‘मोप’ स्थगित ठेवून ‘दाबोळी’चा विस्तार करा

0
125

प्रदेश कॉंग्रेसचा ठराव : दोन विमानतळ परवडणार नसल्याचे मत
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रक्रिया स्थगित ठेवून दाबोळीचा पूर्ण विस्तार करण्याची मागणी करणारा ठराव काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत संमत केल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी काल दिली. बांधा चालवा व हस्तांतर करा या तत्वावर मोप विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिकदृष्ट्या राज्यात दोन विमानतळ परवडणे शक्य नाही. मोप उभारल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद करावाच लागेल, असा अहवाल ‘आमकाव’ संस्थेने दिला होता. असे असतानाही आपल्या पक्षाने ‘मोप’साठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली हे खरे.बंगळूर येथेही दोन विमानतळ चालू शकले नाहीत. तीच परिस्थिती गोव्यात होईल. दाबोळी विमानतळ चालू ठेवण्याची अट मान्य करून ‘मोप’साठी गुंतवणूक करण्यास कोणतीही कंपनी पुढे येणे शक्य नाही, असे फालेरो म्हणाले. जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असतानाच दाबोळी हा तेरावा आंतरराष्ट्रीय विमानतळ करून सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा तसेच दाबोळी येथे अतिरिक्त हवाई वाहतूक महानिरीक्षक नियुक्त करणे, नौदलाकडून अतिरिक्त जमीन ताब्यात घेणे या विषयावर करार झाला होता, गेली १४ वर्षे आपण दाबोळीच्या विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे फालेरो यांनी सांगितले.
मतदारसंघनिहाय समित्या
दरम्यान, पक्ष बळकट करण्यासाठी आपण गावोगाव फिरण्याचे ठरविले आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी १४ सदस्यांची समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर मतदान केंद्र समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे फालेरो यांनी सांगितले. सदस्य नोंदणी करताना ७० टक्के नवे सदस्य असावे व त्यात युवकांची संख्या अधिक असावी, या दृष्टीकोनातून काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर पक्षाला धोरणात्मक निर्णय घेणे सोपे होईल, असे फालेरो यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
कूळ कायदा दुरुस्ती मागे घेण्याची मागणी
गोवा विधानसभेत समंत करण्यात आलेले कृषी कूळ कायदा दुरुस्ती विधेयक ताबडतोब मागे घेण्याची मागणी करणारा ठराव काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या विषयावर बैठकीत दीर्घ चर्चा झाली. विधेयकाचे परिणाम काय होतील. यावर विचारमंथन झाले. शेतकर्‍यांना जमिनीचा मालकी हक्क देण्यासाठी केलेल्या कायद्याचा मूळ हेतू या विधेयकामुळे नष्ट झाल्याचा सूर सर्वांनीच व्यक्त केला, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी काल पत्रकारांना दिली.
विधेयक सभागृहात संमत करतेवेळी कॉंग्रेस आमदारांनी आवाज का उठविला नाही, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, तेथे उपस्थित असलेले कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी वरील विधेयक निवड समितीकडे पाठविण्याची सूचना कॉंग्रेस आमदारांनी केली होती, असे सांगितले. राज्यातील शेतकरी वर्ग वरील विधेयकामुळे नाराज बनला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाने हा विषय लावून धरण्याचे ठरविले आहे, असे फालेरो यांनी सांगितले.