म्हादईप्रश्‍नी गोवा फॉरवर्डने घेतली राज्यपालांची भेट

0
115

राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी भेट घेऊन राज्यातील म्हादई आणि सरकारच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करून या दोन्ही प्रश्‍नात लक्ष घालण्याची मागणी काल केली.
राज्यपालांना म्हादईच्या सद्यःस्थितीची सविस्तर माहिती दिली. सरकारकडून म्हादई प्रश्‍नाबाबत लोकांची दिशाभूल चालविली आहे. गोवा फॉरवर्डने राष्ट्रीय हरित लवादाकडे म्हादईप्रश्‍नी याचिका दाखल केल्याने गोव्याचे नुकसान झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे. राष्ट्रीय हरित लवादासमोर याचिकेच्या सुनावणीच्या वेळी गोवा सरकारचा प्रतिनिधी अनुपस्थित का राहिला ? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी सरदेसाई यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

हे विरोधकांचे कामच ः मायकल लोबो
विरोधी गोवा फॉरवर्ड पक्ष राज्यपालांकडे तक्रार करून सरकार आणि सरकारी कारभार योग्य पद्धतीने चालत नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारवर टीका करणे, तक्रारी करणे हे विरोधकांचे काम आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा कारभार योग्य पद्धतीने सरकारी कामकाज चालवत आहे, असा दावा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.