मोसमी पावसाची दडी

0
76

राज्यात मोसमी पावसाचा जोर मंदावला असून गेले दोन दिवस पावसाने दडी मारल्याने उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासांत किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. आगामी दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे.

राज्यात पश्‍चिम मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. राज्यात तीन दिवस जोरदार पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर सध्या पावसाचा जोर मंदावला आहे.
आत्तापर्यंत राज्यात १७.२ इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण येथे २२.१ इंच, ओल्ड गोवा येथे १९.८ इंच, मुरगाव येथे १८.८ इंच, सांगे येथे १७.८ इंच, पेडणे येथे १७.६ इंच, पणजी येथे १७.४ इंच, मडगाव येथे १७.४ इंच, दाबोळी १७.२ इंच, वाळपई येथे १६.७ इंच, फोंडा येथे १४.९ इंच, साखळीत १४.२ इंच, म्हापसा येथे १२.२ इंच पावसाची नोंद झाली आहे.