म्हादई बचाव अभियानाची जानेवारीपासून ‘जलयात्रा’

0
94

म्हादई बचाव अभियानाच्या तातडीच्या बैठकीत सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानाने कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून जनजागृतीसाठी जानेवारीपासून राज्यात ‘जलयात्रा’ काढण्याचे ठरविले आहे.
कर्नाटकाशी कुठल्याही प्रकारची बोलणी करण्यास अभियानाने विरोध केला आहे. पाण्याची समस्या आणि सद्यःस्थिती याबाबत जलयात्रेतून माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांना पिण्याच्या पाण्याबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे पत्र पाठविल्याने बैठकीत चर्चा झाली.

म्हादई बचाव अभियान म्हादई नदीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत आहे. या अभियानाने कर्नाटकाशी कुठल्याही प्रकारची बोलणी करण्यास सक्त विरोध केला आहे. या अभियानाच्या अध्यक्ष निर्मला सावंत यांनी गुरूवारी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भेट घेऊन म्हादईबाबत चर्चा केली आहे.
अभियानाच्या बैठकीत कृती कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. जलयात्रेच्या माध्यमातून जागृतीला सुरुवात केली जाणार आहे. राज्यात जानेवारीपासून जलयात्रेला सुरुवात केली जाणार आहे, असे अभियानाचे सचिव प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

म्हापशात आज निदर्शने
उत्तर गोव्यातील म्हादईप्रेमी ‘म्हादई आमची आई’ या झेंड्याखाली शनिवारी ३० रोजी संध्याकाळी ५ वाजता गांधी चौक, म्हापसा येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपचे नेते येडियुरप्पा यांना पाठविलेल्या पत्राच्या विरोधात निदर्शने करणार आहेत, अशी माहिती कपिल कोरगावकर यांनी दिली.