण पर्रीकर, प्रमोद महाले, नीलेश साळगावकर, उदय मांद्रेकर, विठ्ठल गाड, नरेंद्र शेट्ये, प्रकाश घाडी, विष्णू राणे, रतन परब, अक्षय सावंत, शिवाजी राणे, नामदेव तारी यांनी घटनास्थळी दोन पाण्याच्या बंबसहीत धाव घेऊन आग विझविली आणि पुढे होणारा अनर्थ टाळला. नाही तर ही बाजारपेठेतील दुकाने जळून खाक झाली असती.
दरम्यान, यासबंधी म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांना विचारले असता आम्हाला पहाटे ४.५५ वा. म्हापसा पालिका बाजारात आग लागल्याची माहिती देताच घटनास्थळी दोन पाण्याचे बंब घेऊन धाव घेतली आणि आग विझविली. लगेच या घटनेची माहती मिळाली नसती तर ती आग त्या रांगेतील दुकानांना लागून मोठे नुकसान झाले असते. या ठिकाणी फायर हायड्रंट आहेत त्यातून पाण्याचा पुरवठा होता. परंतु त्यावर माती घालून बंद झाल्याने उपयोग होऊ शकला नाही. तो फायर हायड्रंट मोकळा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा पालिका मार्केटमध्ये आजपर्यंत अनेकवेळा आग दुर्घटनेत दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र याकडे कुणी लक्ष पुरवित नाहीत. काल पहाटे जी आग लागली ती शॉर्टसर्किटमुळे नसून मुद्दामहून कुणीतरी लावल्याचा संशय चंद्रशेखर नार्वेकर व मेसर्स आमोणकर या दुकानदार मालकांनी केला आहे.