मोरजीत मटका अड्‌ड्यावर धाड, ६० लाख जप्त

0
143

>> सूत्रधारासह ११ संशयितांना अटक

>> अधीक्षक चंदन चौधरी यांची कारवाई

गेले महिनाभर पेडणे तालुक्यातील जुगारासंबंधी प्रसिद्धी माध्यमातून होत असलेल्या चर्चेची गंभीर दखल घेत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने विठ्ठलदासवाडा, मोरजी – पेडणे येथील रेजिनाल्ड डिकॉस्ता यांच्या घरावर धाड घालून मटका अड्डा उद्ध्वस्त केला. या धाडीत सुमारे ५९,३२,५०० रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात मटका साहित्य आणि अकरा संशयित बुकींना जेरबंद केले. काल दुपारी २.४५ वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या धाडीची पेडणे पोलिसांना चाहूलही लागू दिली नाही.

वरील यशस्वी कारवाईनंतर पर्वरी येथे संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी यांनी या धाडीविषयी सविस्तर माहिती दिली. विठ्ठलदासवाडा, पेडणे येथील रेजिनाल्ड डिकॉस्ता यांच्या घरात मटका जुगार सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यानुसार चौधरी यांनी सहकारी पोलीस कर्मचार्‍यांसमवेत दुपारी २.४५ वाजता धाड घातली. धाडसत्रावेळी घरमालक रेजिनाल्ड डिकॉस्ता, अंकुश बाबाला परब, लक्ष्मीकांत गावडे, गजानन देविदास मोर्जे, प्रवीण अनिल पार्सेकर, आग्नेल फर्नांडिस, लक्ष्मीकांत नारायण म्हामल, प्रताप उल्हास साळगावकर, अँथोनी डिसोझा, विठ्ठल नरहरी गोलतेकर, दामोदर सूर्यकांत गोवेकर या अकरा संशयितांना पोलिसांनी रंंगेहात पकडले. कारवाईवेळी घरातील सुमारे ५९,३४,५००/- रुपये रोख रक्कम, ५४ मोबाइल संच, २ लॅपटॉप (कीबोर्डसह), १८ कॅलक्युलेटर, १ कॅश काउंटिंग मशीन, ७२ मटका स्लिप बंडल्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

गेल्या ७ वर्षांपासून अड्डा
गेली ६-७ वर्षे उपरोल्लिखित घरात अनधिकृतपणे मटका जुगार मोठ्या प्रमाणात चालत होता. घर मालक रेजिनाल्ड डिकॉस्ता यांच्यासह दहा बुकी या व्यवसायात गुंतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. परंतु, पेडणे पोलिसांना या बेकायदा जुगाराची कल्पना नव्हती ही गोष्ट न पटण्यासारखी होती. त्यामुळे या धाडीची कल्पना पेडणे पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. अधीक्षक चंदन चौधरी यांच्यासह पर्वरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महेश गडेकर, अनंत गावकर, पोलीस कर्मचारी नितीन गावकर, कायतान मेंडोन्सा,
प्रवीण तुळसकर, रुद्रेश झांटये, सागर खोर्जुवेकर, माधुरी शेतगावकर, विनोद नाईक यांनी या धाडसत्रात भाग घेतला. अकराही संशयितांना म्हापसा येथील दंडाधिकार्‍यांसमोर उभे करण्यात येणार असल्याचे अधीक्षक चौधरी यांनी सांगितले.