…म्हणूनच गोव्यात सिनेपंढरी बनली ः सचिन खेडेकर

0
69

कलासक्त असणे हा गोव्याचा गुण घेण्यासारखा आहे. गोवा हे कलेचे, संस्कृतीचे माहेरघर आहे म्हणूनच इथे इफ्फीच्यारुपाने नाट्यपंढरीची सिनेपंढरी होवू शकली असे गौरवोद्गार ख्यातनाम अभिनेता सचिन खेडेकर यांनी काढले. आयुष्यभर कलेची सेवा केली. कलेसाठी आयुष्य वेचले त्यांचा शासनाने आदर करावा ही फार मोठी गोष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी काल येथे केले.

कला-संस्कृती संचालनालयातर्फे काल गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२०१६-१७) बारा कलाकारांना, दोन ग्रंथपाल सदानंद रामा शिरगावकर व मोहनदास नाईक यांना आणि उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था म्हणून अंत्रुज लळीतक, बांदोडा यांना मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात सचिन खेडेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे होते. व्यासपीठावर सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद सावकार उपस्थित होते.

सांस्कृतिक पुरस्कारांचे मानकरी
प्रमोद प्रियोळकर (हिंदुस्तानी संगीत), एफ. जी. आल्वारो दी परेरा (पाश्‍चात्य संगीत), दासू शिरोडकर, गजानन जोग, अवेक्लेतो आफोंसो (साहित्य), गणेश मराठे (नाटक), मारिया फर्नांडिस, रोमाल्डो डिसोझा (तियात्र), सदाशिव परब (चित्रकला-फाईन आर्ट), उदयबुवा फडके (कीर्तन), उमेश तारी (भजन), राम माऊसकर (लोककला) यांचा समावेश होता. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, मानपत्र व रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गोविंद गावडे म्हणाले, या कलाकारांनी कला कौशल्याच्या बळावर गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. कला-संस्कृती संवर्धनाचे मौलीक कार्य केले आहे. ग्रंथपालांनी वाचन संस्कृती रुजविण्याचे व नवे वाचक निर्माण करण्याचे कार्य केले आहे. या ज्येष्ठ कलाकारांनी बिकट परिस्थितीवर मात करून, प्रसंगी अपयश पचवून आणि अपयश हीच यशाची पहिली पायरी ओळखून लौकीक प्राप्त केला आहे व त्याची दखल शासनाने घेतली आहे.

पुरस्कार प्राप्त कलाकारांच्यावतीने प्रमोद प्रियोळकर, आवेक्लेतो यांनी मनोगत व्यक्त केले. तर अंत्रुज लळीतक यांच्यावतीने श्रीधर कामत बांबोळकर व उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य यांनी मनोगत व्यक्त केले.