मोसमी पावसाचा जोर कायम

0
104

राज्यात मोसमी पावसाचा जोर कायम असून काल डिचोली, काणकोण, सत्तरी, पेडणे तालुक्याला झोडपून काढले. कावरे-पिर्लात पूरसदृश्य स्थिती होती. तर पडझडीमुळे सुर्ला-बेळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. डिचोलीतही अनेक ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे. अग्निशामक दलाच्या मुख्यालयात दिवसभरात सुमारे ५० ते ५५ झाडे व इतर पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत केपे, सांगे, ओल्ड गोवा येथे सर्वाधिक १२ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पणजी, वाळपई आणि मुरगाव येथे ११ सेंटिमीटर तर दाबोली आणि पेडणे येथे १० सेंटिमीटर, काणकोण, साखळी येथे ९ सेंटिमीटर, म्हापसा येथे ७ सेंटिमीटर आणि फोंडा येथे ४ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने जोरदार सलामी दिली आहे. सलग दोन दिवस मुसळधार कोसळणार्‍या पावसाने रविवारी सकाळच्या सत्रात थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, संध्याकाळी ४ वाजल्यानंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना हाती घेण्यात न आल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जात आहेत. राजधानीत कांपाल, मिरामार, कदंब बसस्थानक या प्रमुख ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावे लागत आहेत. गटारांमध्ये साचलेला गाळ रस्त्यांवर येत आहे.

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

धावे, सत्तरी येथील दुर्घटना
धावे, सत्तरी येथील नाना अर्जुन ओझरेकर (वय ४७) यांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर दुर्घटना काल दुपारी घडली. तो आरोग्य खात्याचा कर्मचारी होता. त्याला पत्नी आणि शाळेत जाणारे दोन मुलगे असून कमावता गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्याच्या नवीन घराचे काम सध्या चालू आहे. काल सकाळी आपल्या मुलाला बरोबर घेऊन तो नवीन न घर बांधत असलेल्या जागी गेला होता. दुपारी साडेबारा पर्यंत दोघेही तिथे काम करीत होते. पण त्यानंतर मुलगा घरी गेला. नवीन घराचे काम करण्यात येणार्‍या जागी बागायत असून नाना तिथे काम करीत होता. काम करीत असताना त्याचा पाय घसरला आणि जवळच असलेल्या सुमारे दोन मीटर खोल कठडा नसलेल्या विहिरीत तो पडला. त्याला पोहता येत नव्हते तसेच त्याचा पाय चिखलात रुतला होता. त्यामुळे त्याला वर येणे शक्य न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही वडील घरी न परतल्याने त्याचा मुलगा परत काम सुरू असलेल्या जागी आला असता त्याला वडील मृतावस्थेत आढळला. वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. मयत आरोग्य खात्यात धोबी म्हणून काम करीत होता.