म्युच्युअल फंड ः योग्य पर्याय

0
94

– विनोद आपटे, (विजयनगर, खोर्ली)

फंड मॅनेजर गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करतो व त्यासाठी त्यांच्या हाताखाली काही तज्ज्ञ किंवा अनुभवी माणसे असतात. म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले म्हणजे फायदा नक्की होणार असे मुळीच नसते. फक्त आपण अनुभवी माणसाच्या हातात पैसे देत आहोत एवढेच काय ते समाधान! 

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला चार पैसे मिळावेत म्हणून आपण सर्वजण राबत असतो व आपल्या कष्टाच्या पैशातील काही पैसे आपल्या पुढच्या आयुष्यासाठी किंवा अडीअडचणींसाठी शिल्लक ठेवत असतो. आता हे पैसे बर्‍याच वेळा आपण फक्त शिल्लक ठेवत नाही तर वेगवेगळ्या योजनांमध्ये (स्कीम) गुंतवतो. तर हे पैसे गुंतवताना कोणती काळजी घ्यावी हे आपण या आधीच्या लेखात पाहिले आहे.
बर्‍याच जणांना आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून दुसरे काही करणे जमत नाही. मी जेव्हा बर्‍याचशा नवीन गुंतवणूकदारांना भेटतो व सांगतो की तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवा, तेव्हा अनेकांचा सूर असा असतो… ‘आम्हाला एवढा वेळ नाही होऽऽ! आम्ही दररोजची कामं करणार का तुमचा बाजार बघणार! वाटल्यास आम्ही तुम्हाला पैसे देतो, मग तुम्हीच ठरवा पैसे कोणत्या शेअर्सवर लावायचे ते!’
‘शेअर्सवर पैसे लावायचे’ असे कोणी म्हटले की मला असं वाटतं की समोरचा मला एखाद्या डर्बितल्या घोड्यावरच पैसे लावायला सांगतोय. शेअर्समध्ये पैसे गुंतवणे म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनचे शेअर्स विकत घेणे व तो चांगला वाढेपर्यंत डिमॅट अकाउंटमध्ये ठेवून देणे व आपल्या अपेक्षेएवढी वाढ झाली की तो शेअर विकून फायदा आपल्या पदरात पाडून घेणे. ज्या व्यक्तींना असं वाटतं की मी दररोज १५ मिनिटेसुद्धा शेअर बाजारासाठी देऊ शकत नाही, त्यांनी किंबहुना एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये तरी गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीस कोणता शेअर घ्यावा? कधी घ्यावा? कधी विकावा?… यांसारख्या प्रश्‍नांचा विचार करावा लागणार नाही व वेळही खर्च करावा लागणार नाही. म्युच्युअल फंड म्हणजे बर्‍याच छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली सामूहिक रक्कम व ही रक्कम सांभाळण्याचे काम किंवा ही गुंतवणूक केलेले पैसे शेअरमार्केटमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवायचे, किती काळ गुंतवायचे, फायदा कधी घ्यायचा? या सर्व गोष्टींची काळजी घेण्याचे काम करण्यासाठी एक व्यक्ती नेमलेली असते. त्याला ‘फंड मॅनेजर’ असे म्हणतात. फंड मॅनेजर गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करतो व त्यासाठी त्यांच्या हाताखाली काही तज्ज्ञ किंवा अनुभवी माणसे असतात. म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले म्हणजे फायदा नक्की होणार असे मुळीच नसते. फक्त आपण अनुभवी माणसाच्या हातात पैसे देत आहोत एवढेच काय ते समाधान!
आता म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा बर्‍याच योजना किंवा स्कीम्स असतात. उदा. इक्विटी फंड, डेब्ट फंड, बॅलन्स्ड फंड वगैरे. यांपैकी कोणत्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे हे आपण ठरवायचे असते. जेव्हा बाजार तेजीमध्ये असेल तेव्हा इक्विटी फंड, जेव्हा व्याजदर कमी असतील आणि जेव्हा डेब्ट फंडमध्ये परतावा जास्त असेल तेव्हा डेब्ट फंड.
आपल्याला काय हवे आहे, हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण त्याप्रमाणे स्कीमची निवड करून गुंतवणूक करायची आहे. तुम्ही एकरकमी गुंतवणूक करू शकता किंवा दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. म्युच्युअल फंडमध्ये ओपन एंडेड फंड व क्लोज एंडेड फंड असतात. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण गुगलवर सर्च करून मिळवू शकता.