मोलेचे सातेरी महिला भजनी मंडळ प्रथम

0
104

कला अकादमीची राज्यस्तरीय स्पर्धा
कला अकादमी आयोजित भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय महिला भजनी स्पर्धेत मोले येथील श्री सातेरी महिला भजनी मंडळाने २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती फिरता चषक पटकाविला. अडकोण – बाणस्तरी येथील युवती भजनी मंडळाला द्वितीय तर चिंबल येथील श्री भगवती महिला भजनी मंडळाला तृतीय बक्षीस प्राप्त झाले.
चौथे बक्षीस कुडणे येथील श्री केळबाई महिला भजनी मंडळाला देण्यात आले. सावईवेरे येथील श्री मदनंत खामिणी महिला भजनी मंडळाला आणि कायसूव येथील वनदेवी संगीत संस्थेला उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
उत्कृष्ट गायिका म्हणून करिष्मा गोकुळदास च्यारी (श्रीराम सेवा संघ, मयडे), उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून हेमलता वामन सतरकर (युवती भजनी मंडळ, कुडणे), उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून शुभदा उल्हास देसाई (भूमीपुरूष महिला भजनी मंडळ, पाटणे-कोळंब, काणकोण) तर उत्कृष्ट गौळण गायिका म्हणून अनुराधा जोग (श्री सातेरी महिला भजन मंडळ, मोले) यांची निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते. तसेच अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर, परीक्षक पं. उल्हास वेलिंगकर, मोहनदास पोळे व दामोदर शेवडे हे उपस्थित होते.
आर्लेकर यांनी सांगितले, की भारतीय संगीताला समृद्ध अशी परंपरा आहे. विश्‍वबंधुत्वाचा संदेश त्याद्वारे दिला जातो. गोव्याच्या या भूमीत ज्या पद्धतीने संगीताची परंपरा जोपासली जात आहे ती इतरांहून वेगळ्या स्वरुपाची आहे.
इथल्या पारंपरिक उत्सवातून ती बघायला मिळते. कला अकादमीने भजनाला दिशा देण्याच्या उद्देशाने हा स्पर्धेचा उपक्रम सुरू केला आहे व तो स्तुत्य आहे.
सुशांत खेडेकर यांनी स्वागत केले. अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी डॉ. दत्तगुरू आमोणकर व कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीन केले. कार्यक्रम अधिकारी प्रदीप गावकर यांनी सूत्रसंचालन केले.