म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाची कर्नाटकला चपराक

0
62

>> लवादाच्या निर्णयाविरोधातील याचिका दाखल करण्यास नकार

म्हादई प्रश्‍नी काल गोव्याला महत्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. कर्नाटकाने ७ टीएमसी फीट पाणी वळवण्यास मान्यता द्यावी यासाठी लवादाने फेटाळलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सुनावणी पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून न घेतल्याने कर्नाटकाला मोठी चपराक बसली आहे.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकाने ७ टीएमसी फीट पाणी वळवण्यास मान्यता द्यावी अशी मागणी केली होती. त्यावेळी लवादाने महत्वपूर्ण निर्णय देताना पाणी वळवता येणार नाही असा अंतरिम आदेश दिला होता. या आदेशानंतर कर्नाटकात जाळपोळ, धरणे, आंदोलने झाली होती व कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयात खास याचिका दाखल करून पाणी वळवण्यास परवानगी द्यावी यासाठी निर्णयाला आक्षेप घेतला होता. काल सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकाला चपराक दिल्याने गोव्याच्या लढाईला नवे बळ प्राप्त झाले आहे.
काल सर्वोच्च न्यायालयात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर याप्रश्‍नी न्यायालयाने लवादाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अशी माहिती नवी दिल्लीतून देण्यात आली. कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयात खास याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने फटकारल्याने कर्नाटकाचे वरिष्ठ वकील फली नरीमन यांना याचिका मागे घ्यावी लागली.
पुन्हा लवादाकडे हे प्रकरण नेण्याच्या सूचना करताना नव्याने सर्व माहिती लवादाला देण्याच्या सूचना दिल्यानंतर न्यायालयाने कर्नाटकाला सर्व तपशील लवादाला सादर करण्यास सांगितले. फली नरीमन यांनी यावेळी कर्नाटकाला महाराष्ट्रानेही सहकार्य करताना गोव्याला विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित केला.
काल सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीला आले असता गोव्याला याबाबत सुनावणीस बोलावण्यात येईल अशी अपेक्षा धरून गोव्याच्या टीमने पूर्णपणे सज्जता ठेवली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने गोव्याच्या टीमला न बोलावताच कर्नाटकाला याचिका मागे घेण्यास भाग पाडले.