म्हादईप्रश्‍नी उद्यापासून निर्णायक सुनावणी

0
123

गेल्या अनेक वर्षांपासून गोव्याची जीवनदायिनी म्हादई वाचवण्यासाठी चालू असलेला संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोचला असून उद्या मंगळवार दि. ६ पासून म्हादई जललवादासमोर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान, म्हादईचा गोव्याकडे येणारा प्रवाह रोखत कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून कालव्याचे काम केल्याच्या गोव्याने केलेल्या तक्रारीबाबत लवादाच्या भूमिकेकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे.

गोव्याचे पथक उद्यापासून सुरू होणार्‍या निर्णायक लढाईसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही शेजार्‍यांनी मिलीभगत केली असून गोव्याला पाणी मिळू नये यासाठी आटापिटा चालविला आहे. या पार्श्‍वभूमीवर होणारी अंतिम सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने गोवा कायदा टीमने प्रतिवाद करण्यासाठी आवश्यक ती तयारी केली आहे.

मध्यंतरी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकाशी पाणी वाटपाबाबत भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा यांना पात्र पाठवल्याने बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर विरोधकांनी या प्रश्‍नावर राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या विषयाचा काही दिवस बाऊ केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी म्हादईप्रश्नी कसलीच तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण केल्यानंतर वातावरण शमले होते. मुख्यमंत्र्यांच्या सदर पत्राचा लवादासमोर कोणताच परिणाम होणार नसल्याचे कायदे पथकाचे मत आहे.
दरम्यान, सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी काही आमदारांसह काही दिवसांपूर्वी कणकुंबीला जाऊन केलेल्या पाहणीवेळी कर्नाटकाने कालव्याचे काम जवळजवळ पूर्ण केल्याचे दिसून आले होते. गोव्याचा धसका घेत सध्या कर्नाटकाने सर्व काम थांबवले असून यंत्रसामग्री हलविली आहे. त्यामुळे आता लवाद काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

म्हादई बचाव अभियानाचे सरचिटणीस राजेंद्र केरकर, अध्यक्षा निर्मला सावंत आदींनी म्हादईचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने गेली अनेक वर्षे राज्य सरकार म्हादई प्रश्‍नावर संघर्ष करीत आहे. कर्नाटकात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या पार्श्‍वभूमीवर सुनावणी निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली असल्याने सगळ्यांच्या नजरा लवादाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.

म्हादई प्रश्‍न सोडवण्यासाठी
मोदींनी वेळ द्यावा : सिद्धरामय्या

बेंगळुरू : म्हादई जलतंटा सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ द्यावा अशी विनंती कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मोदी यांच्या बेंगळुरू येथील भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या समारोप कार्यक्रमापूर्वी केली. गुंतवणूक, संशोधन आणि विकास योजनांमध्ये नंबर एक राज्यात पंतप्रधानांचे स्वागत आहे. विकासाच्या बाबतीत आदर्श राज्य असलेल्या कर्नाटकाने देशाला अनेक क्षेत्रांत सर्वोच्च नागरिक दिले आहेत. कर्नाटकाचे यश देशाचा गौरव असल्याचा आपल्याला आत्मविश्‍वास आहे. देशाच्या स्टार्ट अप आणि संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी पंतप्रधानांनी भेट दिल्याचा आम्हांला अत्यानंद आहे. कर्नाटकातील तमाम जनतेच्या वतीने म्हादई पाण्यासाठी सुरू असलेला तंटा सोडवण्यासाठी आपण वेळ काढावा अशी विनंती असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या विनंतीची कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी खिल्ली उडवली आहे. सिद्धरामय्या यांच्या कारकिर्दीत राज्याने भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बिघडलेली कायदा सुव्यवस्था आदी क्षेत्रांत देशाने अनेक प्रथमच न घडलेल्या घटना पाहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हादई जलतंटा प्रश्‍न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी कर्नाटक करीत आहे. काल मोदींच्या दौर्‍यावेळी आंदोलक शेतकर्‍यांनी काळा दिवस पाळला.