म्हादईप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जावडेकर यांना भेटणार

0
111

केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल खात्याने जी ‘ईसी’ (पर्यावरणीय मंजुरी) दिलेली आहे ती कळसा व भांडुरा प्रकल्पाला नसून ती अन्य कुठल्या तरी वेगळ्याच प्रकल्पासाठी असल्याचा खुलासा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभवनवर पत्रकारांशी बोलताना केला. सोमवारी (आज) सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीला जाऊन या प्रकरणी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार असून त्यांच्याकडून सत्य काय आहे ते जाणून घेणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

गोव्यातून सोमवारी नवी दिल्लीला सर्वपक्षीय जे शिष्टमंडळ जाणार आहे ते वरील प्रश्‍नी प्रकाश जावडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असून नेमकी स्थिती जनतेसमोर ठेवणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

म्हादई लवादाशी संबंधित समिती जेव्हा गोव्यात आली होती तेव्हा त्या समितीची भेट घेणारा आपण एकमेव आमदार होतो, असेही सावंत यावेळी म्हणाले. म्हादई प्रश्‍नी राज्य सरकार कोणतीही हयगय करणार नसून राजकीय मुत्सद्देगिरीद्वारे अथवा न्यायालयीन लढ्याद्वारे म्हादई वाचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोंधळ घालणार्‍याना म्हादईविषयी
काहीही माहीत नाही
आता जे लोक म्हादईच्या प्रश्‍नावरून गोंधळ घालत आहेत त्यांना म्हादईविषयी काहीही माहीत नसल्याचा दावाही सावंत यानी यावेळी केला. आपण जेव्हा आमदारही नव्हतो तेव्हापासून म्हणजेच २००५ सालापासून म्हादईसाठीच्या लढ्यात सहभागी होतो. कर्नाटक सरकारने जेव्हा कळसा-भंडुरा प्रकल्प म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवण्यासाठी बांधण्याचे काम हाती घेतले होते. आता विरोध करणारे लोक तेव्हा कुठे होते, असा सवालही सावंत यानी यावेळी केला.