मोपासाठी मनुष्यबळ निर्मितीसाठी सरकारने तातडीने पाऊल उचलावे

0
49

>> जीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचे पत्र परिषदेत मत

प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या रोजगारसंधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे, असे मत गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मांगिरीष पै रायकर यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केले.

प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध होणार्‍या रोजगारासाठी आवश्यक मनुष्यबळ स्थानिक पातळीवर तयार करण्यासाठी तात्काळ आवश्यक अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे.
मोपा विमानतळावर पहिल्या टप्प्यात सुमारे तीन हजार रोजगार मिळू शकतो. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून विविध पदांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे. सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षांचे अभ्यासक्रम तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असेही रायकर यांनी सांगितले. मोपा विमानतळ लॉजिस्टीक हब बनविण्याच्या केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या घोषणेचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स स्वागत करीत आहे. तसेच मोपा विमानतळावरील प्रत्येक नोकरी स्थानिकाला देण्याच्या घोषणेचे स्वागत केले जात आहे, असेही रायकर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रभू यांनी दाबोळी विमानतळाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने काही वर्षापूर्वी लॉजिस्टीक हब तयार करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. परंतु, या प्रकल्पाला चालना मिळालेली नाही.
राज्यात विमान, रेल्वे, रस्ता वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे लॉजिस्टीक हबच्या माध्यमातून नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असेही रायकर यांनी सांगितले.