मोपाला भाऊंचे नाव

0
139

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि खर्‍या अर्थाने लोकनेते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला द्यावे अशी मागणी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली आहे. गोव्यातील या प्रस्तावित नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेबांसारख्या लोकोत्तर नेत्याचे नाव देणे निश्‍चितपणे अर्थपूर्ण ठरेल आणि त्याला कोणाचा विरोध असण्याचेही काही कारण नाही. मात्र, यापुढे कोणत्याही विमानतळाला व्यक्तींची वा नेत्यांची नावे द्यायची नाहीत असा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच घेतलेला असल्याने त्यातून मार्ग कसा काढायचा हाच यातील कळीचा मुद्दा ठरेल. आपापल्या राज्यातील विमानतळांना आपल्या प्रिय नेत्याचे वा इतिहासात अमर झालेल्या एखाद्या व्यक्तीचे नाव देण्याचा आग्रह जनतेकडून धरला जाणे स्वाभाविक आहे. त्याच प्रमाणे आजवर तसा आग्रह वेळोवेळी धरला गेला आणि त्यानुसार अनेक विमानतळांना सर्वसहमतीने तशी नावेही दिली गेली. मात्र, परदेशांतून येणारे प्रवासी आणि पर्यटक यांना ही व्यक्तींची नावे उच्चारता येत नाहीत असे कारण पुढे करून केंद्र सरकारने मध्यंतरी यापुढे नव्याने उभ्या राहणार्‍या विमानतळांना नेत्यांची नावे द्यायची नाहीत असा निर्णय घेतला आणि तसे धोरणही आखले आहे. केवळ परदेशी व्यक्तींना उच्चारता येत नाही म्हणून विमानतळाला नावे द्यायची नाहीत हे मानायचे तर दुसरीकडे रस्ते आणि रेल्वे स्टेशनांची जुनी नावे बदलून नवी नावे देण्याचा सपाटा लावला गेला आहे. शिवाय परदेशी पाहुण्यांच्या उच्चारांची काळजी वाहायची की आपल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती या नावांद्वारे चिरंतन करायच्या हाही प्र श्न उरतोच. आजवर अनेक महत्त्वाच्या विमानतळांना महान नेते, राष्ट्रपुरूष, स्वातंत्र्यसैनिक यांची नावे दिली गेली आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा गांधींचे, कोलकत्याच्या विमानतळाला नेताजी सुभाषचंद्रांचे, अहमदाबादच्या विमानतळाला सरदार पटेलांचे, पाटण्याच्या विमानतळाला जयप्रकाश नारायण यांचे, लखनौ विमानतळाला चौधरी चरणसिंगांचे, नागपूर विमानतळाला बाबासाहेब आंबेडकरांचे, पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाला सावरकरांचे नाव दिलेले आहे आणि ही नावे यथोचित आहेत. बेंगलुरूच्या विमानतळाला त्या शहराचा संस्थापक केंपेनगौडाचे नाव आहे. उदयपूरच्या विमानतळाला महाराणा प्रतापचे, इंदूर विमानतळाला अहिल्याबाई होळकरांचे, अमृतसर विमानतळाला शिखांचे गुरू रामदासजी यांचे, रांची विमानतळाला बिरसा मुंडाचे नाव आहे. अनेकदा विमानतळांची नावेही वादाचा विषय ठरत असतात. ज्याचे सरकार तो आपल्या विचारधारेशी संबंधित व्यक्तीचे नाव विमानतळाला देऊ पाहतो. हैदराबाद विमानतळाला राजीव गांधींचे नाव दिले गेले तोही असा निष्ठा वाहण्याचा प्रकार होता. मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव दिले गेले, परंतु त्यात ‘महाराज’ असा उल्लेख नाही. त्याविरुद्ध छत्रपतींचे तेरावे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालवला. नवी मुंबईच्या होणार्‍या विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव द्यायचे की शेकापचे व स्थानिक आगरी समाजाचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे यावरून राजकारण तापले आहे. सर्वांत जास्त घोळ आहे तो चंडिगढ विमानतळाचा. चंडिगढ ही पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी. साहजिकच विमानतळ दोघांच्या मालकीचा. मग पंजाबने विमानतळाला शहीद भगतसिंहांचे नाव दिले, तर हरयाणा विधानसभेने ते बदलून डॉ. मंगल सेन यांचे नाव देण्याचा अट्टहास धरला आहे. केरळमधील कोची विमानतळाला के. करुणाकरन यांचे नाव देण्याची मागणी तेथील माजी मुख्यमंत्री ओमन चंडींनी पुढे केली होती. अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठीच खरे तर केंद्र सरकारने आजवर दिलेली विमानतळांची नावे बदलायची नाहीत, परंतु नव्याने नावेही द्यायची नाहीत असे ठरवलेेेले असावे. पण जर केंद्र सरकारचे हे धोरण असेल तर मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव देण्यासाठी ते कसे बदलले जाईल? भाऊसाहेबांच्या नावाचा आग्रह मगो पक्षाने धरलेला असला तरी त्यांच्याकडे केवळ मगो पक्षाचे नेते म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. गोव्याच्या बहुजन समाजाला उत्कर्षाची वाट दाखवणारा लोकनेता म्हणून गोव्याच्या जडणघडणीत भाऊसाहेब बांदोडकर यांचे महान योगदान आहे. मध्यंतरी त्यांची जन्मशताब्दी सरकारने साजरी केली, तेव्हा खरे तर त्यांचे एखादे चिरंतन स्मारक गोव्यात उभे राहायला हरकत नव्हती. किमान मिरामारच्या त्यांच्या उपेक्षित समाधीचे सौंदर्यीकरण करता आले असते, परंतु ते घडले नाही अशी शशिकलाताईंची तेव्हा तक्रार होती. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नामकरणाव्यतिरिक्त भाऊसाहेबांच्या नावाची स्मृती जपली आहे ती ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’ने आणि स्वतः भाऊसाहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या काही शिक्षणसंस्थांनी. त्यामुळे मोपा विमानतळाचे जर नामकरण करायचे असेल तर भाऊसाहेबांव्यतिरिक्त दुसरे योग्य नाव नाही. पण ते घडणार कसे हाच लाखमोलाचा प्रश्न असेल!