म्हादईप्रश्‍नी अपयशामुळे मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा ः कॉंग्रेस

0
111

म्हादईप्रश्‍नी भाजप सरकारला पूर्ण अपयश आलेले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काल कॉंग्रेसचे नेते ऍड. रमाकांत खलप व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकार परिषदेत केली.

गेल्या २०१२ सालापासून भाजप सरकार राज्यात सत्तेवर आहे. मात्र, कर्नाटक सरकार कणकुंबी येथे कालव्याचे काम करीत असताना भाजप सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि त्याचाच फायदा उठवत कर्नाटक सरकारने कालव्याचे काम पूर्ण करून गोव्याकडे येणारे पाणी वळवण्यात यश मिळवल्याचे खलप व रेजिनाल्ड यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिवाय कर्नाटकमध्ये लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकला पाणी देण्यास गोवा तयार आहे असे पत्र कर्नाटकातील भाजप नेते येडियुरप्पा यांना लिहून गोव्याची बाजू कमकुवत केल्याचा आरोपही यावेळी या नेत्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे चुकीचा संदेश गेल्याचे त्यांचे म्हणणे होते.
कर्नाटकने पाणी वळवल्याने आता गोव्यातील नद्यांवर त्याचा परिणाम होणार असून नद्या आटू लागतील व गोव्यासमोर पाण्याचे संकट उभे राहील असे ते म्हणाले.

कॉंग्रेसमुळेच लवादाची स्थापना
कॉंग्रेस पक्षाने सत्तेवर असताना म्हादईची लढाई चांगल्या प्रकारे लढली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या प्रयत्नांमुळेच म्हादई लवादाची स्थापना करण्यात आली होती, अशी माहितीही खलप यांनी यावेळी दिली.

अधिवेशनात आवाज उठवणार
म्हादईप्रश्‍नी भाजप सरकारला पूर्ण अपयश आलेले असल्याने कॉंग्रेस सरकार येत्या अधिवेशनात म्हादईप्रश्‍नी आवाज उठवणार असल्याचे खलप व रेजिनाल्ड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासंबंधीची रणनीती कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.