मोपा पीडितांचे पर्यटनमंत्र्यांना काळे बावटे

0
97

मोपा विमानतळासाठी संपादित केलेल्या जागेतील दोन घरे सरकारने पाडल्याच्या निषेधार्थ काल अन्यायग्रस्त व पेडण्यातील कॉंग्रेस समर्थकांनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना काळे बावटे दाखविले. पर्यटनमंत्र्यांना काळे बावटे दाखवणार असल्याचे वृत्त पेडणे मतदारसंघातील पर्यटन मंत्र्यांच्या समर्थकांना मिळाल्याने मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली होती.

गुरुवार हा पर्यटनमंत्री आजगावकर यांचा मतदारसंघातील जनतेच्या समस्या ऐकून घेण्याचा दिवस. दर गुरुवारी कार्यालयात जनता दरबार भरवला जातो. त्यामुळे शासकीय अधिकारीही उपस्थित राहतात. काल पर्यटनमंत्री कार्यालयात येण्यापूर्वीच सुरेश तळकटकर, नारायण साळगावकर यांचे कुटुंबीय व पेडणे गट कॉंग्रेस अध्यक्ष उमेश तळावणेकर, ऍड. मुरारी परब, कॉंग्रेस सरचिटणीस सुभाष केरकर, दशरथ महाले आदींनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना काळे बावटे दाखवून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पर्यटन मंत्र्यांना काळे बावटे दाखवणार याची कुणकुण समर्थकांना लागली होती. त्यामुळे मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच तसेच बाबू समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री आपल्या सरकारी वाहनातून कार्यालयाकडे आले त्यावेळी समर्थकांनी बाबू आजगावकर जिंदाबाद, बाबू तुम आगे बढो, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. किमान ३०० समर्थक यावेळी उपस्थित होते.

न्याय मिळेपर्यंत आंदोलन
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष उमेश तळावणेकर यांनी प्रतिक्रिया देताना ज्या भाऊसाहेब बांदोडकर यांनी बहुजन समाजाला समोर ठेवून मगोची स्थापना केली आणि जनतेला न्याय दिला त्याच पक्षाचे मंत्री बाबू आजगावकर यांनी मोपा पिडीत लोकांची घरे मोडली. बाबूनी ठरवले असते तर त्यांची घरे वाचवून ते खर्‍या अर्थाने पेडणेकरांचे सेवक बनले असते. पीडितांना न्याय मिळेपर्यंत ठिकठिकाणी परत परत धरणे, निदर्शने आणि वेळप्रसंगी काळे बावटे दाखवण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

कायदेशीर मार्गाने न्याय मागा : बाबू
मोपा विमानतळासाठी जागा सरकारने संपादित केल्यानंतर ती घरे बांधली होती. आपण ती मोडलेली नाहीत. ती कायदेशीर असती तर न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढे आलो असतो. त्यांनी कायदेशीररीत्या न्याय मागावा. आपली हरकत नाही. काही मूठभर नागरिक प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत. आपण कुणाचीही बदली केलेली नाही. कुणाची बदली झाली असेल तर ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे असा दावा मंत्री आजगावकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला.