मोहमयी मायानगरी!

0
119

– सौ. बबिता बाबलो गावस
‘…पण ठाणेकर साहेब मला तुमचा मुख्य मुद्दाच समजला नाही. कृपया मला सविस्तर सांगता का?’ वामनरावांनी ठाणेकरांना विनंती करत म्हटलं.
‘हो.. हो.. वामनराव, सांगतो ना. आता असं बघा… तुम्ही रुपये पाच लाख जर आमच्या बँकेत ठेव म्हणून ठेवलेत तर तुम्हाला दहा टक्के व्याज दर महिन्याला मिळेल.. म्हणजे रुपये पन्नास हजार! या पन्नास हजारात तुम्ही मची महिन्याची सर्व कामं सुरळीत पार पाडाल. मुलांचा शालेय खर्च यातून भागवता येईल. घरचं किंवा पाहुण्यांकडच्या एखाद्या सोहळ्याला उत्तम भेटवस्तू पण या पैशातून देऊ शकता. आता तुम्ही निवृत्त आहात त्यामुळे तुमच्या ठेवीच तुमच्याकरता सर्वस्व आहेत आणि त्यातूनच जर पैसारुपी उत्पन्न मिळायला लागलं तर आपणाला पैशांची चणचण पण भासणार नाही. अशा अनेक लोकांनी या संधीचा फायदा घेतला आहे. आपण पण घेतला पाहिजे. लक्ष्मी एकदाच दार ठोठावते. ती संधी पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून जेव्हा ती दारी येते तेव्हाच तिचं स्वागत झालं पाहिजे…’ अशाप्रकारे विश्‍वासरावाने मोहमयी जगाचं स्वप्न वामनरावाच्या डोळ्यात सजवायला सुरुवात केली होती.‘ठाणेकर साहेब, मला एक शंका आहे. विचारली तर चालेल?’ वामनराव चाचपडत बोलले.
‘अहो विचारा ना! शंकेचं निरसन केलंच पाहिजे. मला वाटतं कुठलीही गुंतवणूक म्हणा किंवा इतर कार्य शंका ठेवून करू नये. पूर्ण चौकशीनंतरच करावं’, ठाणेकर विश्‍वासानं बोलले.
‘इतर बँकांना एवढं व्याज महिन्याला देणं परवडत नाही आणि तुम्हाला कसं काय परवडतं?’ वामनरावांची शंका.
‘अगदी बरोबर प्रश्‍न विचारलात तुम्ही. त्याचं काय आहे साहेब, आमची बँक व्यापार-धंदा करणार्‍या लोकांना व्याज देते, तेही कटकटीशिवाय. त्यामुळे व्यापारी लोकांकडून दर आठवड्याला व्याजासकट थोडं कर्ज फेडलं जातं. त्यामुळे आमच्या बँकेला खूपच फायदा होतो’. हे बोलता बोलता ठाणेकरांची नजर उर्मीवर पडली. ‘ही तुमची मुलगी वाटतं! काय शिकली आहे?’ त्यांनी विचारलं.
‘याच वर्षी बी.कॉम. झाली आहे’, वामनरावांनी सांगितलं. ‘अरे वाऽऽ छान, हिला नोकरीत रस असेल तर आमच्या या शाखेत भरती चालू आहे. तुम्ही म्हणाल तर माझ्या वशिल्याने हिला नोकरी देऊ. महिन्याला चांगला दहा हजार पगार पण देऊ’, ठाणेकरांचा भुरळ पाडणारा विचार.
‘ठाणेकर साहेब, मला जरा वेळ द्या. घरच्यांशी बोलतो आणि उद्याच सांगतो’, म्हणत त्या दोघांना निरोप दिला.
घरातील सदस्यांनी रात्रभर विचार करून पैसे बँकेत वर्षभरासाठी व्याजाने ठेवायचं ठरवलं आणि उर्मीनं पण बँकेत नोेकरी करायला होकार दिला. दुसर्‍या दिवशी बँक खात्यात पाच लाखांची ठेव ठेवली. त्याच वेळी आणखी एक पैसे कमविण्याची वामनरावांना संधी सुचवली… ‘हे बघा वामनराव, जसे तुम्ही पैसे तुकारामच्या हाताखाली ठेवले तसेच तुम्ही पण ही योजना तुमच्या इतर मित्रांना किंवा नातेवाइकांना सांगा म्हणजे त्यांच्या ठेवीतील दोन टक्के कमिशन तुम्हाला मिळेल.’ सुरुवातीला एक महिना वामनराव गप्प राहिले. पण पहिला व्याजाचा हप्ता तो ही पन्नास हजार हातात पडला तेव्हा त्यांची उरली-सुरली खात्री पण पूर्णपणे पटली आणि त्यांनी पटापट मित्रांना, नातेवाइकांना आपल्या हाताखाली पैसे घालायला लावले.
चार-पाच महिने वामनराव अगदी हवेत तरंगल्यासारखे वावरत होते. त्यांच्या जीवनात आनंदी-आनंद आला होता. पूर्वी कामावर काबाडकष्ट केले तरी हातात येणारा पगार जेमतेमच असायचा आणि आता हात सुके, पाय सुके आणि हाती लाखांनी पैसा खणखणला. यालाच म्हणतात ‘‘नशीब’’ असे त्यांना राहून राहून वाटायचे. आता जवळजवळ आठ महिने उलटले होते आणि एकाएकी येणारं कमिशन उशिरा येणार म्हणून समजलं. दहा तारीख दिली होती. आता तर महिन्याची तीस तारीखही उलटली. दुसरा महिना संपायला आला तरी मिळणारं कमिशन खात्यात आलं नव्हतं. त्यामुळे लोकांत म्हणजे ठेवीदारात कुजबुज सुरू झाली. म्हणून काही जणांनी आपलेच ठेवीचे पैसे काढायचे ठरवले तर बँक मॅनेजर ते काढायला मिळणार नाहीत म्हणाला. तर वर्षानंतरच ते मिळतील पण आता वर्ष उलटलं तरी त्या पैशांचा पत्ताच नव्हता.
गेले दोन महिने पगार मिळत नव्हता. म्हणून उर्मीने नोकरी सोडली. आता वामनरावांच्या सांगण्यावरून पैसे ठेवणारे लोक त्यांच्या घरी यायला लागले. ‘आता आम्हाला काही सांगू नका. आम्ही ‘नाही… नाही…’ म्हणत असताना तुम्ही आम्हाला पैसे ठेवायला भाग पाडलंत. आमची कष्टाची कमाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला विचारायला येणार’. असे अनेक लोक वामनरावांना मानसिक त्रास देत होते. शेवटी त्यांनी आपल्या नावावर असलेली मोठी जागा विकली आणि आपल्या चुकीमुळे फसल्या गेलेल्या मित्रांना व आप्तेष्टांना थोडे थोडे पैसे दिले आणि काही प्रमाणात का असेना स्वतःला मानसिक त्रासातून वाचवलं.
हे फसवे प्रकार रोजच होत असतात. मोहामुळे ही माणसं अगदी अचूकपणे साध्या-भोळ्या माणसांना फसवतात. आज सगळेजण सुशिक्षित आहेत तरीही फसले जाताहेत, हेच मोठे दुःख आहे.