मोपा विमानतळाबाबत जनतेने निर्धास्त रहावे : पार्सेकर

0
93
मोपा विमानतळाविषयी मोरजी येथे स्थानिक पत्रकारांकडे बोलताना आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, हंसापूर माजी सरपंच संतोष मळीक, केरीचे माजी सरपंच मिलिंद केरकर, काळू शेटगावकर व मान्यवर. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

पेडणे तालुक्यातील होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय १३ व्या मोपा विमानतळाविषयी काही दक्षिण गोव्यातील नेते अधूनमधून विरोधाची भाषा करतात. त्याबाबत आरोग्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मंत्री पार्सेकर हे मोरजीत एका कार्यक्रमाला आले असता स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दक्षिण गोवा म्हणजे एक सासष्टी तालुका नव्हे व त्यातील दोन चार नेते म्हणजे दक्षिण गोवा होत नाही. ते मोपा विमानतळाला विरोध करतात त्याचा अर्थ मोपा दिवसेंदिवस भक्कम होणार आहे. भाजप सरकारने मोपा विमानतळाची प्रक्रिया चालू केला असून आता पेडणेकरांनी बिनधास्त रहावे. दक्षिण-उत्तर हा भेदाभद करणार्‍यांनी आपल्या पायाखाली काय जळते ते पहावे.उद्या वार्तालाप
मोपा विमानतळ हा तालुक्याच्या दृष्टीने जसा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे राज्याच्या व राष्ट्राच्या हिताचा आहे. पेडणे तालुक्यापासून पूर्णपणे सर्व पक्षीय नेते, नागरिकांचा मोपाला पाठिंबा आहे. त्यामुळे मोेपा होईलच. मोपा विमानतळाविषयी आपण स्वत: व सभापती राजेंद्र आर्लेकर दि. २१ रोजी सायंकाळी ३.३० वा. पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात वार्तालाप कार्यक्रम बोलवणार आहे. याला उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा सदस्या श्रीमती मांजरेकर, कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, धारगळ जिल्हा सदस्य सुरंगी हरमलकर, माजी अध्यक्ष तथा जिल्हा सदस्य पांडुरंग परब व तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच पंच सदस्य हजर राहणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
या वार्तालाप कार्यक्रमात मोपाविषयी भूमिका स्पष्ट होईल. तालुक्यातील सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, समर्थक, मोपाच्या समर्थनाविषयी, समर्थकांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
तारांकित हॉटेल प्रकल्प आवश्यक
पेडणे तालुक्यातील किनारे पर्यटन दृष्ट्या फार महत्वाचे असून मोपा विमानतळ झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्‍वास व्यक्त करून किनारी भागात किमान ३ ते ४ तारांकित हॉटेल येणे आवश्यक आहे आणि पर्यावरण सांभाळून जे जे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारे प्रकल्प येतील त्या त्या प्रकल्पांना आपण पूर्ण पाठिंबा असल्याचे पार्सेकर म्हणाले.
तुयेत इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प
तुये पठारावर शासकीय ४ ते ५ लाख चौ.मी. जागा सरकारची आहे. काही जागेत डोंगर, पोखरणे चालू आहे. ती जागा ताब्यात घेवून त्या ठिकाणी इडीएस प्रकल्प आणला जाईल, त्याच मोबाईल व संगणाचे स्पेअरपार्ट इतर साहित्य निर्मिती करण्याच प्रकल्प आणण्याची योजना असल्याचे मंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
एनडीआर रस्ता रुंदीकरण
मांद्रे मतदारसंघ हा पर्यटनदृष्ट्या फार महत्वाचा आहे. त्यामुळे एमडीआर मुख्य रस्ता १५ मी, रुंद असणे आवश्यक आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूने साडेबारा मी. साईट बँक ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला ज्याच्या जमिनी आहेत त्यांनी भविष्यात रस्त्याच्या मध्य भागापासून सोबारा मीटर साईट बॅक ठेवून बांधकामे करण्यास हरकत नाही, असे पार्सेकर म्हणाले.
पीपल फॉर मोपाच्या बैठकीत ठराव
मोपाबाबत यापुढे आक्रमक धोरण
मोपा विमानतणाला जे विरोध करतात त्याचा निषेध करून जे समर्थनास पाठिंबा देतात त्याचे अभिनंदन करून यापुडे आक्रमक भूमिका घेण्याच निर्धार पीपल्स फॉर मोपा इंटरनॅशनल ऍरपोर्ट संघटनेने काल दि. १९ रोजी पार्से येथे घेतलेल्या बैठकीत केला.
संघटनेचे निमंत्रक वसंत शेटगावकर, देवेंद्र प्रभुदेसाई, पार्से सरपंच गुरुदास पांडे, महेश मांजरशेकर, ऍड. प्रसाद शहापूरकर आदी व्यासपीठार हजर हाते. प्रथम मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोपाविषयी समर्थन दिल्याने अभिनंदाचा ठराव घेवून आता उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली. दक्षिण गोव्यातील काही तथाकथीत या बहुउद्देशीय प्रकल्पाला राजकीय व धार्मिकही रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. निसर्गनिर्मित जागा विमानतळासाठी मोपा गावातील तज्ञाद्वारे निवडलेली आहे. पेडणेकरांनी विमानतळ मोपात व्हावा म्हणून मागणीही केली नव्हती. जागेची निवड तज्ञांनी केली असता मोपा हा भाग गोव्याचा नव्हे का? किंवा दक्षिण उत्तर अशी दुही करणार्‍यांनी अभ्यास करावा. उठसूठ विरोध करणार्‍याना आता जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार करून पुन्हा गावागावात बैठका घैण्याचे जाहीर केले. मोपा विमानतळाविषयी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना योग्य तो वाढीव दर व शासकीय नोकर्‍यांची हमी या मागण्या संघटनेने प्राधान्यक्रमाने सरकारपुढे मांडण्याचा निर्धार केला.
सासष्टीतील बहुतेक ग्रामसभांत मोपाला विरोध
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मडगाव येथे भेटीच्यावेळी मोप विमानतळ होणारच असे सांगितले. त्यामुळे काल रविवारी सासष्टी तालुक्यात झालेल्या बहुतेक ग्रामसभांत मोप विमानतळाला विरोध करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला. यावेळी मोप विमानतळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. लोटली, नुवे, वार्का, आंबेली, व मोरपिर्ला या पाच ग्रामसभांत मोपाला विरोध करण्यात आला. नुवेतील सभेत रक्ताने सह्या करून मोपाला विरोध करण्याचे ठरवण्यात आले. या ग्रामसभांमुळे सरकारला पाठिंबा देणार्‍या तीन आमदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. मोरपिर्ला ग्रामसभेत मोप विमानतळाबाबत मतदान घेतले असता एकच मत मोपच्या बाजूने पडले. आंबेली ग्रामसभेत आमदार बेंजामिन सिल्वा उपस्थित होते.
दरम्यान, लोटलीतील ग्रामसभेत वीजबिले चार महिन्यांनी मिळत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.