मोपा विस्थापितांचे पुनर्वसन

0
215

>> १५ सदस्यांना जीएमआर कंपनीत नोकर्‍या

>> १४ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज

मोपा – पेडणे येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे सरकारने काल पुनर्वसन केले. १४ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज आणि १५ सदस्यांना नोकरीची नियुक्तिपत्रे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आली. या १५ प्रकल्पग्रस्तांना जीएमआर कंपनीतर्फे कायम स्वरूपी नोकरी दिली जाणार असून पुनर्वसन आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सरकारने जीएमआर या कंपनीशी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार कंपनीने प्रकल्पग्रस्तांना घरटी एक नोकरी देण्याची तरतूद होती. या प्रकल्पांमुळे १५ कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागत असून त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना नोकरीची नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

सरकारने १४ कुंटुबांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार केला आहे. या कुटुंबांचे कासारवर्णे येथील सर्वे क्र. २०७ मध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला ८०० चौरस मीटर जागा दिली जाणार आहे. त्यात १०० चौरस मीटर जागेत घर, ५० चौ. मी. जागेत जनावरांचा गोठा, १५० लोकांना सामावून घेणारे सामाजिक सभागृह, स्मशानभूमी, रस्ता, वीज, पाणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच २० हजार चौरस मीटर जागा जनावरांना चरण्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने ६.३३ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी जीएमआर कंपनीकडून केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामावर सार्वजनिक बांधकाम खाते देखरेख ठेवणार आहे.

संपादित जागेतील दोन घरे पाडली
पेडणे (न. प्र.) : दरम्यान, मोपा विमानतळासाठी संपादित केलेल्या जागेतील वारखंड पंचायत क्षेत्रातील शेमेचे आडवण येथील दोन घरे काल उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात पोकलीनद्वारे पाडण्यात आली. उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेली सदर घरे मोडण्याचा आदेश दि. १ नोव्हेंबर रोजी पेडणे मामलेदार कार्यालयाला दिला होता. त्यानुसार काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पेडणे मामलेदार इशांत सावंत यांनी सर्व्हे क्र. ११६/१, सर्व्हे क्र. ११६/२ व सर्व्हे क्र. ११४/१ या जागेतील दोन घरे पोलीस संरक्षणात पाडली.

मोपविषयक कामांना प्राधान्य देण्याचे खाते प्रमुखांना आदेेश

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित कामांना प्राधान्य देण्याचा आदेश मुख्य सचिवांनी सर्व खाते प्रमुखांना दिला आहे. मोपा, पेडणे येथे पीपीपी तत्त्वावर आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी सरकारने जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. तसेच मुख्यमंत्री प्रकल्पाच्या कामाचा दरदिवशी आढावा घेत आहेत. या विमानतळ प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व खाते प्रमुखांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आदेशात म्हटले आहे.

या विमानतळ प्रकल्पाच्या कामाला जीएमआर या कंपनीकडून सुरुवात करण्यात आली आहे. जीएमआर कंपनीकडून विविध कामांसाठी विविध सरकारी खात्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. या कंपनीच्या विविध परवानगीसाठी येणार्‍या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून सहकार्य करावे. काही कारणास्तव दोन आठवड्यात अर्ज निकालात न निघाल्यास त्याची माहिती नागरी विमान वाहतूक संचालकांना द्यावी. सर्व खाते प्रमुखांनी अर्जांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली आहे. जीएमआर कंपनीने प्रत्येक अर्जाची एक प्रत नागरी विमान वाहतूक संचालकांना सादर करावी. तसेच नियमितपणे कामासंबंधीची माहिती अद्ययावत करावी. एखाद्या खात्याकडून अर्जावर निर्णयास उशीर झाल्यास नागरी विमान वाहतूक संचालकांनी ही बाब संबंधित खात्याच्या सचिवांच्या निदर्शनास आणावी, असेही सचिवांनी आदेशात म्हटले आहे.

मोपमुळे दाबोळी बंद पडणार नाही : पर्रीकर

मोपा विमानतळामुळे दाबोळी विमानतळ बंद पडणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केला. दाबोळी विमानतळावर दररोज १२० विमाने वाहतूक करतात. मोपा विमानतळामुळे विमानाची संख्या १५० – १६० पर्यंत वाढू शकते. या विमानतळामुळे दाबोळीवरील वाढत्या विमान वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. विमानाचे दर जास्त नसल्याने पर्यटकांकडून विमान वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. नवीन विमानतळामुळे पर्यटकांची संख्या वाढू शकते, असेही पर्रीकर यांनी सांगितले. मोपा विमानतळामुळे आसपासच्या २० किलो मीटर परिसराचा विकास होणार असून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. नोकरी, व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतील, असे पर्रीकर म्हणाले.
मोपा विमानतळाच्या जवळ राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे स्टेशनची व्यवस्था आहे. रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग गोव्यासाठी इकॉनॉमिक कॉरीडोर बनले आहेत. मोपा विमानतळाच्या कामात स्थानिकांना सामावून घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या भागातील युवक अकुशल आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन कुशल बनविण्याची गरज आहे.

विमानतळाला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी पेडणे आयटीआयमध्ये खास अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मोपा विमानतळाचा पेडणे परिसरातील लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पर्यटनमंत्री तथा स्थानिक आमदार मनोहर आजगांवकर यांनी सांगितले.