म्हापसा अर्बनप्रश्‍नी सरकार दोन बँकांशी बोलणी करणार

0
95

म्हापसा अर्बन बँकेच्या पीएमसी बँकेमध्ये विलीनीकरणासंबंधी सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात आलेली असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने विलीनीकरणाच्या प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे. म्हापसा अर्बनच्या ठेवीदार, भागधारक, खातेदारांनी घाबरून जाऊ नये. सरकारकडून म्हापसा अर्बनच्या विलीनीकरणाबाबत टीजेएसबी सहकारी बँक आणि डोंबिवली सहकारी या दोन बँकांशी बोलणी करणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

म्हापसा अर्बनचे विलीनीकरण अत्यावश्यक आहे. या बँकेचे संचालक, कर्मचारी आणि ग्राहकांनी विलीनीकरणाबाबत निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या बँकेच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक आहेत. म्हापसा अर्बनच्या विलीनीकरणाबाबत टीजेएसबी आणि डोंबिवली या दोन बँकांशी नव्याने चर्चा करावी लागणार आहे. आगामी आठ दिवसात चर्चेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. या पूर्वी दोन्ही बँकांशी प्राथमिक बोलणी केली होती. तथापि, पीएमसी बँकेने विलीनीकरणासाठी एक वर्षापूर्वी प्रस्ताव दिलेला होता. त्यामुळे त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणी सुरू केली होती.

टीजेएसबी बँकेने म्हापसा अर्बनबाबत आर्थिक अहवाल तयार करण्यासाठी लेखाधिका़र्‍याची नियुक्ती केलेली आहे. टीजेएसबी आणि डोंबिवली सहकारी बँक यांच्याकडून प्रस्ताव स्वीकारून त्याबाबत योग्य निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. बँकेशी संबंधित सर्वांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असेही गावडे यांनी सांगितले.